मतदार जनजागृती करिता ‘एनएमएमटी'चा पुढाकार

नवी मुंबई : येत्या २० मे रोजी होणाऱ्या २५-ठाणे लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून विविध पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत आहेत. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या विविध विभागांमार्फत मतदार जनजागृतीपर नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यामध्ये नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थात ‘एनएमएमटी'नेही व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्या नियंत्रणाखाली पुढाकार घेतला आहे. ‘एनएमएमटी' बसेस मधील चालक, वाहक यांच्याप्रमाणेच अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी यांना ‘माझे मत माझा अधिकार' आणि ‘मी मतदान करणारच' असे संदेश दोन्ही बाजुने छपाई केलेल्या गांधी टोपी वितरित करण्यात आल्या आहेत. या टोप्यांचा वापर विशेषत्वाने चालक, वाहक आणि इतर सर्वांकडून केला जात असल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच महापालिका क्षेत्राबाहेर जाणाऱ्या बसेसमुळे तेथेही मतदान करण्याविषयी व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या लक्षवेधी उपक्रमाचे प्रवाशांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये मतदान जनजागृतीचे जिंगल प्रसारित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘एनएमएमटी'ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मतदान करण्याचे आवाहन गीतसंगीत स्वरुपात केले जात आहे. याशिवाय परिवहन उपक्रमाच्या बसेस आणि बस शेल्टरवर मतदान विषयक जाहिराती प्रसिध्द करण्यात येऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जनजागृती केली जात आहे.

यासोबतच परिवहन उपक्रमाच्या विविध नियंत्रण कक्षांवर आणि आगारांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. त्या सेल्फी पॉईंटवर ‘माझं मत-माझं भविष्य', ‘तुमचे मत-तुमचा अधिकार', ‘वृध्द असो किंवा जवान-सर्वजणांनी करा अवश्य मतदान', ‘मतदार राजा ठेव कर्तव्याचे भान-सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान' अशा आशयाचे संदेश प्रसारित करुन नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पावसाळा मधील आपत्कालीन परिस्थिती; उल्हासनगर महापालिका सज्ज