करळ फाटा बस स्थानकाची दुरावस्था

उरण: उरण तालुक्यातील उरण-पनवेल महामार्गवरील प्रसिध्द करळफाटा येथील करळ, सोनारी आणि सावरखार या तिन्ही गावातील नागरिकांसाठी असलेल्या बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. यामुळे या स्थानकावरुन प्रवास करणाऱ्या प्रवासी आणि विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. त्याचप्रमाणे स्थानकाचा स्लॅब तुटल्याने त्याचाही धोका निर्माण झाला आहे.

‘जेएनपीए प्रशासन'ने सदर स्थानकाची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. जेएनपीए सारख्या जागतिक पातळीवरील बंदराच्या हद्दीत करळ, सोनारी आणि सावरखार अशी तीन गावेही येतात. सदर परिसरात अनेक सुविधा ‘जेएनपीए'ने दिल्या आहेत. बंदराला जोडणारे रस्ते तयार करण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्याचवेळी एकेकाळी प्रसिध्द असलेल्या करळ फाटा आता नष्ट झाला आहे.

जेएनपीए साडेबारा टक्केचा ‘दिबां'च्या नेतृत्वाखाली लढलेल्या लढ्याची आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी झालेल्या मोर्चे आंदोलनाची खरी साक्ष करळफाटा होता. करळ फाट्यावरुन प्रवास करणाऱ्या सदर ३ गावातील नागरिक आणि प्रवासी येथील बस स्थानकातून प्रवास करतात. मात्र, करळ बस स्थानक नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मधील नालेसफाईची महापालिका आयुक्तांकडून पाहणी