पनवेल मधील नालेसफाईची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

पनवेल: यावर्षी भरपूर पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील मान्सूनपूर्व नाले सफाईची पाहणी करुन आयुवत डॉ. प्रशांत रसाळ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ‘स्वच्छता-घनकचरा विभाग'चे उपायुक्त डॉ. वैभव विधाते, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात सुमारे २५५ किलोमीटरचे १,१२७ लहान नाले आहेत. त्याचबरोबर ६० किलोमीटरचे १०५ मोठे नाले आहेत. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाची शवयता असल्याने त्याआधी नाले सफाईची सर्व कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. रसाळ यांनी तळोजा मधील मन्नान कॉलनी, खारघर मधील कोपरा ब्रीज, बेलपाडा, कामोठे नौपाडा, नवीन पनवेल मधील बालभारतीच्या मागील नाल्याची पाहणी केली. दरम्यान, ३१ मे पूर्वी सर्व नाल्यांची सफाई कामे पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या.

महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून यांत्रिक पध्दतीने चारही प्रभागातील नालेसफाईला सुरुवात झाली असून, जवळपास ३० ते ४० टक्के काम पूर्ण होत आले आहे. नालेसफाईबरोबरच शहरातील छोट्या-मोठ्या गटारीच्या साफसफाईचे कामही युध्दपातळीवर सुरु आहे. महापालिकेच्या चारही प्रभागामध्ये एकूण ८६७ मनुष्यबळ, ९ जेसीबी, ६ पोकलन, १२ टिपरच्या सहाय्याने लहान-मोठ्या नालेसफाईचे काम करण्यात येत आहे.

आयुक्तांनी सदर पाहणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळाची योग्यरित्या विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे सांगत उर्वरीत नालेसफाईची कामे वेगाने करण्याच्या सूचना करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावर्षी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने नालेसफाईसाठी गुगल अर्थच्या सहाय्याने अत्याधुनिक ‘नाला मॅपिंग' यंत्रणा सुरु केली आहे. या यंत्रणा अंतर्गत महापालिकेच्या चारही प्रभागातील मोठ्या नाल्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आले आहेत. जसेजसे नाले साफ केले जातील, तसतशी नालेसफाईची माहिती या यंत्रणेच्या माध्यमातून अपडेट होणार आहे. नाले सफाईचे काम सुरु असणाऱ्या नाल्यांना पिवळा रंग, काम पूर्ण झालेल्या नाल्यांना निळा किंवा हिरवा रंग, काम न झालेल्या नाल्यांना लाल रंग वापरण्यात आला आहे. अशा पध्दतीने या यंत्रणेच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामकाजाचा आढावा घेणे सहज शक्य होणार आहे. सदर यंत्रणा पुढील वर्षीपासून सर्व लहान नाल्यांसाठीही वापरण्याच्या सूचना आयुक्त डॉ. रसाळ यांनी दिल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उन्हात थंडगार ‘निरा' पिण्याकडे नागरिकांचा वाढता कल