शिवसेना ठाकरे गटाला धक्का!

डोंबिवली : शिवसेना ठाकरे गटातील डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३० एप्रिल रोजी ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला होता. यानंतर ४ मे रोजी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेना पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे ठाकरे गटात सक्रिय होते. त्यांच्यासह केशव पाटील, शाखाप्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी ‘शिवसेना'मध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटात मिळालेल्या वागणुकीमुळे सदर सर्व पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतले आहेत. दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना पक्षाचे काम उत्तम सुरु असून विकास हाच आमचा अजेंडा आहे. त्यामुळे एका विश्वासाने लोक ‘शिवसेना'मध्ये येत आहेत. या सर्वांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

‘शिवसेना'मध्ये ४० वर्षापासून जनतेची सेवा करत आहे. आता ठाकरे गटात जे स्थानिक पातळीवर निर्णय घेताना मला विश्वासात घेतले जात नव्हते. दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना मला कळविलेही नाही. सन्माननीय बाळासाहेब हयात होते, तोपर्यंत आमची श्रध्दा होती. पण, आता आमची मातोश्री ‘ठाणे'च आहे, असे प्रकाश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, बंडू पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मोदी सरकार ४ जूननंतर रिटायर्ड -उध्दव ठाकरे