बिघडलेल्या संस्कृतीचे पाईक होणे टाळा -लोकशाहीर संभाजी भगत

खारघर : संस्कृती आणि साहित्य दोन्हीही मानवाला मिळालेली अनोखी आणि विशेष देणगी असून ती इतर प्राण्यांमध्ये नसते. त्यामुळे बिघडलेल्या संस्कृतीचे पाईक होऊ नका. याउलट बुध्द-छत्रपती शिवाजी महाराज-महात्मा ज्योतिबा फुले-डॉ. आंबेडकर यांची संस्कृती आपलीशी करुन तिचे आपल्या आयुष्यामध्ये पालन करा, असे आवाहन  लोकशाहीर संभाजी भगत यांनी खारघर येथे केले.  

जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला खारघर येथील ‘युवा संस्था'च्या कॉम्प्लेक्ससिटी या कार्यक्रम अंतर्गत आयोजित करण्यात ‘श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन'चे उद्‌घाटन लोकशाहीर संभाजी भगत यांच्या भाषणाने झाली. यावेळी संभाजी भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी गाजलेले ‘ये हिटलर के साथी जनाजो के बाराती हे' गीत सादर केले.  

‘साहित्य संमेलन'चे अध्यक्ष अविनाश कदम यांनी संस्कृतीचे आणि साहित्याचे स्वरुप बदलत चालले आहे. त्यामध्ये द्वेष, नफरत, धर्म, जात, पंथ याबद्दल खोटा अभिमान आणि स्वाभिमान बाळगणे, पसरविणे याचे काम सत्ताधारी अथकपणे करत असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण या संस्कृतीला तीलांजली देऊन नवी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची संस्कृती वाढवली अन्‌ जोपासली पाहिजे. असे केले नाही तर हळूहळू बंधुता नष्ट होऊन मानवाचे स्वातंत्र्य तो गमावून बसेल आणि स्वातंत्र गमावल्यानंतर समता प्रस्थापित होणार नाही. सदर बाब असंघटित कामगार आणि युवा यांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन अविनाश कदम यांनी केले.

या ‘संमेलन'ची सुरुवात महाराष्ट्रगीत आणि प्रेरणादायी गीताने तसेच ‘संविधान'च्या प्रास्ताविकाचे सामुदायिक वाचन करुन करण्यात आली. उद्‌घाटन सत्रामध्ये ‘युवा संस्था'च्या कार्यकारी संचालिका रोशनी नुगेहळळी यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात ‘श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन'चा उद्देश स्पष्ट केला. तर ‘घर हक्क संघर्ष समिती'चे संस्थापक-अध्यक्ष हिरामण पगार, शाहीर आप्पासाहेब उगले, आशिष शिगवण, पत्रकार अलका धुपकर यांनी आपल्या मनोगतात सर्व कामगारांनी एकजुटीने कार्यरत राहावे आणि अशा ‘साहित्य संमेलन'मधून आपण व्यक्त व्हावे, असे आवाहन केले.

यानंतर लोकशाहीर आप्पासाहेब उगले, युवा शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या लोकशाहीर जलसा टीमने पोवाडे, भारुड, वासुदेव, सामाजिक चळवळीच्या गीतांनी उपस्थित कामगार आणि युवकांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण केली. सदर ‘श्रमिक सांस्कृतिक साहित्य संमेलन'मध्ये अनेक श्रमिक कामगारांनी तसेच युवकांनी आपली कला सादर केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात बदल