नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात बदल

वाशी : नवी मुंबई शहरातील औद्योगिक क्षेत्रात असलेल्या नैसर्गिक नाल्यांच्या मुळ प्रवाहात ‘एमआयडीसी' प्रशासनाने बदल करुन नाल्यांचा प्रवाह बदलला आहे. ‘एमआयडीसी'ने निसर्गाशी केलेल्या या छेडछाडीमुळे औद्योगिक भागात पुराचे पाणी भरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

औद्योगिक वसाहत वसवण्यासाठी ‘एमआयडीसी'ने नवी मुंबई शहरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेली येथील भूमिपुत्रांची शेतजमीन संपादित केली होती. सदर जमीन डोंगर पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात अनेक ठिकाणी धबधबे तयार होऊन या धबधब्यांचे पाणी नैसर्गिक नाल्यांद्वारे नवी मुंबई शहरातील खाडीला मिळते. मात्र, मागील चार-पाच वर्षात औद्यगिक वसाहतीतील भूखंडाची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘एमआयडीसी'ने अनेक ठिकाणी मुळ नैसर्गिक नाल्यात बदल करुन नाल्याचा प्रवाह बदल करण्याची परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे एक-दोन ठिकाणी भूखंडधारकांनी थेट नाल्यावरच बांधकाम केले आहे. एमआयडीसी भागात भूखंडधारकांनी थेट नाल्यावरच बांधकाम केले असल्याचे नवी मुंबई महापालिक प्रशासनाच्या पाहणी अहवालात स्पष्ट झाले आहे. 

एमआयडीसी भागातील नाल्यावरील  बांधकामाचे पडसाद राज्य विधान परिषद मध्ये देखील उमटले आहेत. त्यामुळे मुळ नैसर्गिक नाल्याच्या प्रवाहातील बदल तसेच नाल्यांवर केलेले बांधकाम यामुळे भविष्यात नवी मुंबई शहरातील औद्योगिक भागात पुराचे पाणी भरुन मिठी नदी सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमी वर्तवित आहेत.


एमआयडीसी प्रशासनाने भूखंड विक्रीचा सपाटा लावला असून, भूखंड विक्रीसाठी मनमानी पध्दतीने नैसर्गिक नाल्यात बदल तसेच नाल्यांवर बांधकाम करण्यास मुभा दिली आहे. महापे मधील एका नैसर्गिक नाल्यावर बांधकाम केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेने  देखील कार्यवाही करण्याबाबत एमआयडीसी प्रशासनाला कळवले आहे. तसेच याबाबत राज्य विधीमंडळ अधिवेशनात देखील पडसाद उमटले असून, आपण ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रार केली आहेत. मात्र, त्या तक्रारींवर कुठलीच कारवाई होत नसल्याने भविष्यात औद्योगिक वसाहतीला पुराचा धोका वाढत जाणार आहे. - नामदेव डाऊरकर, माजी नगरसेवक - नवी मुंबई महापालिका.
------------------------------------------
 नवी मुंबई मधील एमआयडीसी भागातील नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात केलेले बदल तसेच नाल्यावर केलेल्या बांधकामांची पाहणी करुन पुढील योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.  - सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एस आर दळवी (I) फाऊंडेशनद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी तयार करण्यात आले सीड बॉल..