भू-माफिया, भूस्खलन पासून बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी

नवी मुंबई : बेलापूर टेकडी (पारसिक हिल) वरील अतिक्रमणांकडे होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाविरोधात स्थानिक रहिवासी आणि पर्यावरण प्रेमींनी मोठी मूक मानवी साखळी तयार केली. ‘सेव्ह बेलापूर हिल्स'आणि ‘स्टॉप मर्डर ऑफ ट्रीज' अशा घोषणा देणारे बॅनर  घेऊन रहिवाशांनी एमजीएम हॉस्पिटल जंक्शन जवळ मानवी साखळी केली. 

बेलापूर टेकडीवर अनेक बेकायदेशीर मंदिरे उभी राहिली आहेत आणि रहिवाशांनी ९ वर्षांपूर्वी इशारा देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. यासंदर्भात आम्ही केलेल्या तक्रारीवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाला सदर अतिक्रमणांची चौकशी करण्यास सांगितले आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

इमारतींमुळे टेकडी कमकुवत होऊ शकते आणि आगामी पावसाळ्यात भूस्खलन होेण्याची भिती आहे. परंतु, ‘सिडको'ने अद्याप ठोसपणे कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ‘नॅटकनेवट'ने आरटीआय अंतर्गत अर्ज दाखल करुन बेलापूर टेकडी वाचवण्यासाठी कोणती पावले उचलली याची माहिती मागितली. त्याचवेळी बी. एन. कुमार यांनी ‘सिडको'च्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनाही याप्रकरणी सावध केले आहे. यानंतर केवळ एक समिती बेलापूर टेकडीवरील अतिक्रमणांच्या समस्येकडे लक्ष देत असल्याचे कुमार यांनी सांगितले. 
‘सिडको'कडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याची खंत स्थानिक रहिवासी कपिल कुलकर्णी यांनी व्यक्त केली. वन जमीन ‘सिडको'च्या ताब्यात आहे. रहिवासी हिमांशू काटकर यांच्या म्हणण्यानुसार बेकायदेशीर बांधकामांना पाणी आणि वीज जोडणी मिळते, हीच बाब धक्कादायक आहे. ‘कल्पतरु को-ऑप. हौसिंग सोसायटी'ने टेकडी विध्वंसाच्या विरोधात पुढाकार घेतल्याने शेजारील अनेक सोसायटीचे सदस्य मूक निषेधात सामील झाले आहेत.

चौफेर अतिक्रमणांमुळे बेलापूर टेकडीचे प्रचंड नुकसान होत आहे आणि आम्हाला दरडी कोसळण्याची भिती असल्याची बाब ‘हिल व्ह्यू रो-हाऊस सोसायटी'तील दशरथ भुजबळ यांनी निदर्शनास आणली आहे. चोबास्को कोळसो आणि सुनील भडांगे यांनी झाडे आणि टेकडी तोडण्याबद्दल गांभिर्याने मुद्दे मांडत अतिक्रमण करणारे नागरिक फुकटचा लाभ कसा उपभोगत आहेत? याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

त्यामुळेच अनेक गृहिणी आणि मुले मूक निदर्शनास सहभागी झाले. सदरचे प्रकरण २०१५ पासूनचे आहे. त्यावेळी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. तेव्हा मंदिराचे बांधकाम नुकतेच सुरु झाले होते. आता तर सदर ठिकाणी २० मंदिरे निदर्शनास येत असल्याचे कुलकर्णी म्हणाले. सदर बाब धक्कादायक असूनही त्याकडे उच्च अधिकारी सतत दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासन आणि अधिकारी इर्शाळवाडी भूस्खलनासारख्या दुर्घटनेतून कोणताही धडा घेत नाहीत, अशी खंत खारघर टेकडी आणि वेटलँड समुहाच्या ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोलशेत परिसरात महापालिका तर्फे स्वच्छता अभियान