कोलशेत परिसरात महापालिका तर्फे स्वच्छता अभियान

ठाणे : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील माजिवडा मानपाडा प्रभागसमिती अंतर्गत कोलशेत परिसरात आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कोलशेत महाविसर्जन घाट याठिकाणी दशक्रिया विधीसाठी नागरिक येत असून सदर परिसर नियमितपणे स्वच्छ राहिल याचे नियोजन करावे. तसेच विसर्जन घाटाच्या दोन्ही बाजुला निर्माल्य कलश ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी दिल्या.

सदर स्वच्छता अभियानात सफाई कर्मचाऱ्यांसमवेत अतिरिक्त आयुक्त-१ संदीप माळवी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, तुषार पवार, सहाय्यक आयुक्त प्रितम पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त राव यांनी कोलशेत खाडीकिनारी परिसरात साफसफाई केली. यावेळी खाडीकिनारी आढळलेले डेब्रीज तातडीने उचलण्याबाबत कार्यवाही करण्यात आली.

यावेळी आयुवतांनी कोलशेत खाडीकिनारी विकसित करण्यात आलेल्या उद्यानाची पाहणी देखील केली. सदर उद्यान अत्यंत नियोजन पध्दतीने विविध प्रकारची झाडे लावून विकसित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच याठिकाणी एका बाजुला लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य आणि दुसऱ्या बाजुला नागरिकांसाठी खुली व्यायामशाळा केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी आयुवतांनी उद्यानात फेरफटका मारण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून उद्यानात होत असलेल्या साफसफाईबाबत विचारणा केली, नागरिकांनीही नियमित साफसफाई होत असल्याचे सांगितले. तसेच नियमित चांगले काम करणाऱ्या माजिवडा हजेरी शेड येथील विमल दत्तात्रय केदारे या महिला सफाई कर्मचारी यांना आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

दरम्यान, कोलशेत परिसरात असलेल्या बायोगॅस प्रकल्पाचीही पाहणीही करुन या प्रकल्पाच्या आजुबाजुला झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून संपूर्ण प्रकल्पाला बंदिस्त करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच पावसाळ्यात सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही उद्यान विभागाला दिल्या.

कोलशेत वरचा गाव ते कपालेश्वर ग्लोरिया बिल्डींग, कोलशेत खालचा गाव ते लोढा ॲमेरा, ढोकाळी नाका, कापूरबावडी या परिसराची आयुक्त सौरभ राव यांनी पाहणी केली.

कोलशेत विसर्जन घाट परिसरात  नागरिक निर्माल्य, कलशात न टाकता ते खाडीत फेकतात. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात बाधा येत असून परिसरही अस्वच्छ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

-सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका नुतन मुख्यालयाचे काम प्रगतीपथावर