उल्हासनगर मधील ३७ शिक्षक पर्यावरण दूत घोषित

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणविषयक जनजागृतीकरिता महापालिका कार्यक्षेत्रातील शाळांचे ३७ शिक्षक प्रतिनिधी यांना पर्यावरण दूत म्हणून घोषित करण्यात आले.

आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदुषणमुक्त व्हावे यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याने उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त (पर्यावरण) डॉ. सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालय मध्ये महापालिका शाळांतील शिक्षक प्रतिनिधी यांच्याकरिता प्रशिक्षण कार्यक्रम २६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील विविध कृतीमधून पर्यावरणाविषयी जनजागृतीचे धडे देता येतील. त्याचप्रमाणे शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांचे पालक, पालकांमार्फत त्यांचे आप्तेष्ट, शेजारी अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शिक्षक पर्यावरण दूत म्हणून महत्वाचा घटक मानले जात आहे. त्याअनुषंगाने उल्हासनगर महापालिका मार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान ३७ शिक्षकांना पर्यावरण दूत म्हणून घोषित करत त्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपस्थितांना नवीन पनवेल मधील डी. डी. विसपुते कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सिमा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरण विभागामार्फत नियुक्त मे. इन्फिनिटी रिलेशन्स, पनवेल या संस्थेमार्फत करण्यात आले होते. यावेळी महापालिकेच्या पर्यावरण विभागप्रमुख विशाखा सावंत, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 भू-माफिया, भूस्खलन पासून बेलापूर डोंगर वाचवण्यासाठी मूक मानवी साखळी