ठाणे मधील नालेसफाईच्या कामाला अखेर सुरुवात

ठाणे : कोलशेत, लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामाला २७ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. नालेसफाईची कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच नालेसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात ठेवून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या.

महापालिका आयुवत सौरभ राव यांनी २७ एप्रिल रोजी कोलशेत येथील नाल्याची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त-१ संदीप माळवी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, तुषार पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते

महापालिकेने प्रसिध्द केलेल्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर माजिवडा, लोकमान्यनगर येथील नाल्याच्या सफाईला सुरुवात करण्यात आली. तसेच येत्या एक-दोन दिवसांत सर्वच प्रभागातील नालेसफाईला सुरुवात होईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी यावेळी नमूद केले. नाल्यात उतरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेवून त्यांना हॅण्डग्लोज, बुट, मास्क, आदि सर्व साहित्य पुरविण्यात यावे. नालेसफाई करताना त्यातील संपूर्ण गाळ काढला जाईल, याची दक्षता घ्यावी. तसेच नाल्यात उगवणारी झाडेझुडपे काढण्यात यावीत, अशा सूचनाही आयुक्त राव यांनी संबंधित विभागाला दिल्या.

नालेसफाईचे काम विहीत वेळेतच पूर्ण होईल याकडे कटाक्ष असावा. नालेसफाईचे पर्यवेक्षण काटेकोरपणे करावे. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होणार नाही, या दृष्टीने संबंधित ठेकेदाराकडून काम करुन घेण्यात यावे. -सौरभ राव, आयुक्त-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 उल्हासनगर मधील ३७ शिक्षक पर्यावरण दूत घोषित