ठाणे महापालिका तर्फे वसुंधरा दिन साजरा

ठाणे : रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महापालिका तर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.

परिसर भगिनी विकास संघ या संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायलादेवी तलाव परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत भीम नगर येथील अभ्यासवर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घ्ोतला. त्यांनी या ‘अभियान'मध्ये परिसरातून २५ किलो प्लास्टीक कचरा संकलित केला. यावेळी विद्यार्थ्यांना वसुंधरा दिन विषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी नागरिकांना ‘पर्यावरण संवर्धन'चे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये २२ एप्रिल रोजी डॉ. संजय जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी पर्यावरण चळवळ, त्याची सुरुवात, ‘वसुंधरा दिन'चा इतिहास याची माहिती दिली. यंदाच्या ‘वसुंधरा दिन'ची संकल्पना ग्रह विरुध्द प्लास्टिक अशी आहे. त्याअनुषंगाने डॉ. जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्याच्या विविध प्रकारांमुळे होणारे प्रदुषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणांसह दिली. तसेच दैनंदिन जीवनशैलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता विषद केली.

आतापर्यंत सदर कार्यशाळेची १० सत्रे झाली आहेत. ती आपले पर्यावरण या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. सदर सत्रे दर शुक्रवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ऑनलाईन होतात. त्यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका प्रमुख पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले आहे.

‘अभियान'च्या पार्श्वभूमीवर वाढत्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आश्वासित केले आहे. त्यानुसार उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती, वृक्ष लागवड-संवर्धन, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर यावरही भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राव यांनी दिले असल्याचेही मनिषा प्रधान यांनी सांगितले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 पनवेल शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन