तुर्भे गांवच्या सारमाई मातेचा पालखी सोहळा संपन्न

नवी मुंबई : तुर्भे स्टोअर येथील सारमाई माता मंदीर नवी मुंबईतील एक पुरातन आणि जागृत देवस्थान असून नवसाला पावणाऱ्या, हाकेला धावणाऱ्या या सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सारमाई, तुर्भे गावची ग्रामदेवता असून या ग्रामदेवतेची दरवर्षी चैत्र शुध्द एकादशीला मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत पालखीची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. यावर्षीही १९ एप्रिल रोजी सारमाई मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या पालखीच्या मिरवणूक सोहळ्यात तुर्भे गावातीलच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबईतील सान- थोर सहभागी झाले होते. विशेषतः येथील महिलांचा पारंपरिक वेष, पारंपरिक नृत्य याचबरोबर गुलालाची उधळण, लायटिंग, फटाक्यांची आतषबाजी, पुष्पांचा वर्षाव आणि
सारमाई मातेचा जयघोष उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. रामतनु माता युवा प्रतिष्ठान आणि तुर्भे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर पालखी सोहळा भव्य दिव्य स्वरुपात साजरा करण्यात आला.

तर २० एप्रिल रोजी तुर्भे गावातील मरीआई, शितलादेवी, काफरी बाबा या देवतांच्या जत्रेनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी सकाळ पासूनच फार मोठ्या रांगा लावल्या होत्या. यावेळी वाजत-गाजत मानाच्या काठ्या, तरवे काढण्यात आले. देवतांच्या दारात नवस फेडले गेले. त्याचबरोबर जोखण्याचा म्हणजे विधिवत तुलाही करण्यात आल्या. पाळणे, मिठाई, खेळणी, बांगड्या तसेच विविध वस्तुंची मोठ्या संख्येने लागलेली दुकाने लक्ष वेधत होती.

ऐतिहासिक महत्व...
११ एप्रिल १८६४ रोजी नवी मुंबईतील पुरातन मंदिरांना देखभाल-दुरुस्ती, सांजवात आणि नैवेद्यासाठी व्हिक्टोरिया, ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडच्या राणीच्या आदेशाने मुंबई प्रांताचे राज्यपाल सर हेनरी हर्टल एडवर्ड फ्रियरह यांच्या सहीने सनद मिळाल्या होत्या. सारमाई त्यापैकीच एक पुरातन आणि ऐतिहासिक देवस्थान असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेलकरांना मालमत्ता कर देयके देण्यास सुरुवात