किंगकाँग नगरमधील ६ घरांचा भाग कोसळला

ठाणे : घोडबंदर रोडवरील किंग-काँग नगर मधील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या ओम साई चाळ येथील सहा घरांच्या भिंतींचा काही भाग कोसळल्याची घटना २० एप्रिल रोजी घडली. सुर्दैवाने या दुर्घटनेमध्ये कुणीही जखमी झालेले नसल्याने जीवितहानी टळली आहे. तर आपद्‌ग्रस्त सहा कुटुंबांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर केले आहे.

२० एप्रिल रोजी सकाळी १०.४२ वाजण्याच्या सुमारास किंग-काँग नगर मधील डोंगरी पाडा येथील ओम साई चाळीमध्ये ६ घरांच्या भिंतीचा काही भाग अचानक पडला. यामुळे एकच खळबळ उडाली. घरांचा उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने महापालिका प्रशासनाने चाळ रिकामी केली.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलीस ठाण्याचे कर्मचारी,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरु केले. यावेळी घरांचा धोकादायक स्थितीत असलेला भाग अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित काढून घेण्याचे काम सुरु केले. ओम साई चाळीतील १० घरे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरुपात रिकामी करण्यात आली आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने घटनास्थळी धोकापट्टी बांधून बॅरीगेटिंग करण्यात आले आहे. पडलेल्या घरांमध्ये मानसिक गौड, पौर्णिमा दास, हॅप्पी सिंग, रेणुका पुजारी, रामजी भांडवा यांच्या दोन खोल्यांचा समावेश आहे. तर दुर्घटनाग्रस्त घरातील रहिवाशांनी स्वतःची राहण्याची व्यवस्था आपल्या नातेवाईकांकडे केलेली असल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे गांवच्या सारमाई मातेचा पालखी सोहळा संपन्न