घणसोली मधील २ अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यक्षेत्रातील घणसोली गावामध्ये महापालिका प्रशासनाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता उभारण्यात आलेली २ अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई महापालिका आणि सिडको अतिक्रमण रोधी पथकाद्वारे करण्यात आली. या तोडक कारवाईमुळे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे करणाऱ्या व्यवती धास्तावल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका घणसोली विभाग कार्यालय क्षेत्रात घणसोली गावातील आशिर्वाद हॉस्पीटलसमोर, मुख्य रस्त्यालगत चंद्रकांत नारायण म्हात्रे (घरमालक आणि विकासक) यांनी इमारतीच्या जोत्याचे काम पुर्ण करुन कॉलमचे बांधकाम सुरु ठेवले होते. तर एकनाथ पोशा वैती (घरमालक) आणि प्रताप ईश्वर कदम (विकासक) यांनी घणसोली गांव मधील मुख्य रस्त्यालगत समर्थनगर येथे तळमजला अधिक दोन मजल्याचे बांधकाम पुर्ण करुन तिसऱ्या मजल्याच्या स्लॅबचे बांधकाम सुरु केले होते. सदर दोन्ही बांधकामे नवी मुंबई महापालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु होती. या बांधकामांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस नंतर संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वतःहुन हटविणे आवश्यक होते. परंतु, महापालिका द्वारे बजावण्यात आलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष करुन सदर ठिकाणी संबंधितांनी अनधिकृत बांधकाम करणे सुरु ठेवले होते. त्यामुळे सदर दोन ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाने संयुक्त तोडक मोहिमेचे आयोजन १८ एप्रिल रोजी केले होते.

या तोडक मोहिममध्ये सदर दोन्ही अनधिकृत बांधकामे १ पोकलेन मशिन्स आणि १० कामगार यांच्या सहाय्याने निष्कासीत करण्यात आली. या  धडक कारवाईवेळी महापालिका घणसोली विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सिडको अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस पथक तैनात होते.

दरम्यान, महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई यापुढे देखील अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण विभाग) डॉ. राहुल गेठे यांनी जाहीर केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

किंगकाँग नगरमधील ६ घरांचा भाग कोसळला