कोकण रेल्वे मार्गावर ९ जून पर्यंत २ अतिरिक्त समर स्पेशल
नवी मुंबई : उन्हाळी हंगाम-२०२४ करिता दोन अतिरिक्त समर स्पेशल गाड्या सोडण्याची घोषणा कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावर मुंबई मधील लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोवा राज्यातील थिवी दरम्यान या दोन विशेष गाड्यांच्या एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
कोकण रेल्वे मार्गावर ०११८७ क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ जून २०२४ पर्यंत आठवड्यातून एकदा दर गुरुवारी धावणार आहे. सदर विशेष गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी थिवी येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात ०११८८ क्रमांकाची थिवी-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी थिवी स्थानकावरुन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटून शनिवारी ती पहाटे ३.४५ वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचणार आहे. सदर गाडी एकूण २२ डब्यांची एलएचबी श्रेणीतील असणार आहे.
या समर स्पेशल गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबा देण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर दुसरी विशेष गाडी (०११२९/०११३०) देखील लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान आठवड्यातून एकदा धावणार आहे. या गाडीला २२ आयसीएफ डबे असणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी समर स्पेशल गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २० एप्रिल ते ८ जून २०२४ या कालावधीत दर शनिवारी धावणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी समर स्पेशल गाडी (०११२९) लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर शनिवारी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी थिवी येथे पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात थिवी-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी (०११३०) २१ एप्रिल ते ९ जून २०२४ या कालावधीत फक्त रविवारी धावणार आहे. थिवी-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी थीवी येथून सायंकाळी ४ वाजून ३५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणार आहे.
सदर समर स्पेशल गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी येथे थांबणार आहे.
या दोन्ही समर स्पेशल गाड्यांच्या मिळून एकूण ३२ फेऱ्या ९ जून २०२४ पर्यंत होणार आहेत.