तुर्भे एपीएमसी मार्केटमधून २.५ टन प्रतिबंधात्मक एकल प्लास्टिक जप्त

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका द्वारे स्वच्छता प्रमाणेच एकल प्लास्टिक वापर प्रतिबंधावरही विशेष लक्ष दिले जात असून, नागरिकांच्या प्रबोधनासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवायांवर महापालिका द्वारे लक्ष केंद्रीत करण्यात आलेले आहे.

प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई अनुषंगाने १६ एप्रिल रोजी महापालिका तुर्भे विभाग कार्यालय क्षेत्रातील एपीएमसी मार्केट येथील जयेश कुमार अँड कंपनी मध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई महापालिका यांच्या तर्फे करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २.५ टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला.

याप्रसंगी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे नवी मुंबई उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी अजित देशमुख, शशिकांत पाटील यांच्या समवेत नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे, स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, सुषमा देवधर,योगेश पाटील आदी उपस्थित होते.

प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाईत जयेश कुमार अँड कंपनी मधून साधारणतः २.५ टनापेक्षा अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच संबंधितांकडून ५ हजार रुपये आणि एपीएमसी मार्केट मधील सरस फुड्‌स मार्ट चालकांकडून ५ हजार रुपये अशी एकूण १० हजार रुपये दंडात्मक शुल्क वसूली करण्यात आली आहे. कारवाईत मोठ्या प्रमाणात जप्त केलेले प्रतिबंधित प्लास्टिक तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी क्रशिंगसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांनी दिली.

एकल प्लास्टिक विक्रीला शासनाने बंदी घातली आहे.त्यामुळे एकल प्लास्टिक विक्री करण्यास मनाई असून, एकल प्लास्टिक विक्री करु नये, असे आवाहन महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्फत वारंवार करण्यात आले आहे. मात्र, या आवाहनाकडे दुर्लक्ष करुन आजही विक्रेत्यांकडून एकल प्लास्टिक विक्री सुरु असून, एकल प्लास्टिक विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.- जयंत कदम, नवी मुंबई उपप्रादेशिक अधिकारी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळंबोली वसाहतीला वाहतूक कोंडीचे  ग्रासले