भेसळ रोखण्यासाठी आता ‘हापूस'ला क्यूआर कोड

वाशी : कोकणातील हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत आहे. त्यामुळे खवय्यांना अस्सल हापूस आंबा मिळावा आणि शेतकऱ्याला चांगला दर मिळावा यासाठी, कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था तर्फे  जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ‘क्यू आर' कोड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मात्र, ‘क्युआर कोड' लावलेले आंबे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात अजूनपर्यंत दाखल न झाल्याने ग्राहकांना ‘क्युआर कोड'युवत हापूस आंब्यांची प्रतीक्षा लागली आहे.

कोकणातील हापूस आंब्याची अविट चव सर्वच खवय्यांना  सुपरिचित आहे. त्यामुळे हापूस आंबा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. मात्र, हापूस आंब्याची वाढती मागणी लक्षात  घेऊन एपीएमसी फळ बाजारातील काही आंबा व्यापारी मागील काही वर्षांपासून कोकणातील हापूस आंबा सोबत कर्नाटकी आंब्याची भेसळ करुन ते आंबे ग्राहकांच्या माथी मारत आहेत. मात्र, आता कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था यांच्या माध्यमातून कोकणातील पाच जिल्ह्यांसाठी हापूस या नावाने जीआय (भौगोलिक निर्देशांक) मिळाला आहे.

ग्राहकाला दर्जेदार हापूस आंबा मिळावा यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘उत्पादक संस्था'चे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांच्या संकल्पनेतून ‘क्यूआर कोड' प्रक्रिया राबविण्यात आली. त्या प्रक्रियेत काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यामध्ये ‘क्यूआर कोड'ला एक्सपायरी डेट नसल्यामुळे ‘क्यूआर कोड' पुन्हा वापरला जाण्याची शक्यता होती. तसेच ‘क्यूआर कोड'चा पुन्हा वापर करुन गैरफायदा घेतला जाऊ शकत होता. या त्रुटी दूर करुन यंदा ‘क्यूआर कोड' नव्याने निर्माण केले आहेत. त्यामुळे आता ‘क्यूआर कोड' युवत आंबे बाजारात दाखल होताच क्यूआर कोड तपासल्यावर आंब्याची खरी ओळख पटणार आहे. मात्र, कोकणातील आंब्याला ‘क्यूआर कोड' लावले असले तरी ‘क्यूआर कोड' लावलेले आंबे अद्यापपर्यंत वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाले नाहीत.


‘क्यूआर कोड' मध्ये असणारी माहिती
क्यूआर कोड तपासणी केल्यास आंब्याची मुदतबाह्य (एक्सपायरी) तारीख, आंबा पॅकिंगची तारीख, आंबा परिपक्व होण्याची तारीख, हापूस आंबा बागायतदाराची सविस्तर माहिती म्हणजे बागेचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्याची माहिती, मोबाइल नंबर, ई-मेल वगैरे अनेक आवश्यक गोष्टींची माहिती ‘क्यूआर कोड' मार्फत मिळू शकणार आहे.

  कोकणातील आंब्याला जी. आय. नामांकन
कोकणातील आंब्याला ‘क्यूआर कोड' लावले जात असल्याची बाब आनंदाची आहे. मात्र, आंब्याची भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ तर्फे कोकणातील हापूस आंब्याचे ब्रॅडींग करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच एपीएमसी फळ मार्केट मधील व्यापारी-अडते यांना शासनाच्या पणन विभागाने सक्ती करुन कोकण हापूस आंबा वेगळा ठेवून त्याची विक्री करावी, अशी आग्रही मागणी संघ तर्फे राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. - चंद्रकांत मोकल, अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ.

सध्या एपीएमसी फळ मार्केट मध्ये कोकणातील आंब्यांची आवक वाढली आहे. या आंब्याला लावण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांनी जरी ‘क्यूआर कोड' घेतले असतील तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे तूर्तास तरी ‘क्यूआर कोड' लावलेल्या हापूस आंब्याची आवक एपीएमसी फळ बाजारात होत नाही. - संजय पिंपळे, फळ व्यापारी - एपीएमसी मार्केट, वाशी.

कोकणातील आंब्याची  चव सर्वानाच चाखायची असते. मात्र, बाजारात हापूस आंब्याच्या पेटीत इतर आंबे देखील भरले जात असल्याने ग्राहकांची फसगत होते. त्यामुळे ‘क्यूआर कोड' लावलेले हापूस आंबे जर बाजारात दाखल झाले तर आनंदच आहे. - मनोज देसाई, आंबा प्रेमी - घणसोली, नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे एपीएमसी मार्केटमधून २.५ टन प्रतिबंधात्मक एकल प्लास्टिक जप्त