करावे गावातील गावदेवी माता जत्रोत्सव मध्ये भाविकांची मांदियाळी

वाशी: महाराष्ट्र राज्यातील खेड्या-पाड्यात वेगवेगळ्या देवी-देवतांच्या, सत्पुरुषांच्या नावाने दरवर्षी जत्रा भरत असतात. राज्यातील धार्मिक, सांस्कृतिक, लोककला, लोकपरंपरांचा एक महत्त्वाचा भाग म्हणूनही या जत्रांकडे पाहिले जाते. गावातील ग्रामदेवता, लोकदेवता यांची सामूहिक रीतीने कृतज्ञता या जत्रांमधून व्यक्त केली जाते. नवी मुंबई शहराने आज आधुनिकतेची कास धरली असली तरी या शहरातील ग्रामस्थांनी आपली संस्कृती आणि परंपरा कायम राखली आहे. त्यातीलच एक गाव म्हणजे करावे गाव. करावे गावात देखील गावदेवी मातेचा जत्रोत्सव भरवला जातो.

नवी मुंबई शहरामधील नेरुळ परिसरातील करावे गावात गावदेवीची  चैत्र महिन्यातील सप्तमी दिनी जत्रा भरत असून, १५ एप्रिल रोजी करावे गावातील गावदेवी मातेची जत्रा भरली होती. करावे गावातील गावदेवी प्राचीन देवी असून, करावे गावात आधी गावदेवी मातेचे जुने मंदिर कौलारु होते. मुख्य मंदिराच्या बाहेर गावदेवी मातेचे रक्षक आहेत. दरवर्षी चैत्र शुध्द सप्तमी दिवशी गावदेवी मातेचा जत्रोत्सव असतो. या जत्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. फार वर्षांपासून गोसावी फकीर तांडेल, शंकर हाल्या तांडेल, गोकुळ हाल्या तांडेल, लक्ष्मण हाल्या तांडेल आणि इतर करावे ग्रामस्थ े मातेची पूजाअर्चा, दिवाबत्तीचे काम करत असत. आता त्यांच्या पुढच्या पिढीद्वारे, ग्रामस्थांद्वारे करावे गावातील गावदेवीची पूजाअर्चा करण्याचे काम यथासांग सुरु आहे. जत्रेच्या काही दिवस अगोदर पासून करावे गावातील गावदेवी मंदिर आणि परिसराची साफसफाई, रंगरंगोटी करुन जत्रेची तयारी सुरु केली जाते.

जागरण, मुख्य जत्रेचा दिवस आणि शिळी जत्रा

चैत्र शुध्द सप्तमी दिनी करावे गावात गावदेवीची मुख्य जत्रा भरते. जत्रेच्या आदल्या दिवशी देवीची जागरणाची रात्र असते. या रात्री आगरी-कोळी समाजाची पारंपरिक नृत्य-गीते सादर केले जातात. सदर नृत्य-गीते पाहण्यासाठी-ऐकण्यासाठी करावे ग्रामस्थ एकत्र जमतात. तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी चैत्र शुध्द अष्टमी दिवशी गावदेवीची शिळी जत्रा साजरी केली जाते.

करावे गावात जत्रेच्या दिवशी संपूर्ण सजवलेल्या मंदिरात गावदेवी मातेची भक्तिभावाने यथासांग पूजाअर्चा करण्यात आली. करावे ग्रामस्थांनी गावदेवी मातेला गोड नैवद्य दाखवला. करावे गावातील विविध कुटुंबांद्वारे सरवळ भरवून देवीसाठी तरवे काढण्यात आले. करावे गावातील गावदेवी जत्रा निमित्त मुख्य रस्त्यावर बाजार भरला होता. या बाजारात विविध प्रकारचे स्टॉल्स, गावदेवी मैदानात छोटे- मोठे पाळणे, मनोरंजनाची खेळणी होती. पाळण्यात बसण्यासाठी बच्चे कंपनीसह मोठ्यांनी गर्दी केली होती. मागील काही वर्षांपासून करावे ग्रामस्थांद्वारे जत्रेच्या मुख्य दिवशी गावदेवी मातेची पालखी मिरवणूक काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पालखी मिरवणुकीत मुले-मुली,महिला-पुरुष वर्ग माठया उत्साहाने सहभागी होतात.

पंचक्रोशीत जागृत असलेल्या करावे गावातील गावदेवी मातेच्या जत्रेदिवशी भाविक आपले नवस फेडण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने करावे गावात येतात, अशी माहिती करावे गावातील  सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ भोईर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कल्याण पूर्वेतील ३ हजार कुटुंबांचा निवडणुकीवर बहिष्कार?