पनवेल मध्ये तृतीय पंथीयांमध्ये मतदार जनजागृती

पनवेल : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत ३३-मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत १८८-पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये ६ एप्रिल रोजी प. जो. म्हात्रे विद्यालय, नावडे यांच्या सहकार्याने प्रभाग समिती ‘अ' उप विभाग नावडे विभागामध्ये ‘सायकल रॅली'च्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात आली.  प्रभाग-ड मध्ये पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून दिले. तसेच ५ एप्रिल रोजी संघ (शहरी) प्रधानमंत्री आवास योजना विभाग मार्फत शाळा क्रमांक-१०मध्ये तृतीय पंथीयांची बैठक घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांची (सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम) अमंलबजावणी १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघ अंतर्गत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. पनवेल महापालिकाचे प्रभारी आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ आणि स्वीप पथक प्रमुख अधिकारी, महापालिका मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.

त्यानुसार ६ एप्रिल रोजी रोजी ३३- मावळ लोकसभा मतदार संघ अंतर्गत १८८-पनवेल विधानसभा मतदार संघ अनुषंगाने नावडे मधील प. जो. म्हात्रे विद्यालयाच्या सहकार्याने प्रभाग समिती ‘अ' उप विभाग नावडे मध्ये सायकल रॅली काढून विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली. तसेच पनवेल महापालिका, तहसिल कार्यालय आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. या पथनाट्याला नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्याचबरोबरच महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना विभागाच्या वतीने तृतीय पंथीयांची बैठक घेऊन त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच त्यांची मतदार नोंदणीही करण्यात आली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘कल्याण'मधून श्रीकांत शिंदे ‘महायुती'चे उमेदवार