नरेंद्र पाटील यांना सातारा अथवा ठाणे मधून उमेदवारी देण्याची मागणी

 

नवी मुंबई ः यंदाच्या लोकसभ निवडणुकीमध्ये माथाडी कामगार नेते तथा माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना सातारा अथवा ठाणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याची मागणी तमाम माथाडी कामगार-कार्यकर्त्यांनी ‘महायुती'चे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील माथाडी कामगार, व्यापारी वर्ग, रहिवाशी यांच्या तसेच सातारा जिल्ह्यातील जनतेच्याही अडी-अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे नरेंद्र पाटील यांना लोकसभा निवडणुकीमध्ये ‘महायुती'ची उमेदवारी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
नरेंद्र पाटील सातारा जिल्ह्यातील मौजे मंद्रुळकोळे या गांवचे रहिवाशी असून, ते ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'च्या सरचिटणीस पदावरुन कष्टकरी कामगारांना शासनाच्या माथाडी कायदा आणि विविध माथाडी बोर्डाच्या योजनेचे संरक्षण मिळवून देण्याचे कार्य करीत आहेत. कै. अण्णासाहेब पाटील यांनी निर्माण केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ पुढे नेण्याबरोबर मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून नरेंद्र पाटील त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचे कार्य करीत आहेत. सन २०१२ ते २०१८ या कालावधीत ‘महाराष्ट्र विधान परिषद'चे सदस्य म्हणून पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तसेच नवी मुंबई आणि ठाणे परिसरात विकास कामे केलेली आहेत. शासनाच्या ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ'च्या अध्यक्ष पदावरुन महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये दौरे करुन नरेंद्र पाटील यांनी हजारो मराठा युवकांना उद्योजक करण्याचे कार्य केलेले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा, कोरेगांव, जावली, वाई, खटाव तालुक्यातील बहुतांश रहिवाशी माथाडी कामगार कामगार असून ते कुटुंबियांसमवेत ठाणे आणि नवी मुंबई परिसरात वास्तव्यास आहेत.
माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कामगार अशा विविध क्षेत्रातील कार्याचा आवाका पाहून आणि जनसामान्यांमधील लोकप्रियतेचा आढावा घ्ोऊन त्यांना सन २०१९ मध्ये ‘शिवसेना-भाजप महायुती'ने सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना ४ लाख ५२ हजार ४९८ मते मिळाली होती. अवघ्या २३ दिवसामध्ये माथाडी कामगार, कार्यकर्ते, ‘शिवसेना-भाजप युती'चे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी चांगले नियोजन करुन विजयापर्यंत मजल मारली होती. त्यामुळे सामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आणि कै. अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याचा वारसा जतन करुन सदैव सामाजिक कार्यात सहभाग घ्ोणाऱ्या नरेंद्र पाटील यांना ‘महायुती'तून सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी, अशी मागणी तमाम माथाडी कामगार-कार्यकर्ते, हितचिंतक यांनी ‘महायुती'च्या नेत्यांकडे मागणी केलेली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यावर कारवाई