‘एक बार फिर से मोदी सरकार'ने नवी मुंबई मध्ये आचारसंहिता भंग?

तुर्भे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तास अगोदर ‘एक बार फिरसे मोदी सरकार', अशी घोषणा संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये भिंतीवर रंगकाम करुन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता आचारसंहिता लागून चार दिवस झाले, तरीही या भिंतीवरचे रंगकाम हटविण्यात आले नाही. यामुळे नवी मुंबई शहरात ‘एक बार फिरसे मोदी सरकार' या जाहिरातबाजीने आदर्श आचारसंहितेचा भंगच केला आहे, अशी चर्चा नवी मुंबईकरांमध्ये रंगू लागली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबई शहरामध्ये शासकीय योजनांचा लाभ देत असल्याचा देखावा निर्माण करत त्या आडून स्वतःची जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात केली आहे. इतकेच नव्हे, तर नुकतेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी काही तास अगोदर अगदी रातोरात संपूर्ण नवी मुंबई शहरातील खाजगी आणि सार्वजनिक मालमत्ताच्या भिंती, घरांवर, मालमत्तांवर विनापरवानगी ‘एक बार फिरसे मोदी सरकार', या घोषणचे लिखाण आणि कमळ चिन्ह असलेल्या जाहिराती यांचे रंगकाम करण्यात आले आहे. वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारामध्ये देखील विविध राजकीय पक्षांची कार्यालय तसेच त्यांच्या माध्यमातून विविध नेत्यांना देण्यात आलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा यांचे जाहिरात फलक अद्यापही झळकत आहेत.

विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होऊन आता ४ दिवस झाले तरीही या जाहिराती दिमाखामध्ये झळकत आहेत. त्यामुळे नवी मुंबईमध्ये आचारसंहितेचा भंग झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डोळ्यांनी पाहत असतानाही त्याकडे दुर्लक्ष कसे होत आहे?, असा आश्चर्याचा प्रश्न नवी मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी साधून सत्ताधारी पक्षांकडून जनतेच्या पैशांतून देण्यात आलेल्या सेवा-सुविधा या आपल्या पक्षामुळेच जनतेला मिळाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. रोजगार मेळावे किंवा अन्य सामाजिक उपक्रम घेण्याकरिता संबंधित राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांना कामाला लावून स्वतःच्या खिशातून खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारत जाहिरात बाजी करत स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न करण्यात आला. या प्रयत्नाला विरोधी पक्षांनी विरोध केल्याने लगाम लागला आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध