‘नवी मुंबई'च्या विकास आराखड्याबाबत पुन्हा जनसुनावणी घेण्याची मागणी

नवी मुंबई : १४ मार्च रोजी आमदार गणेश नाईक यांची नवी मुंबईतील लोकप्रतिनिधींसमवेत नवी मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकारी वर्गासोबत ७७ वी संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवी मुंबई महापालिकेने मागील वर्षी प्रसिध्द केलेल्या शहर विकास आराखड्याच्या अनुषंगाने माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी पत्राद्वारे सूचित केल्यानुसार शहरातील जनहिताच्या दृष्टीने नमूद केलेल्या विविध मुद्द्यांना हात घातला.

ऑगस्ट २०२२ मध्ये नवी मुंबई महापालिकेने बहुवर्षीय प्रतिक्षेने म्हणजेच जवळपास ४० वर्षांनंतर शहराचा प्रारुप विकास आराखडा सर्वसामान्य जनतेला माहिती न होईल, न कळेल आणि अधिक माहिती-प्रसिध्दी याची आयुधे न वापरता प्रसिध्द केला. यामध्ये नवी मुंबईतील नागरिकांना अंधारात ठेऊन विकास आराखड्याबाबत हरकती मागविण्याच्या कार्यपध्दतीचा अवलंब केला गेला होता. त्याविरोधात दशरथ भगत यांनी या प्रारूप विकास आराखडयाबाबत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन ‘जागर जनजागृती'चा या आंदोलन हाती घेतले होते. यावेळी शहरभर चौकाचौकांमध्ये सभा घेऊन शहरवासियांना महापालिकेच्या या चुकीच्या विकास आराखड्याबाबत १२ हजारांहुन अधिक हरकती-सूचना पत्रे महापालिकेकडे नोंदविण्यात आली. तसेच वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दसऱ्याच्या दिनीच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण देखील केले होते, ज्यात हजारो नवी मुंबईकर जागरुक नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था आणि सिटीझन फोरम्स सहभागी झाल्या होत्या.

दशरथ भगत यांच्या या शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आजच्या आणि भविष्याच्या दृष्टीने घेतलेल्या सदर चळवळीस आ. गणेश नाईक  यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला होता. त्याअनुषंगाने १४ मार्च रोजी नाईक यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्तांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जमीन महत्वाची आहे. या अत्यंत्यिक जिव्हाळ्याच्या असलेल्या शहर विकास आराखड्याबाबत पुनः एकदा पत्र देऊन भगत यांनी शहरातील नोडनिहाय नागरिकांमध्ये जाऊन त्यांना संपूर्णपणे उपलब्ध भूखंड-जमिनी त्यावरील प्रस्तावित आरक्षणे, त्याबाबत त्यांच्या सूचना-हरकती जमा करुन जनसुनावणी घेण्याची प्रक्रिया लोकशाही मार्गाने घ्या, अशी पुन्हा मागणी केली आहे.

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

घणसोली ते ऐरोली मार्ग प्रशस्त