राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या धमकीमुळे अधिकारी-अभियंते यांना संरक्षण द्या

नवी मुंबई : विविध राजकीय पक्ष तसेच पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकारी विशेषतः अभियंते यांना होत असलेल्या विनाकारण धमकीच्या पार्श्वभूमीवर या अधिकारी-अभियंता यांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी इंटक संलग्न ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'च्या वतीने महापालिका आयुवतांकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात ‘महाराष्ट्र कर्मचारी युनियन'चे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांना पत्र दिले असून त्यात त्यांनी अधिकारी-अभियंते यांना विविध राजकीय पक्ष आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या धमकी, शिवीगाळ, आदि गंभीर प्रकारांची दखल घेऊन संबंधित महापालिका अधिकारी-अभियंते यांना तातडीने संरक्षण पुरविण्याची विनंती केली आहे.

नवी मुंबईमध्ये अलिकडे अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करुन महापालिकेच्या कामांविषयी संबंधित अभियंते अथवा कर्मचाऱ्यांना विचारणा करीत असतात. यावेळी अनेकदा ते असंविधानिक भाषेत बोलतात तथा कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना विशेषतः अभियंता वर्गाला शिवीगाळ करतात. अनेक ठिकाणी अशी शिवीगाळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. किंवा सदर राजकीय पदाधिकारी जाणून-बुजून फेसबुक लाईव्ह द्वारे सदर चित्रीकरण सर्वत्र प्रसारीत करतात. वास्तविक पाहता कामाच्या गुणवत्तेबद्दल तक्रार असल्यास प्रशासनाकडे अथवा संबंधित विभागप्रमुखांकडे पत्रव्यवहार करणे, लोकशाही मार्गाने आंदोलन करणे असे पर्याय उपलब्ध आहेत. पण, प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला, अभियंत्यांना धमकावणे ही बाब अत्यंत गंभीर असून याचा कर्मचारी-अधिकारी यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, महापालिकेतील अनेक अभियंते दडपणाखाली काम करत आहेत. यामुळे सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन अशा राजकीय पदाधिकाऱ्यांपासून ते राजकीय कार्यकर्त्यापासून कर्मचारी-अधिकारी, अभियंते यांना संरक्षण मिळण्यासाठी पोलिसांकडे तक्रार करावी, अशी मागणी रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुवतांकडे केली आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 गजानन काळे यांच्या विरोधात भूमीपुत्र आक्रमक