केबीपी कॉलेजच्या अंशुमन झिंगरानचा जलतरणमध्ये विश्वविक्रम

अंशुमनच्या या विश्वविक्रमामुळे केबीपी कॉलेजच्या शिरपेचात खोवला एक मानाचा तुरा

नवी मुंबई : 'रयत शिक्षण संस्था'च्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या अंशुमन झिंगरान या विद्यार्थ्याने वयाच्या १९ व्या वर्षी ( १८ वर्षे १२५ दिवस) उत्तर आयर्लंड ते स्कॉटलंड अशी ३५ कि.मी. अंतराची खाडी ११ तास २८ मिनिटे आणि ५२ सेकंदात पूर्ण केली. त्याच्या या सुवर्ण कामगिरीमुळे एक नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित झाला आहे. या विश्वविक्रमामुळे नॉर्थ चॅनेल क्रॉस करणारा जगातील सर्वात तरुण जलतरणपटू अशी इतिहासात अंशुमन झिंगरान याची नोंदही झाली आहे. १९४७ पासून ते आतापर्यंत ११४ जलतरणपटुंनी उत्तर आयर्लंड ते स्कॉटलंड खाडी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. अंशुमन ११४ वा जलतरणपटू आहे. अंशुमन सध्या बारावी वाणिज्य शाखेत शिकत आहे.

१७ जुलै रोजी सकाळी १० वाजता अंशुमन झिंगरान याने उत्तर आयर्लंड ते स्कॉटलंड खाडी पोहण्यास सुरुवात केली आणि संध्याकाळी ९.२८ वाजता त्याने यशस्वीरित्या अंतर पूर्ण केले.१३ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या वातावरणात त्याने केलेली सदर सुवर्ण कामगिरी जगभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. या कामगिरीसाठी त्याला गोकुळ कामथ आणि ऋतुजा उद्देशी यांचे प्रशिक्षण लाभले. त्याचे दोन्ही प्रशिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आहेत. अंशुमनच्या या विश्वविक्रमामुळे केबीपी कॉलेजच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक यांनी त्याच्या या अभिमानास्पद विश्वविक्रमाचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. ‘रयत शिक्षण संस्था'चे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर, सचिव विकास देशमुख, सहसचिव डॉ. ज्ञानेश्वर मस्के, जिमखाना चेअरमन प्रा. अर्जुन पोटिंदे, जिमखाना प्रमुख प्रा. भास्कर हनवटे, आदिंनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Read Next

रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा आणखी एक विक्रम