रायगडची जलकन्या रुद्राक्षी टेमकरचा आणखी एक विक्रम

८ तास ५९ मिनिटात धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया सागरी अंतर पार

उरण : उरणमधील आर. के. एफ. जावाहरलाल नेहरु विद्यालयामध्ये शिकणारी रायगडची जलकन्या १३ वर्षीय रुद्राक्षी मनोहर टेमकर या विद्यार्थिनीने आणखी एक विक्रम केला आहे. रुद्राक्षी टेमकर हिने धरमतर जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया असे ३६ कि.मी. अंतर पोहून पार करत, आपल्या विक्रमांच्या यादीमध्ये आणखी एका विक्रमची नोंद केली आहे. या कामगिरीबद्दल रुद्राक्षी टेमकर हिचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.

यापूर्वी रुद्राक्षी हिने रेवस ते गेट वे ऑफ इंडिया २४ कि.मी., धरमतर ते मांडवा जेट्टी २६ कि.मी. आणि घारापुरी ते गेट वे ऑफ इंडिया १६ कि.मी. असे तीन चॅनल पोहून पार केल्याने तिला रायगडची जलकन्या म्हणून ओळखले जाते. या रायगडच्या जालकन्येने केलेल्या विक्रमांची नोंद ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेतली आहे.

रुद्राक्षीने धरमतर जेट्टी येथून रात्रीच्या काळोखामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये झेप घेत आपल्या विक्रमाला सुरुवात केली. यावेळी एका बाजुला इस्पात कंपनीच्या पोर्टची वर्दळ आणि दुसऱ्या बाजुला कोळसा आयात-निर्यातीची वर्दळ असताना,  मोठमोठ्या जहाजांच्या वर्दळीतून मार्ग काढत एक एक हात आपल्या विक्रमकडे सरसावत असताना तसेच भरती-ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या तीव्र प्रवाहाचा सामना रुद्राक्षीला करावा लागला. तर थंडीचा प्रभाव आणि खाडीमध्ये असणारी मासे पकडण्याची मोठमोठी जाळी यांचे आव्हान देखील होते. या सर्वातून मार्ग मोकळा करत रुद्राक्षीने मुंबईचे ऐतिहासिक रत्न ‘गेट वे ऑफ इंडिया'ला साक्ष ठेवत आपला विक्रम ८ तास ५९ मिनिटांचा वेळ घ्ोत पूर्ण केला.

प्रांरभी ‘शहाबाज'च्या सरपंच डॉ. केतकी सतीश तरे यांनी रुद्राक्षीला हिरवा झेंडा दाखवला. तर विक्रम पूर्ण झाल्यावर आर. के. एफ. व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष रवींद्र इंदुलकर, विशाल माने सर (आर.के.एफ. ॲडमीन), गिरीश पाटील (मुख्याध्यापक),  जगदीश मडवी (पर्यवेक्षक-इंग्रजी माध्यम) यांनी उपस्थिती दर्शवून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी डॉ. विष्णू म्हात्रे, मधुकर बैकर, द्वारकानाथ पाटील, राजेंद्र टेमकर, संतोष टेमकर, कुलदीप टेमकर, नितीन टेमकर, संदीप टेमकर, सतीश पाटील, वि्ील टेमकर, नितीन पाटील, संतोष हरगुडे, कोच हितेश भोईर, मार्गदर्शक किशोर पाटील, दिनेश म्हात्रे, राष्ट्रीय जलतरणपटू आर्यन मोडखरकर, वेदांत पाटील, अद्वैत हरगुडे, मयंक म्हात्रे, आर्य पाटील, आदि उपस्थित होते.

रुद्राक्षी टेमकर हिच्या या विक्रमाची नोंद ‘महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना'ने घेतली असून, संघटनेच्या वतीने आहेले निरीक्षक निळकंठ आखाडे यांनी रुद्राक्षीने विक्रम पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा ‘गेट वे ऑफ इंडिया' येथे केली.

दरम्यान, केलेल्या सदर विक्रमाबाबत बोलताना रुद्राक्षीने तिच्या कर्तृत्वाचे सर्व श्रेय तिने आपले आई, वडील आणि प्रशिक्षक हितेश भोईर यांना दिले आहे. तर मार्गदर्शक किशोर पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार देखील मानले आहेत. आपल्याकडे मेहनत करण्यासाठी ताकद, एकाग्रता, जिद्द आणि परिस्थितीची जाण असेल तर आपण अनेक अडचणींवर मात करुन आपले ध्येय प्राप्त नक्कीच करु शकतो, असेही रुद्राक्षीने सांगितले. 

 

Read Previous

केबीपी कॉलेजच्या अंशुमन झिंगरानचा जलतरणमध्ये विश्वविक्रम

Read Next

धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया अंतर ९ तास ३६ मिनिटांत केले पार