छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
ए. आय. गुन्हेगारी वाढते आहे !
‘आमचा अँप डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलमधून कोणतेही दोन चेहरे निवडून त्यांचा एकमेकांचे चुंबन घेताना किंवा आलिंगन देताना व्हिडीओ तयार करा!' अशा प्रकारची जाहिरात आज सामाजिक संकेतस्थळांवर खुलेआम केली जात आहे. अशा प्रकारच्या व्हिडीओला सत्य मानून एखाद्याच्या सुखी संसारात विष कालवले जाऊ शकते, एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते. हे सारे ए.आय गुन्हेगारीचे परिणाम आहेत.
डिजिटल युगात ‘ए.आय.' अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने मोठ्या प्रमाणात क्रांती घडवून आणली आहे..ज्यामुळे ‘आज घंटोका काम मिनिटोमें' आणि ‘मिनिटोंका काम सेंकंदोमे' होऊ लागले आहे. आज अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्रासपणे केला जात आहे. वित्त, आरोग्य, शेती, बांधकाम, उद्योग, शिक्षण आदी माध्यमांत कृत्रिम बुद्धिमत्तेने शिरकाव केला आहे. प्रत्येकाच्या ‘मोबाईल'मध्ये ‘डाउनलोड' केलेले जवळपास सर्वच ‘अँप्स' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करताना दिसून येतात सामाजिक माध्यमांवरसुद्धा कृत्रिम बुद्धिमतेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मोबाईलवर एखादी ‘रील' आपण संपूर्ण पाहिली की त्यापुढच्या रिल्स सुद्धा त्याच विषयाच्या संदर्भातील माहिती देणाऱ्या आपल्या ‘मोबाईल'वर येऊ लागतात. यामागेसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचाच हात असतो.
भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला, तर जसा ‘डिजिटल' युगाचा कायापालट होईल तसे ‘डिजिटल' गुन्हेगारीहीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली होती. आज ते सत्यात उतरताना दिसत आहे. याच कृत्रिम बुद्धिमत्तेने हरियाणातील एका १९ वर्षीय तरुणाचा जीव घेतला आहे. महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या राहुल भारती नावाच्या तरुणाचा मोबाईल ‘हॅक' करण्यात आला आणि लगेचच त्याच्या व्हाट्सपवर त्याचे आणि त्याच्या तीन बहिणींचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मॉर्फ केलेले नग्न फोटो आणि व्हिडीओज येऊ लागले. हे फोटो आणि व्हिडीओज सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित न करण्यासाठी त्याच्याकडे पैशांची मागणी केली जाऊ लागली, ज्यामुळे तो प्रचंड तणावात गेला. या तणावाखालीच त्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले.
राहुलच्या व्हाट्सअप चॅटच्या आधारे राहुलला ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक केली असून त्यामध्ये त्याचा एक मित्रसुद्धा सहभागी झाला असल्याचे उघड झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्याचा चेहरा ‘मॉर्फ' केला जातो आणि ‘डिपफेक'द्वारे व्हिडीओ बनवले जातात. अशा छायाचित्रांचा आणि व्हिडीओजचा गुन्हेगारांकडून ब्लॅकमेलिंगसाठी किंवा एखाद्याला बदनाम करण्यासाठी वापर केला जात असल्याची प्रकरणे मागील काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घडली आहेत. रश्मीका मंदाना, अक्षय कुमार, कुमार सानू यांसारखे कलाकारही यातून सुटलेले नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्याचा चेहरा तर बदलला जातोच; याशिवाय खोटा आवाज तयार करून ब्लॅकमेलिंग केले जाते, खोटी सही तयार करून बँक खाते रिकामे केले जाते, चोऱ्या केल्या जातात, फसवणूक केली जाते. आमचा अँप डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलमधून कोणतेही दोन चेहरे निवडून त्यांचा एकमेकांचे चुंबन घेताना किंवा आलिंगन देताना व्हिडीओ तयार करा!' अशा प्रकारची जाहिरात आज सामाजिक संकेतस्थळांवर खुलेआम केली जात आहे. अशा प्रकारच्या व्हिडीओला सत्य मानून एखाद्याच्या सुखी संसारात विष कालवले जाऊ शकते, एखाद्याचे आयुष्य उध्वस्त होऊ शकते.
राहुल भरतीचा जीव गेला तसा अन्य कुणाचा जाऊ नये यासाठी अशाप्रकारच्या छायाचित्रांवर किंवा व्हिडीओजवर कोणीही सहज विश्वास ठेवू नये, त्यामागील सत्यता पडताळावी, जाणकारांचे आणि आवश्यक तिथे पोलिसांचे साहाय्य घ्यावे. सरकारनेसुद्धा अशा प्रकारची छायाचित्रे आणि व्हिडीओ बनवणाऱ्या अँप्सवर निर्बंध आणायला हवेत ! भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला; मात्र त्याचा वापर करण्याबाबत नैतिक धोरण आखले गेलेले नाही, त्याच्या गैरवापराविषयी वेगळे कठोर कायदे करण्यात आलेले नाहीत ज्यांची आज नितांत आवश्यकता आहे. - जगन घाणेकर