धसका..!

आम्ही एवढेपण गैरगुजरे नव्हतो. शाळेत जाताना आमच्या टोळक्यात सदूचा विषय निघायचा. बरीच खलबतं व्हायची, पण आमच्यातला संजू खूप समजदार होता. तो म्हणायचा "थोडं थांबा.” म्हणून पोरांनी दम काढला होता. संजूच्या डोक्यात त्याला चांगलं पटांगणात घ्यायचं होतं. नंतर एकदा त्याचं येता जाता संजूसोबतपण चांगलं वाजलं. संधी आल्याशिवाय कोणतीही कृती करायची नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलं म्हणून आम्ही वाट पाहत होतो....आणि ती संधी लवकरच आली व आम्ही त्याला आयुष्यभर लक्षात राहिल असा धडा शिकवला.

लहानपणी दररोज सकाळी ११ वाजेची शाळा जरी असली तरी आम्हीं मळ्यातली पोरं  जेवून खाऊन ९ वाजता पाटी दप्तर बगलेत अडकवली की निघायचो. शाळा आणि मळ्यात  जवळपास तीन साडेतीन किलोमीटर अंतर म्हणून घरचेपण पोरांना लवकरच शाळेला काढून द्यायचे. एकदा घरातून निघालो म्हणजे थोडं पुढे गेलं की हळूहळू  मुलांचं टोळकं जमायचं अन्‌ मग मुलं पुढे निघायची. रस्त्याने मुली मुलं स्वतंत्र घोळक्याने चालत असायची. मुलं रस्त्याने जाताना कुणाच्या चिंचा, कुणाची बोरं, कधी कैऱ्या तर कधी लाळ गाळणारी भोकरं असं ऋतूनुसार काही ना काही बरोबर शोधायची. बांधाच्या कडेला लावलेली किंवा आपोआप उगलेली ती फळांची झाडं जर रस्त्याच्या कडेला असली म्हणजे त्या शेतवाल्या मालकाला बराच येणाऱ्या जाणाऱ्यांचा वर्दळ सहन करावा लागायचा.  सकाळ संध्याकाळ तो जेव्हा त्याच्या शेताला चक्कर मारायचा  तेव्हा त्याला झाडाखाली पडलेले दगड, वर फेकून पुन्हा खाली पडलेली फूट दीड फूट लाकडाची टिपरं, न फुटणारी निब्बर काळ्या मातीची ढेकळं असं सारं दिसायचं. न जाणो ते सगळं पाहिल्यावर तो आम्हाला मनातल्या मनात कितीतरी चांगल्या शिव्या देत असणार याचा विचारही न केलेला बरा!  काहीही केलं तरी आम्ही शाळेतली पोरं म्हणजे वात्रटपणाचा कळस असायचा. एखादा मालक कोणत्या आमच्यातल्या पोराला वाकडं तिकडं बोलला म्हणजे त्यानं स्वतःहून ‘हात दाखवून अवलक्षण केल्यासारखं आपत्ती ओढवून घेतली असं समजून घ्यायचं. एखाद्यानं जर कोण्या पोराकडे तिरप्या नजरेने जरी पाहिलं तरी पोरं येता जाता त्याला चांगलीच अद्दल घडवायचे. बऱ्याच जणांना आमच्या खोडसाळपणामधला हा स्थायी भाव समजलेला होता म्हणून ते आमच्या नादाला लागत नव्हते.

आम्हाला रस्त्यात लागणाऱ्या पांढरीवरच्या मळ्यातला सदू खूप त्रास द्यायचा. त्याच्या वावरातून आमची पाऊलवाट होती. तिथे तो बाभळीच्या काट्या रस्त्यात आडव्या टाकायचा; तर कधी रस्त्यात मुद्दामहून पाणी सोडायचा. त्याच्या बांधाच्या कडेवर एक चांगलं मोठं बोरीचं झाड होतं. तिची बोरं पण खूप गुळमट लागायची! सीजन संपल्यावर खारकासारखं वाळलेलं बोर तोंडात टाकलं तर तासंतास आम्ही जिभेवर चघळत बसायचो..इतकं ते गोड होतं. त्याला कारणही तसंच होतं. ते विहिरीवरून वावरात जाणाऱ्या पाण्याच्या दंडाला लागूनच म्हणल्यावर वर्षभर त्याला पाणी मिळायचं आणि दरवर्षी तो तिच्या फांद्या डहाळायचा म्हणून दरवर्षी तिला येणारी बोरं एकदम निरोगी अन्‌ चवदार लागायची. किडीचं एखादंसुद्धा बोर औषधालादेखील नसायचं; इतकी ती बोर आमच्या संपूर्ण मळथडीत प्रसिद्ध होती. एक दिवस त्यानं असंच बोरं खाताना बघितल्यावर आमच्यातल्या एका पोराला शाळेत जात असताना दम दिला, ”चुतमारीच्या, तुमच्या बापाची ठेव ठेवली का? आमच्या बोरीला दगड मारताय येता जाता? पुन्हा सापडला तं तंगडं तोडून हातात देईन” असा बराच दम दिला. आम्हाला तर असं काहीतरी कारणच लागत होतं. एकदा तर काही कारण नसताना बळच मलासुद्धा त्याने खालीवर शिव्या दिल्या होत्या! तसं पाहिलं तर आम्ही एवढेपण गैरगुजरे नव्हतो. शाळेत जाताना आमच्या टोळक्यात सदूचा विषय निघायचा. बरीच खलबतं व्हायची, पण आमच्यातला संजू खूप समजदार होता. तो म्हणायचा "थोडं थांबा.” म्हणून पोरांनी एवढा दम काढला होता. संजूच्या डोक्यात त्याला चांगलं पटांगणात घ्यायचं होतं. नंतर एकदा त्याचं येता जाता संजूसोबतपण चांगलं वाजलं. संधी आल्याशिवाय कोणतीही कृती करायची नाही असं आमचं सगळ्यांचं ठरलं म्हणून आम्ही वाट पाहत होतो.

मध्यंतरी घटक चाचणीच्या परीक्षा सुरू होत्या तेव्हा सदुनं परत रस्त्यात काट्या टाकल्या होत्या. त्यातला एक काटा आमच्यातल्या एका पोराच्या पायात खुडला म्हणून आम्हाला खूप वाईट वाटलं. परीक्षा झाल्यावर आम्ही थोडं मोकळं झालो होतो. त्या दिवशी शाळा सुटून आम्ही घराकडे निघालो होतो. दिवस टेकायला आला होता. आम्ही सदूच्या वावराजवळून चाललो तर आमच्या अगोदर पुढं असलेली मुलं आम्ही मागून येईपर्यंत थांबली होती. संजू त्यादिवशी माझ्यासोबतच होता. सदूला आज अद्दल घडवता येईल असा आमचा बेत ठरला. त्यादिवशी त्या पोरांनी सदूला त्याच्या विहिरीत उतरताना पाहिलं होतं. दिवस टेकायला आला होता. विहिरीच्या कडेला एक झाड होतं त्या झाडाला त्यानं नाडा लावून तो खाली उतरल्याचं आमच्या मुलांनी पाहिलं होतं. क्षणाचाही विचार न करता आम्ही विहिरीजवळ गेलो व काठावरून गुपचूप खाली पाहिलं तर तो मोटरीला काहीतरी खोलखाल करत होता. इकडं पोरांनी सरळ झाडाच्या खोडाला बांधलेला दोर मोकळा करत सरळ खाली विहिरीत सोडला अन्‌ सगळी मुलं ज्याच्या त्याच्या घरी पसार झाले! नाडा खाली विहिरीत जेव्हा पडत होता तेव्हा मात्र सदूने खूप आरडाओरड केली ! नंतर तो रडायलासुद्धा लागला असं आमच्यातला एकजण सांगत होता. नेमकं काय घडलं हे त्यालापण कळलं नाही. संध्याकाळ झाली म्हणून त्यांच्याच खालच्या वावरातलं काम उरकून त्याची बायको झाडाला अडकवलेली पिशवी घ्यायला आली तेव्हासुद्धा तो खालून मोठ्याने ओरडत होता म्हणून तिला समजलं. शेवटी तिने आजूबाजूला आरडाओरडा करून माणसं जमा केली. सदूला आजूबाजूचे सुद्धा कदरलेले होते. लवकर मदतीलासुद्धा कोणी येत नव्हतं. नंतर त्याची बायको खूप गयावया करू लागली म्हणून लोकांनी विहिरीत दुसरा नाडा आणून सोडला अन्‌ त्याला वर काढलं. अंधार पडून गेला होता म्हणून त्या दिवशी जास्त काही न बोलता सगळे ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले होते. त्याची बायको मात्र त्याच्या स्वभावाला दोष देत होती. नंतर त्या बिचाऱ्या सदूच्या वागण्यात खूप बदल घडून आले. तो त्याच्या शेजारच्यांना, शेतातून शाळेत येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना परत कधीच ‘ब्र' शब्दसुद्धा बोलला नाही.. इतका त्यानं त्या गोष्टीचा ‘धसका' मनाला लावून घेतला होता. - निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी, मंडळ कृषी अधिकारी, लासूर स्टेशन जि. छत्रपती संभाजीनगर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

स्मरणात राहिलेले  प्रा. डॉ. राम माने