नेहा

पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापकाच्या पोस्टसाठी राजचा इंटरव्ह्यू झाला. यु आर सिलेक्टेड म्हणत प्राचार्यांनी राजचे अभिनंदन केले. पुढच्या महिन्यात रूजू होतो, राजने ॲाफर ॲक्सेप्ट करत सांगितले. तेवढ्यात एका अतिशय सुंदर तरुणीने प्राचार्यांच्या केबिनचा दरवाजा ठोठावत विचारले, सर एक मिनिट बोलायचे आहे, मी आत येऊ का? परवानगी मिळताच ती आत आली.

सर, गेले दोन आठवडे एकॅानॅामिक्सचे लेक्चर्स होत नाहीत. आमचं हे बी ए चं शेवटचं आणि महत्त्वाचं वर्ष आहे. गव्हाळ वर्ण, आकर्षक चेहरा, सडपातळ बांधा नि केसांचा आकर्षक बॅाबकट असलेल्या त्या तरूणीची शिकण्याची तळमळ स्पष्टपणे दिसून येत होती. हे तुमचे नवीन प्राध्यापक, पुढच्या महिन्यात रूजू होतील. प्राचार्यांना थँक्स म्हणून राजला मोठ्या आदराने वेलकम सर म्हणणाऱ्या त्या तरूणीकडे राज बघतच राहिला. या कॅालेजला सुंदर पोरींचे कॅालेज, असे उगाचच म्हणत नाहीत हे राजला मनोमनी पटले.
बरोबर एक महिन्याने राज रूजू झाला; परंतु एक क्षणही तो त्या सुंदर चेहऱ्याला विसरू शकला नव्हता. मी कधी रूजू होतो नी कधी त्या मोहिनीचे दर्शन घेतो असे त्याला झाले होते. मोठ्या उत्साहात राज रूजू झाला. पहिल्या दिवसाचा पहिला तास, टी वाय बी ए ला. इतक्या दिवसांची प्रतिक्षा आज संपणार होती. वर्गात शिरताच राजची नजर तीला शोधू लागली. एक नाही चक्क पाच दिवस तीचे दर्शन झाले नाही. ती आजारी तर पडली नसेल? की घरी काही प्रॅाब्लेम असेल? कुणाला विचारावं? नी काय विचारावं? साधं नांवही माहित नव्हतं राजला. महिना संपला पण ती दिसली नाही, राजची बेचैनी वाढली. बघता बघता वर्ष संपलं तरीही ती भेटली नाही. तीच्या त्या क्षणिक दर्शनाने राजला अस्थिर मात्र नक्कीच केले होते.

एका रविवारी गुडलक चौकातून चालत जाताना राजला बनपाव खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि काय तो योगायोग! राजला त्याचा शालेय मित्र वरद तिथे भेटला. राजने त्याची अस्वस्थता वरदकडे व्यक्त केली. राज तुला तीचा चेहरा नीट आठवतोय? वरदने विचारले. राज तीचे इत्थंभूत वर्णन करत होता नी वरद अगदी मन लावून ऐकत होता. बनपाव खाऊन झाल्यावर वरदने पांढऱ्या स्वच्छ पेपर नॅपकीनवर काढलेले चित्र पाहून राज दचकला. वरद अगदी हीच, हीच ती तरुणी.

राज मला खात्री आहे की मीही हीला कुठे तरी बघितले आहे.

वरद, मित्रा, कुठे भेटलास? तीचे नांव काय? प्रयत्न कर, काही आठवतं का?

राज, प्रभात रोडला माझ्या एका मित्राच्या बिल्डिंग मध्ये अगदी हुबेहूब अशीच मुलगी राहते. मी २-३ वर्षांपूर्वी दोनदा त्या मित्राकडे गेलो होतो तेव्हा चूकून मित्राच्या बाजूच्या पलॅटची बेल वाजवली आणि याच मुलीने दरवाजा उघडला होता.

वरद, चल आपण लगेच तिथे जाऊया. राज नी वरद मोठ्या आशेने तिथे पोहोचले.

त्या मुलीचे नांव नेहा, वरदच्या मित्राने सांगितले. काही महिन्यांपूर्वीच ती नासिकला शिपट झाली. नेहाचे आडनांव काय? राजने अधीरतेने विचारले. मराठे, वरदचा मित्र म्हणाला. आता नांव नी गाव समजले, कदाचित तीच्यापर्यंत पोहोचता येईल, राजची आशा पुलकित झाली. अरे, ती तिच्या मामाकडे रहायची आणि मराठे हे तीचे नव्हे तर तीच्या मामांचे आडनांव. राजची नुकतीच पुलकित झालेली आशा मावळली.

बेटा, भरपूर शिकलास, चांगली नोकरी मिळाली, आता कसली वाट पाहतोस? लग्न उरकून टाक. आई-बाबा मागे लागले. काय ऊत्तर देणार बिचारा राज? तुझ्या मामीने एक छान स्थळ आणले आहे. मुलगी एम ए आहे, नासिकला राहते, नांवही अगदी गोड आहे, नेहा. भयाण अंधारात राजला आशेचा किरण दिसला. राजने व्हिडिओ कॅाल केला; पण ती त्याच्या मनातली नेहा नव्हती.

राज, त्या नेहाला विसर आता. ती कोण आहे? कुठे आहे? काहीच माहित नाही. कदाचित तीचे लग्नही झाले असेल. कशाला स्वतःचं नुकसान करून घेतेस?

वरदने राजला समजावले आणि राजनेही ते मान्य केले. आई-बाबांच्या वधू संशोधन उपक्रमात आता तोही सहभाग घेऊ लागला.

राज सर, तुमच्याकडे पी एच डी साठी किती व्हेकन्सीज आहेत? प्राचार्यांनी विचारले. सर, फक्त एक व्हेकन्सी आहे, राज म्हणाला. माझ्या माहितीतील दोन मुली आहेत, मी त्यांना तुमचा नंबर दिला आहे, त्या फोन करतील तुम्हाला. दोघींचे नांव नेहा आहे, एक नेहा कुलकर्णी नी दुसरी नेहा जोशी. राजला पुनश्च आशा निर्माण झाली.

गुड मॉर्निंग सर, मी नेहा कुलकर्णी.

राज मोठ्या उत्साहात म्हणाला, आज कॅालेजला भेटूया म्हणजे नीट बोलता येईल.

सर, मी नासिकला असते. आज ऐवजी उद्या भेटू शकेल मी, चालेल का सर?

राजची एक दिवस थांबण्याची तयारी नव्हती. आपण आधी व्हिडिओ कॅाल करू या, नेहाला कधी पाहू असे राजला झाले होते. नेहा खूप हुशार होती पण ती राजला हवी असलेली नेहा नव्हती.

आता राज नेहा जोशीच्या फोनची वाट पाहत होता पण जोशीण बाईंनी काही फोन केला नाही. नेहा कुलकर्णीने दोन तीनदा फोन केला पण नेहा जोशीला बघितल्याशिवाय निर्णय घेणे कठीण होते.

राज सर, कोणत्या नेहाला घेताहेत तुम्ही? प्राचार्यांनी विचारले. सर,  नेहा कुलकर्णींशी बोललो मी पण नेहा जोशींनी अजून फोन केला नाही, त्यांच्याशी बोलल्यावर निर्णय घेतो. ऊद्या नेहा नासिकहून येणार आहे. मी तीला तुम्हाला भेटायला सांगतो. सर, जोशी की कुलकर्णी? राजने विचारण्याआधीच प्राचार्यांनी फोन ठेवला.

राज सर, नेहा आली आहे, माझ्या केबिनमध्ये या, प्राचार्यांनी सांगितले. कुलकर्णी नको, जोशी असू दे रे देवा, राजने मनोमनी प्रार्थना केली. हो ! ती जोशीच होती, नांवही माहित नसताना राज जीला शोधत होता तीच, जीला क्षणभर पाहून राज स्वतःला हरवून बसला होता. तीच राजला हवी असलेली सुंदर तरुणी. नेहा जोशीने नेहा कुलकर्णीवर मात केली होती आणि राजकडे असलेली एकमेव जागा मिळवली होती.

राजने नेहाला मनापासून मार्गदर्शन केले, गरजेपेक्षा जास्त मदत केली आणि नेहा पी एच डी झाली. नेहाच्या यशाने राज जाम खुश झाला;  पण नेहाने साधा फोनही केला नाही, राजने केलेल्या बहुमोल मदतीला ती काम होताच विसरली होती. मामांनी नुकत्याच आणलेल्या रीनाच्या स्थळाला होकार द्यायचे, राजने खूप विचारांती ठरविले.

राज सर, नेहाला भेटलात का? प्राचार्यांनी विचारले. नाही सर, मला वाईट वाटले, तीने साधा फोन सुध्दा केला नाही. मी दोनदा फोन केला पण तीने फोन घेतला नाही.
नेहाचं वागणं मलाही पटलं नाही, प्राचार्य म्हणालेत. राज सर, मला तीच्या बाबांकडून समजलं की ती एका तरुणाच्या प्रेमात पडली आहे आणि त्याच्याशीच लग्न करणार म्हणतेय.
कोण आहे तो भाग्यवान? काय करतो तो? राजने विचारले.

सर, हल्ली मुलींना फक्त डॅाक्टर किंवा इंजिनिअर मुलगा हवा असतो. तीनेही एक डॉक्टर मुलगा निवडला. राज सर, नेहाचे बाबा पुण्याला आले आहेत आणि त्यांनी मला घरी बोलावले आहे, चला तुम्हीही, प्राचार्य म्हणालेत.

नको सर, तुम्ही जा म्हणणाऱ्या राजला प्राचार्यांचा आग्रह मोडता आला नाही, दोघेही नेहाच्या घरी पोहोचलेत.

नेहा आणि तीच्या बाबांनी दोघांचे मोठ्या आदराने स्वागत केले. राज सर, मी माझा जीवन साथी निवडलाय, हे नेहाकडून ऐकताना राजला मनस्वी वेदना झाल्यात. नेहावरील प्रेम व्यक्त न केल्याचा त्याला पश्चात्ताप झाला.

राज सर, मला फायनल निर्णय घेताना तुमचा सल्ला आणि मार्गदर्शन हवेय. एक मिनिट बोलायचे आहे तुमच्याशी म्हणत नेहाने राजला आत नेले. सर, मला यांच्याशी लग्न करायचे आहे, हा पहा त्यांचा फोटो. तुम्ही हो म्हणालात तरच मी पुढे जाईन, नम्रपणे नेहा म्हणाली. आपण नाही सांगावे का? हा स्वार्थी विचार क्षणभर राजच्या मनात येऊन गेला. राज त्या फोटोकडे पहाताच राहिला कारण राज प्राचार्यांच्या केबिनमध्ये इंटरव्ह्यूसाठी आला असताना नेहा प्राचार्यांच्या केबिनमध्ये आली होती आणि तेव्हा तीने काढलेला तो राजचाच फोटो होता. म्हणजे केवळ राजच नेहावर नाही तर नेहाही राजवर भाळली होती, त्याला पाहताक्षणीच.

पी एच डी करताना नेहा राज सरांकडून खूप शिकली होती; पण लग्नानंतर मात्र राज सर अजूनही शिकताहेत त्यांच्या आवडत्या विद्यार्थीनी कम बायको नेहाकडून. - दिलीप कजगांवकर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 दिवाळीनंतरच्या प्रदूषणाचे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम