छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
दिवाळीनंतरच्या प्रदूषणाचे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम
दिवाळीनंतर मुंबईतील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. फटाक्यांच्या धुरामुळे हवेमध्ये विषारी कण आणि वायू यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वातावरणात अचानक होणारे हे बदल शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर विपरीत परिणाम करतात. साहाजिकच मुंबईकर-नवी मुंबईकर नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. रहिवाशांबरोबरीनेच डॉक्टरांची देखील चिंता वाढली आहे.
फुपफुसांना प्रदूषणाचा गंभीर परिणाम झेलावा लागतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत घरघर होणे आणि दमा वाढणे यासारखे त्रास होतात. संवेदनशील व्यक्तींमध्ये यामुळे श्वसनमार्गाला होणारा संसर्ग किंवा दीर्घकाळ चालणारा ब्राँकायटिसचा त्रास होऊ शकतो. त्वचेवरही प्रदूषणाचा परिणाम होतो. हवेतील सूक्ष्म कण आणि रसायनांमुळे अंगाला खाज सुटणे, त्वचा कोरडी पडणे, पुरळ आणि एक्झिमासारख्या समस्या वाढतात. धूर आणि हवेतील रसायनांमुळे डोळ्यांची जळजळ होते, डोळे लाल होतात, खाज सुटते आणि कंजंक्टिवायटिसचा (डोळे येणे) धोका वाढतो. मज्जासंस्थेवरही (नर्व्हस सिस्टीम) प्रदूषणाचा परिणाम होतो. शिसे आणि बेंझीनसारखे विषारी घटक डोकेदुखी, थकवा, नैराश्य, उदासीनता, ताणतणाव असे मनःस्थितीतील बदल असे त्रास उद्भवतात. हानिकारक धुराच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास मज्जासंस्थेशी संबंधित आजारांचा धोका वाढतो.
परिणामांची तीव्रताः
लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांना दीर्घकाळपासून आजार आहेत, त्यांच्या बाबतीत गंभीर गुंतागुंत होण्याचा धोका सव्रााधिक असतो, कारण त्यांची शरीरे विषारी पदार्थांचा निचरा करण्यास किंवा अशा प्रकारच्या परिणामातून बरे होण्यास कमी सक्षम असू शकतात.
श्वास घ्यायला त्रास होणे आणि तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियांसारख्या समस्यांसाठी तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते, विशेषतः ज्यांना दमा, सीओपीडी आहे किंवा ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, अशा लोकांसाठी हे गंभीर ठरू शकते अशावेळी मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी संपर्क साधावा.
क्वचित प्रसंगी, त्वचेचा संपर्क झाल्यास गंभीर संसर्ग होऊ शकतो, ज्यामुळे रुग्णालयात भरती करून उपचार करावे लागू शकतात.
संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी, धोका कमीत कमी व्हावा यासाठीः
कुठेही बाहेर जाताना एन ९५ किंवा सर्टिफाईड रेस्पिरेटर मास्क वापरा. त्यामुळे विषारी कण आणि हानिकारक वायू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकणार नाहीत.
जेव्हा प्रदूषण सर्वात जास्त असेल तेव्हा खिडक्या, दारे बंद ठेवा, घरामध्ये एअर प्युरिफायर वापरा.
बाहेर जाऊन आल्यानंतर प्रत्येकवेळी हात, चेहरा आणि त्वचेचा उघडा राहणारा भाग स्वच्छ धुवा, प्रदूषकांशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्या.
डोळ्यांच्या रक्षणासाठी ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स आणि प्रोटेक्टिव्ह आय वेयर वापरा.
दिवसभर भरपूर पाणी प्या, त्यामुळे शरीराची नैसर्गिक स्वच्छता प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते. अँटि ऑक्सिडंट्स भरपूर असलेला, संतुलित आहार घ्या, ते प्रदूषकांमुळे होणाऱ्या फ्री रॅडिकलच्या नुकसानीला तोंड देण्यास मदत करतात.
दीर्घकाळ चालणारे आजार ज्यांना आहेत अशा व्यक्तींनी आपल्या लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवावे, डॉक्टारांनी आखून दिलेली औषधे, पथ्ये यांचे नीट पालन करावे. बाहेर जाणे शक्यतो टाळावे.
खालील लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावाः
श्वास घेण्यात होणारा त्रास काही तासांपेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा तो वेगाने वाढत असल्यास.
त्वचेवर गंभीर पुरळ, संसर्ग, फोड (पाण्याने भरलेले फोड), किंवा पुवाने भरलेले फोड आणि जास्त लालसरपणा दिसून आल्यास.
डोळे लाल होणे, दुखणे किंवा दृष्टीमध्ये अचानक बदल झाल्यास.
डोकेदुखी, चक्कर येणे किंवा आजूबाजूला काय घडत आहे याबाबत गोंधळ होत असल्यास, आणि ही लक्षणे एका दिवसात कमी झाली नाहीत, तर लगेच तपासणी करून घ्यावी.
उपचार करण्यास विलंब केल्यास गुंतागुंत होऊ शकते, विशेषतः ज्या व्यक्तींना आधीपासूनच काही आरोग्य समस्या आहेत, त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते.
बरे व्हायला लागणारा वेळ आणि हॉस्पिटलायजेशनः
डोळ्यांची जळजळ, त्वचेवर पुरळ किंवा हलका खोकला यासारख्या सौम्य तक्रारी घरगुती उपचार आणि जास्तीत जास्त स्वच्छ वातावरणात राहिल्यास १-२ आठवड्यांत निघून जातात.
ज्यांना श्वास घ्यायला गंभीर त्रास, संसर्ग किंवा नियंत्रणात न येणारी लक्षणे आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असू शकते, विशेषतः जर ऑक्सिजन थेरपी किंवा इंट्राव्हेनस औषधे आवश्यक असतील तर.
अशा गंभीर परिस्थितीत, तब्येतीची मूळ स्थिती आणि कोणत्या अवयवावर परिणाम झाला आहे यानुसार बरे होण्यास काही दिवस तर काही आठवडे देखील लागू शकतात.
मुंबईतील दिवाळीनंतर वाढलेल्या प्रदूषणामुळे प्रत्येक नागरिकाने, विशेषतः संवेदनशील व्यक्तींनी, सतर्क राहून आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्वचेवर, डोळ्यांवर, फुपफुसांवर आणि मज्जासंस्थेवर होणारा, अल्प आणि दीर्घ-मुदतीचा परिणाम कमी करण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे, लक्षणांच्या गांभीर्याबद्दल जागरूक असणे आणि त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.
-डॉ चैतन्य कुलकर्णी, कन्सल्टन्ट, इंटर्नल जनरल मेडिसिन,
कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई