छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
कुणालाही कमी लेखणे हे गैरच!
कोणालाही कमी समजू नये. दोन रुपयाचा पेनसुद्धा दोन कोटी रुपयांचा चेक लिहिण्याचे काम करू शकतो. आपल्या संपर्कात जो येतो, त्याला प्रोत्साहन प्रतिसाद द्यावे. प्रत्येकजण आपल्या जागी योग्य असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. कोणी आपल्या पूढे असतो कोणी आपल्या मागे असतो. काही ना काही प्रतिभा प्रत्येकात असतेच. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास आहे तो. त्याचा मान ठेवण्याची मानसिकता असायला हवी.
काल माझी मैत्रिण रमाकडे गेले होते. रमा म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व. एकदम मितभाषी. दिसायला छान, सुंदर, श्रीमंत, उच्च शिक्षित, नोकरीत चांगल्या पोस्टवरून रिटायर्ड झाली. बाणेरला मोठा बंगला आहे. दोन्ही मुलं, भाऊजी डॉक्टर आहेत. स्वतःचे नर्सिंग होम आहे. तिचा मोठ्या मुलांचे अजयचे लग्न ठरले आहे. आज कार्याची सुरुवात म्हणून मुहुर्त वडे घालायचा कार्यक्रम आहे.
काही मैत्रिणी, नातेवाईक अशा सर्वांनाच आमंत्रण आहे. आजकाल पद्धती बदलल्या आहेत. प्रत्येक कार्यक्रमाचा ड्रेस कोड असतो, स्पेसिफिक जुनी नवीन प्रकारची गाणी, तसेच कार्य संपन्न करण्याच्या जुन्या पद्धतीचे सोयीनुसार नवीनीकरण असते.
उगीच कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता जसं जमेल तसं करतात. आजकाल नणंदा, जावापण पूर्वीसारखे मध्येमध्ये करत नाही. आपला मान आपण ठेवायला सर्व शिकले आहेत आणि तेच बरोबर आहे. विचारलं तर सल्ला द्यावा, हे आता जुन्या पिढीलाही कळले आहे. उगीच रूसवेफुगवे नसतात. आत्याबाई/जाऊबाई रागवल्या आहेत. असं वगैरे काही ऐकू येत नाही.
मी आणि माझी मैत्रीण सीमा आम्ही एकत्रच पोहचलो. सीमाचे इतक्यातच एक पुस्तक प्रकाशित झाले, त्यामुळे ती रमासाठी एक पुस्तक घेऊन आली होती. कार्यक्रम छान झाला. त्यातील महत्वाचे मुद्दे असे की, रामाकडे काम करणाऱ्या मावशीपण कार्यक्रमात आमच्यासारख्याच सहभागी होत्या. रमाने त्यांना मानाने आमच्या बरोबर बसविले होते.
रमा म्हणाली, "अगं !! कविता तू म्हणजे अजयची नंबर वन मावशी. तुझ्या अंगाखांद्यावर तो मोठा झालाय. तुझा मान पहिला."
आम्हाला सर्वांना म्हणाली, "तुम्हा सर्वांना मनापासून सांगते आज आमचे घर जे व्यवस्थित चालले आहे, ते फक्त आमच्या कवितामुळे मी नोकरी करू शकले. कविता म्हणजे माझा राईट हॅण्ड.”
‘हर मर्ज की दवा म्हणजे आमची कविता. सर्वांनाच या गोष्टीचे कौतुक वाटले. कौतुक दोघींचे, रमाचे आणि कविताचेही.'
आजकाल म्हणतात ना... देअर इज अ गुड मेड बिहाइण्ड एव्हरी सवसेसफुल वुमन. अर्थातच कवितासारखी घर सांभाळणारी आणि रमा सारखी आपलं समजून मान देणारी असावी लागते. हे नातं दोन्ही कडून असावं लागतं. बरे असो.
दुपारी दोनच्या सुमारास डॉक्टर मंडळी आपले क्लिनिक बंद करून घरी परतली. तिघांनी सर्वांची विचारपूस केली. अजय अनिलने सर्वांना नमस्कार केला. जेवण झाल्यावर डॉक्टर रमेश म्हणजे रमाचे मिस्टरांनी आपली बॅग उघडली. लॅपटॉप काढला. बरोबर दोन कवितांची पुस्तके काढली.
तेवढ्यात अनिल म्हणालाच "अरे बापरे !!! आली का पुन्हा ही पुस्तकं !!”
तो म्हणाला.. "बाबा!! कशाला घेता तुम्ही ? त्यांना का सांगत नाही, की आम्हाला यात काही इंटरेस्ट नाही.”
बाबा म्हणाले, "अरे !! ठीक आहे .मी जमेल तेवढं वाचून, माझ्या एका मित्राला देतो. आपला अभिप्राय मात्र नक्की सांगतो.”
अनिल म्हणाला, "बाबा !! असं करून आपण मध्यम प्रतीच्या लेखकांना/कविंना टाळ्या वाजवून उगीच सपोर्ट करतो. असं नाही का वाटत तुम्हाला ? आजकाल जो तो लिहितो, कविता करतो. अशाने समाजपण मध्यम प्रतीचा तयार होईल. क्वालिटी महत्वाची नाही का ?”
बाबा म्हणाले, "अनिल..यु आर रॉंग. मिडियॉकर इज ए कंपॅरेटीव्ह स्टेटमेण्ट. आपण डॉवटर जरी असलो तरी आपल्या क्षेत्रात आपल्याच विषयात आपल्यापेक्षा हुषार, जास्त शिकलेले डॉक्टर आजूबाजूला आहेत. अरे, कॉन्फ्रेंसला गेल्यावर कळतं की माझ्यापेक्षा वयाने लहान असलेली मुलं माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहेत. त्यांचा अनुभवपण जबरदस्त आहे. स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉवटर्स समोर आपण सर्व मध्यम प्रतीचेच आहोत. मग पेशंट्सने आपल्यासारख्या मध्यम प्रतीच्या डॉक्टरकडे का यावे?"
आपल्याला जेंव्हा हे लक्षात येतं एखाद्या पेशंटला दुसऱ्या स्पेशालिस्ट डॉक्टरची गरज आहे , तेंव्हा आपण त्याला तेथे रीफर करतो ना. अरे ! आपल्या संपर्कात जो येतो, त्याला प्रोत्साहन प्रतिसाद द्यावे. प्रत्येकजण आपल्या जागी योग्य असतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. कोणी आपल्या पूढे असतो कोणी आपल्या मागे असतो. काही न काही प्रतिभा प्रत्येकात असतेच. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास आहे तो. त्याचा मान ठेवावा. अरे.. कवि/लेखक म्हणजे शब्दांचे जादूगार असतात. शब्दांबरोबर खेळतात. एकाच शब्दाचे किती अर्थ असू शकतात? हे त्यांच्या कविता वाचून कळतं.लेखकाजवळ पांढरा कागद आणि काळा पेन असतो, तो आपले विचार लिहितो. या विचारांमध्ये समाजात सुधारणा करायची क्षमता असते.कोणत्याही क्षेत्रात सत्तर ते ऐंशी टक्के लोक मध्यम श्रेणीतच येतात. कदाचित यांची क्षमता अभ्यासात/शिक्षणात तेवढी नसेल पण दुसरे काही गुण नक्की असतीलच. तेंव्हा माणसाने थोडं शहाणं असावं थोडं खुळं. आपल्या बरोबर दुसऱ्यांच्या ही मनाचा विचार करावा. मी नेहमी म्हणतोच, अरे व्वा !! छान, मला वेळ मिळेल तसा नक्की वाचेन, माझ्या मित्रांनापण देईन. असेच लेखन करत रहावे. असा छोटासा अभिप्राय खूप झाला. असं म्हणून आपण खोटंही बोलत नाही आणि प्रोत्साहनही देतो.
मी म्हटलं, ”डॉक्टर!! तुमचे विचार खरच प्रोत्साहन देणारे आहेत. आज सीमानेपण तुमच्या साठी एक स्वलिखित पुस्तक आणले आहे. जेंव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की वाचावे.”
सीमाने आपले पुस्तक डॉक्टरांना दिले. अ स्मॉल ॲवट ऑफ लिसनिंग इज द ग्रेटेस्ट हेल्प/एन्करेजमेण्ट टू समवन कोणी सांगावे? आजचा बदक उद्याचा कदाचित गरूड असेल.
म्हणतात ना ...जगात कोणालाही कमी समजू नये. दोन रुपयाचा पेनसुद्धा दोन कोटीचा चेक लिहिण्याचे काम करू शकतो. - संध्या बेडेकर