नाटकांना मालवणीचा साज चढवणारे नाटककार गंगाराम गवाणकर हरपले

गंगाराम गवाणकर यांनी २० पेक्षा अधिक नाटके लिहीली.  मात्र, त्यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण नाटकानंतर मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या विशेषतः मालवणी बोलीतील नाटकांचा उदय झाला आणि त्याचा ठसा मराठी नाट्यसृष्टीत उमटला. वस्त्रहरण नंगतर मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची लाट  आली होती. वस्त्रहरणचे हिंदेी रुपांतरही करण्यात आले होते. मालवणी भाषा सातासमुद्रापलिकडे लोकप्रिय करण्याचे श्रेय निःसंशयपणे गंगाराम गवाणकर व मच्छिंद्र कांबळी याच जोडीला जाते. गवाणकरांना ‘मानाचि संघटने'चा लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार मिळाला होता. ‘झी मराठी' या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना  प्रदान करण्यात आला होता.

नाटकांमध्ये मालवणी बोलीभाषेचा भरजरी साज देऊन जगाच्या पटलावर आणणारे आणि मराठी नाट्यसृष्टीत मालवणी नाटकांचा पाया रचणारे प्रतिभावंत नाटककार  गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी ( २७ ऑक्टोबर २०२५ ) च्या रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून गंगाराम गवाणकर यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरू होते, दहिसर येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गंगाराम गवाणकर  यांचा जन्म १ जून १९३९ रोजी झाला. त्यांचे गाव राजापूर तालुक्यातील माडबन हे होय, ते मुख्यतः ‘वस्त्रहरण' या नाटकामुळे प्रकाशझोतात आले. त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एक सर्जनशील, मालवणी बोलीभाषेचा पुरस्कर्ता गमावला आहे. कोकणातील मालवणी बोलीभाषेला विनोदी नाट्यात्मक रूप देऊन, तिला मराठी नाटकांच्या मुख्य प्रवाहात आणणारे गवाणकर हे नाव मराठी नाटकाच्या इतिहासात ठळकपणे घेतले जाते. नाटकांमध्ये मालवणी भाषेला उंची गाठून देण्यात गवाणकर यांनी मोलाचे योगदान दिले.

त्यांनी आपले मुंबईतील सुरुवातीचे दिवस स्मशानात काढले, असे त्यांनी त्यांच्या ‘व्हाया वस्त्रहरण' या पुस्तकात लिहिले आहे. सन १९७१ मध्ये त्यांनी रंगभूमीवरील प्रवासाची सुरुवात बॅकस्टेज' वरून केली. त्याच काळात ते ‘एमटीएनएल' मध्ये नोकरी करीत होते;  पण नाट्यकलेवरील त्यांचे प्रेम इतके प्रखर होते, की नोकरीसह त्यांनी मराठी रंगभूमीशी घट्ट नाते जोडले. त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी तत्कालीन लोकांचे दारिद्रय आणि संघर्ष यांना विनोदी नाटकांच्या मार्गाने कलात्मकतेने रंगमंचावर आणले.

मालवणी नाटकांचे स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या गंगाराम गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण', ‘दोघी ', ‘वनरुम किचन ', ‘वरपरीक्षा', ‘वर भेटू नका',  कुटुंबसंस्था आणि मुलांवर होणाऱ्या दूरगामी परिणामावरील नाटक ‘उषःकाल होता होता' यांसारखी अनेक अजरामर नाटके लिहिली. ‘वात्रट मेले' या नाटकाचे तब्बल दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले; तर ‘वन रूम किचन' या नाटकाचे हजारो प्रयोग झाले. या नाटकांनी प्रेक्षकांचे हास्याचे कारंजे उडवत मनोरंजन केले. त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुंदर मिलाफ असल्याने ही नाटके संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. सगळीकडूनच या नाटकांना भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळाला. ठाणे येथे फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या  ‘जागर' या मराठी चित्रपटाचे संवादही त्यांनी लिहिले होते.

त्यांच्या ‘वस्त्रहरण' या नाटकाने मालवणी बोलीभाषेला मराठी रंगभूमीवर एक खास ओळख मिळवून दिली. जगभरात गाजलेल्या ‘वस्त्रहरण' नाटकात मालवणी बोलीभाषेचे मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी हे प्रमुख भूमिका करीत असत. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवात वस्त्रहरणचा प्रयोग झाला होता. मच्छिंद्र कांबळी यांनी या नाटकात काम केले होते. या नाटकात महाभारताची टिंगल केली आहे असा आक्षेप घेऊन हे नाटक बंद पडण्याचे बरेच प्रयत्न झाले होते. परंतु पु.ल. देशपांडे यांनी या विनोदी नाटकाला प्रोत्साहन देवून उचलून धरल्यामुळे हे नाटक चालू राहिले. या नाटकाचे ५४००हून अधिक प्रयोग झाले आहेत.

गवाणकर यांनी २० पेक्षा अधिक नाटके लिहीली. मात्र, त्यांनी लिहिलेल्या वस्त्रहरण नाटकानंतर मराठी रंगभूमीवर प्रादेशिक भाषेच्या विशेषतः मालवणी बोलीतील नाटकांचा उदय झाला आणि त्याचा ठसा मराठी नाट्यसृष्टीत उमटला. त्यांना ‘मानाचि संघटने'चा लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार मिळाला होता. त्याचप्रमाणे ‘झी मराठी' या दूरचित्रवाणी वाहिनीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता .

त्यांनी काही लेखन आणि संपादनही केले. त्यात त्या काळातील अनेक गाजलेल्या किश्श्यांना साठवून ठेवणारे त्यांचे आत्मकथन ‘व्हाया वस्त्रहरण'  हे पुस्तक आजही  रसिकांमध्ये लोकप्रिय आहे. तसेच ऐसपैस (कादंबरी),  ‘चित्रांगदा' (लेखसंग्रह, अनुवादित, मूळ लेखक - रवींद्रनाथ टागोर ) हे देखील त्यांचे एक उल्लेखनीय लेखन म्हणून ओळखले जाते. कोकणी मालवणी भाषेतील विनोदी नाटकांना मराठी नाटकांच्या लाटेत आणून अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांना विनम्र अभिवादन -!
- शिवाजी गावडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

कुणालाही कमी लेखणे हे गैरच!