शहरे गुदमरली... श्वास कोंडला

दिवाळी नंतर अस्थमाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या दूषित हवेचा सव्रााधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक व व्याधीग्रस्त रुग्णांना बसला शिवाय फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या बातम्याही आपण टीव्हीवर पाहिल्या. अनेक मुले फटाक्यांमुळे जखमी झाले तर काही ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागून दुर्घटना घडल्या. त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. हे सर्व टाळायचे असेल तर किमान पुढील वर्षांपासून तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायला हवी  

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही दिवाळीच्या दिवसात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या फटाकेबाजीमुळे देशातील प्रमुख शहरात रात्रीच्या वेळेत हवा प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे समोर आले आहे. दिवाळीतील सोमवार ते बुधवार या तिन्ही दिवशी  देशातील प्रमुख शहरांच्या हवेचा निर्देशांक वाईट स्तरावर होता. त्यामुळे आधीच प्रदूषित असलेल्या शहरांची हवा आणखी प्रदूषित झाली. वास्तविक फटाकेमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा असे आव्हान अनेक सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी केले होते. शालेय शिक्षण विभागाने तर  शालेय विद्यार्थ्यांना फटाके उडवणार नाही अशी शपथ दिली. न्यायालयाने फटाके उडवण्यास परवानगी दिली मात्र वेळेचे बंधन घातले या सगळ्या आव्हानांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून मनसोक्त फटाकेबाजी केली.

वास्तविक फटाक्यांचे दुष्परिणाम सर्वांना माहीत आहेत. तरीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सरकारच्या आणि सेवाभावी संस्थांच्या आव्हानाला हरताळ फासत सर्वत्र फटाक्यांचा बेसुमार धूर काढण्यात आला त्याच्या व्हायचा तो परिणाम झालाच. फटाक्यांमुळे अनेक शहरांची हवा प्रदूषित झाली विशेषतः  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या  मोठ्या शहरातील हवेचे प्रदूषण चिंता वाटावी इतक्या गंभीर पातळीवर जाऊ लागले. जी शहरे कमी प्रदूषित श्रेणीत गणली जात होती, त्या शहरातही हवेचे प्रदूषण कमालीचे वाढल्याचे समोर आले आहे. मुंबई पुण्याच्या तुलनेत ग्रामीण भागात कमी प्रदूषण असते; मात्र यावेळी ग्रामीण भागातही प्रदूषण कमालीचे वाढले. ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतके प्रदूषण वाढल्याचे पाहायला मिळाले. या प्रदूषणाला फटाकेच जबाबदार आहेत. दिवाळीत बेसुमार फटाकेबाजी करण्यात आली त्यामुळे चांगली हवा असलेली शहरे अशी ओळख असलेल्या शहरांचीही प्रदूषित शहरांत गणना होऊ लागली. अर्थात मुंबई, नवी मुंबई, ठाणे हीच शहरे नाही तर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर यासारख्या शहरातही फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषण वाढले.  

केवळ राज्यातीलच नाही तर देशातीलही अनेक शहरात फटाक्यांमुळे प्रदूषण वाढले. विशेष म्हणजे देशातीलच नव्हे तर  जगातील सव्रााधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या दिल्ली  शहरातील हवा मात्र समाधानकारक या श्रेणीत गणली  गेली आहे. दिल्लीतील हवा अतिप्रदूषित या श्रेणीतून समाधानकारक श्रेणीत गणली गेली. याचे कारण म्हणजे यावर्षी दिल्लीत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली होती आणि या बंदीचे कसोशीने पालन करण्यात आले होते या उलट आपल्या राज्यात मात्र उत्सवाच्या नावाखाली  लोकांनी मनमानी करत बेसुमार फटाक्यांची आतषबाजी केली, त्यामुळेच दरवर्षीपेक्षा यावर्षी अधिक प्रमाणात फटाके उडवण्यात आले त्याचाच परिणाम म्हणजे राज्यातील अनेक शहरे अतिप्रदुषित किंवा प्रदूषित श्रेणीत गणली गेली. अर्थात हवा प्रदूषित होण्यास केवळ फटाके हेच एकमेव कारण आहे असे नाही तर वाढती वाहने हेही एक महत्वाचे कारण यामागे आहे; मात्र दिवाळीत प्रदूषणाची पातळी खूप वाढते हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. आता हेच पहा ना..नरकचतुर्दशीच्या सोमवारी संध्याकाळी पुण्याच्या हवेची पातळी समाधानकारक या श्रेणीत होती ती अवघ्या चोवीस तासात वाईट या श्रेणीत पोहचली.

याचाच अर्थ बेसुमार फटाकेबाजीने हवा प्रदूषित झाली. हवा प्रदूषित झाल्याने शहरांचा जीव गुदमरला आणि नागरिकांचा श्वास कोंडला. दिवाळी नंतर अस्थमाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या दूषित हवेचा सव्रााधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक व व्याधीग्रस्त रुग्णांना बसला शिवाय फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याच्या बातम्याही आपण टीव्हीवर पाहिल्या. अनेक मुले फटाक्यांमुळे जखमी झाले तर काही ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागून दुर्घटना घडल्या. त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. हे सर्व टाळायचे असेल तर किमान पुढील वर्षांपासून तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायला हवी. सरकारनेही फटाक्यांवर बंदी आणायला हवी आणि हो ही बंदी केवळ दिवाळी पुरतीच नको तर कायमस्वरूपी हवी कारण दिवाळी व्यतिरिक्त इतरवेळीही फटाके वाजवले जातात दिवाळीत त्याचे प्रमाण अधिक असते इतकेच कदाचीत त्यामुळेच दिवाळीत फटाक्यांचे दुष्परिणाम तीव्रतेने दिसून येतात.    
-श्याम ठाणेदार 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

नाटकांना मालवणीचा साज चढवणारे नाटककार गंगाराम गवाणकर हरपले