छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
सण साजिरे गोजिरे
संपूर्ण जगतात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. हल्ली अमेरिकेत तो अगदी व्हाईट हाऊस मध्येही साजरा केला जातो एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद साजरा केला जातो. बाकी सौ. ट्रम्प आपल्या ट्रम्प तात्यांना उटणं लावून ऊन ऊन पाण्याने अंघोळ घालत असावी या बद्दल माहित नाही आणि अभ्यंगस्नान आटोपल्यावर छीरोथे..आपले चिरोटे फोडत असेल का माहित नाही. आम्ही भारतीय कम मराठी अजूनही फोडतो; मग त्यातला कडवट गर किंचितसे जिभेला लावतो.
मंडळी, आम्ही..म्हणजे अस्मादिक पूर्वी म्हणजे लहानपणी आम्ही लहान होतो म्हणजे अजूनही लहानच आहोत असं आम्हाला नातू झाला तरी काहीच कसं कळत नाही. आता अक्कल येणार कधी असे म्हणून आमच्या कर्तृत्वाचे पार चिरोटे करून टाकते. अर्थात हे ऐकायची सवय झाली आहे. आणि रिटायर झाल्यापासून माझ्यावर मुक्तहस्ते लाखोल्या वाहत उधळण करत असते. तर आमच्या लहानपणी आमच्याकडे तांब्याचा बंब असायचा. रात्रीच सगळी कामे आटोपली की कंदील रशिने ओढून त्यात तेलाने भरलेला ग्लास आणि वातीचा मंद प्रकाश खाली मातीच्या ओटल्यावर काढलेली सुंदर ठिपक्यांची रांगोळी! अहाहा सगळं भारावून गेलेलं वातावरण. कधीतरी वासूदेव अंगणात यायचा. त्याकाळी पहाटे चार वाजता उठायचो. थंडी शंभर टक्के असायचीच. तर सांगायची गोष्ट अशी की मंद समईच्या उजेडात आणी बत्ती च्या उजेडात आई अंगाला उटणे लावायची. अशा उघडबंब शरीराने काकडत राहाचचे. तो पर्यंत आई, ताई, दादा यांची त्या बंबातल्या मस्त गरम पाण्याने अंघोळ केली जायची. स्वर्गीय सुख ज्याला म्हणतो ते हेच. ते अनुभवलेली आमची पिढी. पहाटे अण्णा (आमचे पूज्य पिताश्री) रेडिओ चालू करायचे आणि उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची प्रसिद्ध शहनाई धून बस्स ! यातूनच वातावरण निर्मिती. काही नको. काय गमंत आहे पहा. दिवाळी सण तसा हिंदूंचा पण शहनाई एका मुस्लिम कलाकाराने वाजवलेली धून. अगदी सर्वांग तृप्त व्हायचे अजूनही अजरामर शहनाईला तोड नाही. अजूनही तो मधुर स्वर कानात फिट्ट जाऊन बसलाय. कितीही धर्मावरून लढाया होऊ द्या उस्तादांची शहनाई ती टिपिकल धून आणि इसाकभाईचे फटाके आणि लखलखती चंदेरी सारी दुनिया हे गोड गाणं अजूनही मन जाऊन बसते त्या आठवणीच्या खळाळत्या ओढ्यात. खूप बदललं. नव्या पिढीने कदाचित आनंदाचा पॅटर्न बदलला. खरंच मित्रांनो सगळं बदला; पण आमच्या पिढीने जो गोडवा अनुभवला तो कदाचित तुमच्याकडे सोपवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तो फक्त सांभाळा. कारण आमचीच पिढी शेवटची पिढी असू शकेल, जी तांब्याच्या बंबातले गरम पाण्याचे महत्व, ते बेडेकरांचे सुगंधी उटणे, चिरोटे फोडून त्यातला कडवट गर चाखण्यात मिळणारा आनंद घेणारी होती. मग खास दिवाळीसाठी बाबांनी दिलेला नवा शर्ट, फुटलेल्या लवंगी फटाक्यांची दारू गोळा करून सुरसुरी करण्यातली मजा आणखी काही बरेचसे क्षण आमच्या पिढीने त्या दिवाळीच्या दिवशीच अनुभवले. मजा बघा.. दिल्लीतला ताजमहाल देखो कुतूबमिनार देखो.... आयुष्यातला ताजमहाल त्या गंम्मतवाल्याने प्रथम दाखवला, मग जवळच रंगावली प्रदर्शन बघायचो, आमच्या जवळच्या मैदानात भैय्याच्या कुस्त्या व्हायच्या... नुसत्या आठवणीने हसायला येते.
हे क्षण अनुभवले आहेत खूप मोठा आठवणींचा ठेवा आहे. म्हणजे मेंदू विस्मृतीत जाण्यापूर्वी लिहितोय. हल्ली माणसं मेसेजवर भेटतात, बाजारहाट ऑनलाईन होते. सगळंच यूज अँड थ्रो व्हायला लागलं. नाती नका होऊ देऊ बघा ‘व्हाईट हाऊस'मध्ये दिवाळी साजरी होते. उद्या उटणे लावतील.. त्याचेही पेटंट सांगतील. आपण हॅपी दिवाळी बोलतो..कदाचित ते शुभ दीपावली म्हणतील ! काही सांगता येत नाही... माझ्या मात्र भरभरून शुभेच्छा. तुमचाच आनंदयात्री. - राजन वसंत देसाई