जगातील पहिल्या क्रमांकाची शाळा !

गेल्या काही दिवसात समस्त भारतीय शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटावा अशी एक घटना घडली. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला जगात पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून बहुमान मिळाला. ११ ऑवटोबर २०२५ रोजी राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय श्री. दादासाहेब भुसे यांनी जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेला जगाच्या नकाशावर घेऊन जाणाऱ्या स. श्री. दत्तात्रय वारे गुरुजींचा त्यांनी सत्कार केला आणि त्या कार्यक्रमाने आदर्श शाळा कशी उभी राहते यासंदर्भात एक सामान्य शिक्षक म्हणून काही गोष्टी प्रकर्षाने माझ्या लक्षात आल्या. त्या आपल्यासमोर मांडाव्यात म्हणून हा लेख प्रपंच.

        जालिंदर नगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या विकासाची मला समजलेली वैशिष्ट्ये : स. श्री. दत्तात्रय वारे गुरुजींनी शाळेच्या विकासासाठी जालिंदरनगरच्या पंचक्रोशीतील स्थानिक लोकांचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सहभाग मिळवला. त्यामुळे शाळेला जागा व इतर मूलभूत सुखसोई उपलब्ध झाल्या. शाळेला गरज लागेल तेव्हा गावकऱ्यांनी आपला महत्त्वपूर्ण वेळही दिला. स्थानिक उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांचाही सक्रीय सहभाग मिळाला. ‘अरे, केवळ श्री. दत्तात्रय वारे गुरुजींचे नाव मोठे होत आहे, आपल्याला काय करायचे?' असा विचार कोणी केला नाही. या उलट सर्वांनी या ज्ञानमंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य केले. ‘केवळ पाच-साडेपाच तास काम करावे, सुट्टीच्या दिवशी सुट्टी घेतलीच पाहिजे, सुट्टीच्या दिवशी अध्ययन अध्यापन केलं तर त्याचा वेगळा मोबदला मिळाला पाहिजे.' असा विचार तेथील शिक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांनीही केला नाही ही विशेष उल्लेखनीय बाब मला जाणवली. आपल्या गावातील शाळा उत्कृष्ट झाली पाहिजे, त्यातून आपल्या गावातील मुले ही ज्ञानाच्या विविध क्षेत्रात उंच उंच झेप घेण्यास सिद्ध झाली पाहिजेत. ही भावना सर्वांनी जपली. या समर्पण वृत्तीमुळेच जालिंदरनगरच्या जिल्हा परिषद शाळेची मुलं ज्ञानाची उंच उंच शिखरे पदक्रांत करण्यात सिद्ध झाली. हीच पुढे गेलेली मुले रिकामा वेळ मिळेल तेव्हा आपल्या शाळेलाही वेळ देऊ लागली.

        आपल्या गावातील शाळा व शाळेतील विद्यार्थी सर्व दृष्टीने उत्कृष्ट झाले पाहिजे ही भावना गावकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात स. श्री. दत्तात्रय वारे गुरुजी यशस्वी झालेत, पण त्यांच्या विचारांना मिळालेली स्थानिकांची साथ हा तितकाच महत्त्वाचा विषय आहे. काही व्यक्तींचे व्यक्तिमत्व विशेष मधाळ व लाघवे असते. माणसे त्यांच्यावर कोणत्याही स्वार्था शिवाय मनापासून प्रेम करतात. हे कोणी चित्रपटातील हिरो नसतात. पण खऱ्या अर्थाने जनतेचे हिरो होतात.

       खरंतर मानवी जीवनात सहज साध्य असे काहीच नसते. आज स. श्री. दत्तात्रय वारे गुरुजींच्या जालिंदरनगरच्या शाळेला जगात नंबर एक स्थान मिळाले ही एक असामान्य गोष्ट असली तरी ते स्थान मिळवण्यात या आदरणीय गुरुजींचा महत्त्वाचा वाटा आहे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध झाली, सामान्य माणसाने ठरवले तर असामान्य गोष्ट घडून येते. तरीही वारे गुरुजींचे स्वतःचे जीवन एक अग्निपरीक्षाच होती. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आपल्याला बघावयास मिळतात. अशाच चढ-उतारांचा परिणाम म्हणून आपल्यावर झालेला अन्याय दूर होईपर्यंत चप्पल न वापरण्याचा त्यांनी निर्धार केला होता. आज स. मंत्रिमहोदयांच्या साक्षीने व आपल्या स्वतःच्या गुरुंच्या आदेशाने त्यांनी चप्पल घालण्याचे मान्य केले.

      वारे गुरुजींनी राबवलेल मॉडेल राज्यात सर्व शाळांमध्ये पोहचविण्याचा निर्धार या कार्यक्रमात दिसून आला. शिक्षण मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांनी स. श्री. दत्तात्रय वारे गुरुजींचा केवळ सत्कारच केला नाही; तर व्यासपीठावर स्वतःच्या बाजूला हात धरून बसवले. हा खऱ्या अर्थाने केवळ श्री. दत्तात्रय वारे गुरुजींचा सन्मान नसून मराठी शाळांच्या अशा प्रतिकूल परिस्थितीत झोकून काम करू इच्छिणाऱ्या समस्त राज्यातील शिक्षकांचा सन्मान आहे. त्याबद्दल त्यांचे मानावे तितके आभार कमीच.
 -प्रशांत पुंडलिक शिरुडे
के.रा.कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जीवन सुंदर आहे हे कळण्यासाठी शाळा निर्माण झाली