साठीनंतरचीं कार्य सिद्धता

माझ्या या उतारवयातही एका फूड सप्लाय कंपनीत सामान पोहचवण्याचे काम करणाऱ्या मित्राला कामाला जाणं भाग आहे! उत्पन्न अतिशय मय्राादित अन्‌ दायित्व खूप मोठं आहे! माझं पेन्शनने जेमतेम भागतं! तरीही मित्राच्या त्या सहज विचारलेल्या प्रश्नांनी माझे डोळे पाणावले होते! मला पेन्शन तरी आहे, जगण्याचा आधार आहे! मित्राला कमविणे कर्मप्राप्त आहे!! या वयातही त्यांच्या कर्म जिद्दीला सॅल्यूट ठोकला! जगण्याची नवीन उमेद मिळाली! त्यांच्या कष्ट करण्याच्या ऊर्जेमुळे माझं म्हातारपण कुठल्या कुठे पळून गेलं! मी मनोमन तरुण घोड्यासारखा दिसू लागलो!

नुकतीच दिवाळी गेली! आनंद पेहरत आठवणी ठेवून गेली!..दिवाळीपूर्वी मी आमच्या गल्लीतून चाललो होतो! गल्ली तशी अरुंदचं आहे! गल्लीतून जाता येता बोलता येत असतं!  जाता जाता गल्लीत नवीनच राहायला आलेले अन्‌ ओळख झालेले मित्रवर्य घरासमोर त्यांची दुचाकी पार्किंग करतांना दिसलें! त्यांच्या पाठीवर भली मोठी बॅग अडकवलेली होती! मित्र साधारण माझ्याचं वयाचे असतील! अर्थात  चौसष्टीत पोहचलेल ते व्यक्तिमत्व तरुणालाही लाजवतील असे दिसत होते! त्यांच्या घरासमोरून जाता येता भेटत असतात! त्यांची सततचीं  धावपळ पाहात चुकून भेटले तर नमस्कार करीत, दोन शब्द बोलणं झाले की ते घाई गडबडीत आपल्या नियमित कामात निघून जातात!

मित्र आजही नेहमीप्रमाणे भेटले! ते घाईत असूनही थांबून बोलले! सहज बोलून गेले, ‘नानाभाऊ तुम्ही कुठे कामाला आहात का?' मीही सहज बोलून गेलो! नाही! घरीच इकडेतीकडे गप्पा हानीत बसतो! त्यावर ते बोलले,' नाही...नेहमीचं जाता येता दिसतं असता. कुठल्याही वेळेस मी आलो की आपण दिसता! कामाला नसतील कुठे बघा, मी एका प्रोसेस्ड फूड सप्लाय कंपनीत कामाला आहे! तेथे तुम्हांला लावतो कामाला!'  ते पुढे बोलत होते, हे फेरीचं काम आहे! बॅगेत पॅकिंग फूड असतं! आपण मागणीप्रमाणे पोचतं करायचं! जितक्या फेऱ्या तितके पैसे मिळतात! गाडी आपलीच असते! यायचं असेल तर सांगा मी कामाचा जुगाड लावतो!' त्यांना घाई होती! वयस्कर असूनही जोश दिसत होता! दिवाळी असल्याने, सीजन जोरात होता! जाता जाता बोलून गेले, तुम्हांला तुमची गाडी घेऊन यावं लागेल! हे पहा असं माझ्या बॅगेतलं सामान कस्टमरनें ऑनलाईन मागवलेलं आहे! ते कस्टमरला पोहचवलं की झालं! तुम्हालाही तेचं काम करावं लागेल! अहो हल्लीची नवीन पिढी घरात बसून ऑनलाईन वस्तू मागवतात! आपण ऑर्डर प्रमाणे गल्ली बोळात घराचा पत्ता शोधायचा! गूगल मॅप मदत करीत असतंच! सामान पोहचवलं की झालं! एक एक ट्रिपचे १५० ते २०० रुपये मिळतात!' मित्र एका दमात सर्व बोलून गेला होता! मी विस्फारलेल्या डोळयांनी त्यांचा कामाचा उरक आणि जोश पाहात होतो! त्याच्याकडे पाहतांना माझी मलाच लाज वाटतं होती! वय चौसष्ठ झालं म्हणून काय झालं? मित्राच्या बोलण्यात, कृतीत १०० %   कॉन्फिडन्स होता! जिद्द, उत्साह होता!

मित्र....वयाच्या ६४ व्या वर्षी दिवसभर पुण्यातल्या गर्दीतून व्यवस्थित मार्ग काढीत, ऑर्डरप्रमाणे माल पोहचवायचं काम करीत होते! दिवसभर पळापळीने जीव थकून जात असेल! त्यांचं वय पाहिलं तर थोडी काळजीही वाटत होती! ६४ व्या वर्षी दोन चाकी वाहन चालवितांत! दगदगीने, ट्राफिकनें थकून जात असतील!

गंज लागलेल्या शरीराला वंगण, ऑइल पाणीची गरज असते! शरीरातील चरबी वितळण्यासाठी घाम गाळावा लागणे ठीक आहे! वयाला हरवीत अवघड गोष्ट सहज शक्य करणारी माणसं या दुनियेत जिद्दीने उभी आहेत! कधी परिस्थितीमुळे म्हणा तर कधी वेळ जावा म्हणून कामं करणारी माणसं असतात! उतारवयात वेळ घालवणे सर्वात मोठी अवघड बाब असते! आपण कुठेतरी कामाला असतो! काम सुटतं! रिटायर होतो! मग बसून अंगावर चरबी वाढू लागते! अंग दुःखी, पाठ दुःखी, आळस कुठे काम करावंसं, फिरावंसं वाटत नाही! हातपाय चालेनासे होतात! वेळ जात नाही!जीव कोंडल्यागत होतों! मग डॉक्टरांची औषधी घेऊन उभं राहायचं! शारीरिक, मानसिक आजार बळावू लागतात! आर्थिक परिस्थिती चांगली आहे असं समजू शकतो; पण शरीराला हालचाल नाही! व्याधीग्रस्त जगणं नकोसं होतं! स्वतःला अन घरच्यांना देखील अशी व्यक्ती नकोशी वाटते! मनासाठी आउटलेट हवं असतं! घराला उतारवयातही आर्थिक मदत करणारी जेष्ठ मंडळी असतात! उभं आयुष्य कष्ट करूनही पळत राहणे नैतिकदृष्टया योग्य वाटत नसतं! तरीही स्वतःस अडकवून वेळ अन आर्थिक स्त्रोत म्हणून उभे असतात!

मित्राचं बोलणं माझ्या हृदयाला खोलवर जाऊन भिडलं होतं! त्याच्या बोलण्यातून अनेक प्रश्न मागे ठेवून गेले! खरंच आहे घराला हातभार लावायलाचं पाहिजे! कामं केली पाहिजेतच! ६४ वर्ष वय म्हणजे तसं नुकताच उताराला लागलेली पहिली पायरी आहे! धावपळ करायला हरकत नाही! या वयातही कामाला जायला हरकत नाही! शरीर साथ देतंय, तंदुरुस्त आहे तोवर काम केलेच पाहिजे! त्यातून शारीरिक व्यायाम देखील होत असतो! पण काही व्यक्ती फक्त स्वतःच्या विशिष्ट कोशात जगत असतात! कामास समर्पित आयुष्य जगत असतात! पैसा पाणी कमावतात! समाजात काय उलथ्यापालथी चालू आहेत याचीं चाहूलही लागली पाहिजे! सामाजिक भान, गंध जरूर असावा! मी, माझं कुटुंब, तेच विश्व समजणाऱ्या व्यक्ती अनेक घटनांचे साक्षीदार होण्यास पुढे येत नाहीत! यांचं वय झालं तरी इतिहास, भूगोल, राजकारण अर्थकारणाशी काही देणे घेणे नसतं! असलं मय्राादित विश्व तरी काय कामाचं? उतरत्या वयात मेहनत जरूर करावी! शरीर अन समाज सांभाळून जीवन जगत राहायचं! तरुणपणी शरीर हाडं लवचिक असतं! पूढे ठिसूळ होत जातांत! कुणाच्याही आधाराशिवाय जगणे म्हणता येणार नाही!

शरीर साथीला आहे तोवर काम करीत आनंदात जगणे, एखादा छंद जोपासून स्वतःचा वेळ जावा अन श्रम व्हावं! पोट अन सामाजिक बांधिलकी जपत राहणे उत्तम असतं! नुसतंच पैसे कमविणार मशीन होऊन चालत नसतं! आपलं आयुष्य स्वतःला बांधायचं असतं, इतरांना नाही! मन स्वातंत्र्य असलं की आयुष्य सुंदर असतं! आपण माणसात राहणारा प्राणी आहोत! मशीनला भावना कळत नसतात! मशीनने फक्त उत्पादक घटक म्हणून राबणं असतं! माणूस मुळात बुद्धिजीवी प्राणी आहे! त्याला भावना असतात! जगाशी काहीही देणेघेणे नसणारी माणसं रोबोट असतात! सुख-दुःख माणसाच्या जीवनाशी निगडित येणारे महत्वपूर्ण स्टेशनं आहेत! मन मोकळे करण्यासाठी भावना जागृत असाव्या लागतात! ते मनाचे आउटलेट असतात! मित्र, समाज हे निचरा होणारे आउटलेट आहेत उतार वयात माणूस अतिशय हळवा, भावनिक होऊ लागतो! एकटेपण नकोसं वाटतं! कोणीतरी सुख दुःख जाणणारा असावा अशी अपेक्षा असते! रडण्या-हसण्याचं जग कळू लागतं! माणूस समाजप्रिय प्राणी असल्याने समाज कळू लागतो! मन मोकळे करण्यासाठी माणूसच पाहिजे!

माझ्या ओळखीच्या मित्राने त्यांच्या स्वभावानुसार प्रश्न केला होता! मी देखील वयाचा विचार करता काम करणं गरजेचं आहे! माझं काम करण्याचं क्षेत्र थोडं भिन्न असल्यामुळे त्यातीन कमाई नाही! पण मन अडकवायला, छंद जोपासायचं ते क्षेत्र आहे! मी शासकीय सेवेतून रिटायर झाल्याने ईश्वरकृपेनें पोटापूरती पेन्शन मिळत आहे! काम धंदा करीत नाही! पण वेळही पुरत नाही! नुसताच हिंडत असतो! कुणाला गडकिल्यांच्या नादी लावतो, कुणाला ज्येष्ठ नागरिक संघाच्या नादी लावतो! साहित्यिक मित्रांच्या नादी लावतो! जमलंच तर योगाच्या क्लासच्या नादीही लावतो!देशासाठी स्वतःस अर्पण करावंसं वाटतं! माझ्या भारत देशासाठी जीव ओवाळून टाकावासा वाटतो! या सेवेत स्वार्थी, कमावू भाव नाही! त्यात आर्थिक उत्पन्न नाही; पण मनाच्या घोड्याला आवर घालण्यासाठी छंद जोपासतो आहे!

माझ्या मित्राला कामाला जाणं भाग आहे! उत्पन्न अतिशय मय्राादित अन दायित्व खूप मोठं आहे! माझं पेन्शनने जेमतेम भागतं! तरीही मित्राच्या त्या सहज विचारलेल्या प्रश्नानी माझे डोळे पाणावले होते! मला पेन्शन तरी आहे, जगण्याचा आधार आहे! मित्राला कमविणे कर्मप्राप्त आहे!! या वयातही त्यांच्या कर्म जिद्दीला सॅल्यूट ठोकला! जगण्याची नवीन उमेद मिळाली! त्यांच्या कष्ट करण्याच्या ऊर्जेमुळे माझं म्हातारपण कुठल्या कुठे पळून गेलं! मी मनोमन तरुण घोड्यासारखा दिसू लागलो! खरारा करून घेत म्हतारपणाच्या जाणीवेला लाथ मारून उधळतों आहे! पुण्यात पोटासाठी आलेल्या नोकरदार माणसाकडे कुठे अन्‌ कसली आली शेती? आपण रिटायर झालो, नोकरीतून कार्यातून नाही! मला घाम गाळायचा होता! अन योगा वर्गाला जाण्यासाठी निघालो होतो! मन अन शरीर वयाच्या ६४ व्या वर्षी घासून घ्यायचं होतं! साठी नंतरचीं र्कायसिद्धता पार पडायची होती!
 -नानाभाऊ माळी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सण साजिरे गोजिरे