अस्वस्थ मन

का कोण जाणे ? पण मला डोळ्यासमोर दिसलात तुम्ही दोघी... तू आणि मिनू ! आज साहेबांवर जी वेळ आली ती भविष्यात कधी माझ्यावर आली तर तुझं नि मिनूचं काय होईल या विचारानं मी अस्वस्थ झालो. मला काहीच सुचेना. सतत डोळ्यासमोर तेच दृश्य दिसत होतं. घरी आलो तरी मी स्वस्थ नव्हतो गं ! आणि तुला तरी हे कसं सांगायचं या विचाराने आणखीनच घाबरलो. माझी ही अवस्था तुझ्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हतं; पण मी तरी काय करणार होतो ? काल जे साहेबांचे झालं तसंच आपलं काही झालं तर ? या एकाच विचाराने मनाला चैन पडत नव्हती.

 आज सकाळी नेहमीप्रमाणे तो लवकर उठला. रोज उठल्याबरोबर किमान अर्धा तास तरी व्यायाम करायचाच. गेली अनेक वर्षांची ही सवय. अगदीच कधी बाहेर गेला वा रात्री उशिरा झोपल्याने उठायला उशीर झाला तरच त्यात खंड पडायचा. पण तेही महिन्यातून नव्हे तर वर्षातून अगदी दोन चार वेळाच. व्यायाम झाला की, सारं आटपायचं. आंघोळ करायची फ्रेश व्हायचं आणि पेपरवाल्याने टाकलेला  महाराष्ट्र टाईम्स' घेऊन सोफावर वाचत बसायचं चांगला अर्धा पाऊण तास जायचा त्यात.

 जगभरातल्या घडामोडींची खबर घेऊन झाली की, चहा घ्यायची आठवण व्हायची. सौ.ने दिलेला आलेयुक्त गरमागरम चहाचा मग हातात धरुन शांतपणे त्याचा आस्वाद घेण्यातली मजा काही औरच ! रोजचा दिनक्रम त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू व्हायचा. ऑफिसची तयारी करत असतानाच एखादा फोन आला की, त्यात दहा पंधरा मिनिटे जायची. ठरल्या वेळी निघायचं असल्याने सौ. चा टिफीन हातात पडायचा. बाहेर इतकी हॉटेल्स आणि ऑफिसचं चांगलं कॅन्टीन असूनही फार क्वचितच तिथे जायची वेळ यायची. मुळातच घरच्या जेवणाची लज्जत वेगळीच असते.

  सौ. ला नि मिनूला टाटा बाय बाय करुन एकदा का बाहेर पडला की, डोक्यात ऑफिसचे विचार चालू व्हायचे. मग दिवसभर त्यात एवढं गुंतून जायला व्हायचं की, इतर गोष्टींकडे लक्षच द्यायला वेळ नसायचा. संध्याकाळी घरी आल्यावर सौ. च्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मिनूने अलगद येऊन मारलेली मिठी पाहून दिवसभराचा सारा क्षीण , त्रास कुठच्या कुठे पळून जायचा. फ्रेश होऊन आला की, मग दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाईपर्यंत तो फक्त आणि फक्त या दोघींचाच ! कधीतरी बाहेर एखादा फेरफटका, कधी तरी एखादा सिनेमा किंवा नाटक, तर कधीतरी खरेदीसाठी बाहेर जाणं व्हायचं. बस्स ! एकदम मजेत, आनंदात आणि शांतपणे सगळं चाललं होतं.

 पण....आज काय झालं माहीत नाही. सकाळी उठल्यापासून एकदम मूड गेल्यासारखंच वाटत होतं त्याला. कसला उत्साहही वाटत नव्हता. त्याच्या एकूण हालचालीतील फरक आणि चेहऱ्यावरची अस्वस्थता सौ.च्या नजरेतून सुटली नाही. फक्त तो स्वतःहून आपल्याला काही सांगतोय का याची ती वाट पाहत राहिली आणि त्याला मात्र तिला जराही दाखवायचं नव्हतं म्हणून तो गप्प गप्प होता. असा पाठशिवणीचा खेळ शेवटी किती वेळ चालू राहणार ना? रोजच्या सवयीप्रमाणे त्याला काही झाल्याचं तिला काही कळलंच नाही असं भासवत तिनं अगदी सहजपणे विचारलं, आज ऑफिसला दांडी, टूरचा बेत किंवा अजून काही प्लॅन आहे की काय?

त्याला नवलच वाटलं. चेहऱ्यावरची एक रेषा बदलली तरी तिच्या नजरेतून सुटायची नाही. आज काय झालंय की, तिला त्याची एवढी अस्वस्थता जाणवू नये  की, समजून ही ती मुद्दाम दुर्लक्ष करतेय. त्यानं अनिच्छेनेच सारं आटपलं नि हॉलमध्ये खुर्चीत येऊन बसला. सौ. ने आणलेला नाष्टा त्याने घेतला.. पण आज ना कमेंट ना चोरटा कटाक्ष !

ही अशी सारी कथा तुमच्या आमच्यासारख्याच मधु आणि मालिनीची. लग्न  होऊन सहा सात वर्षं झाली. एक छोटसं फुलपाखरूसुद्धा घरात भिरभिरायला लागलं. सारं अगदी ठरल्याप्रमाणे कसलं, ठरवूनच छान चाललं होतं. आणि..... आज अचानक या सुखाला, सुखी संसारला कुणाची तरी दृष्ट लागली. घड्याळात दहा वाजले आणि सकाळपासून दाबून ठेवलेलं सगळं मालिनीला मनात ठेवणं शक्य झालं नाही. ती मधुजवळ येऊन बसली. त्याचा तो विमनस्क चेहरा पाहून तिने त्याचा हात हातात घेतला. तो हळुवारपणे दाबला आणि ती काही विचारणार त्याआधीच मधुलाही भरुन आलं. त्याने अचानक तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तो हमसून हमसून रडायला लागला,

माले, आपण कुणाचं काय गं बिघडवलंय ? आजपर्यंत होईल तेवढं स्वतःबरोबर दुसऱ्यांसाठी ही चांगलंच केलंय. खूप अशा अपेक्षाही आपल्या एकमेकांकडून नव्हत्याच. जे आहे त्यात समाधानाने आनंदाने आपण राहत होतो ना ? तरीही आपल्या वाट्याला हे का बरं ? मला, का कोण जाणे आज काहीतरी विचित्र घडण्याची भीती वाटते नि अस्वस्थ होतंय. शारीरिक दुखणं असतं तर आपण डॉक्टरांकडून उपचार केले असते. पण तसं अजिबात नाही. माले, आपल्याला एकमेकांचाच आधार आहे गं ! आपला विरंगुळा म्हणजे आपली मिनू. यापेक्षा आपल्याला ना काही हवंय, ना काही कमी पडलंय.

मालिनीच्या सारं लक्षात आलं. सकाळपासूनची त्याची अस्वस्थता आणि नजरेतला फरक तिला जाणवला होताच. पण आजपर्यंत गेल्या सात आठ वर्षांत अशी एकही गोष्ट नव्हती ; जी त्याने तिच्यापासून लपवून ठेवली होती. मग आजच याला असं का वाटलं की, मी विचारेपर्यंत त्याने मला काहीच सांगितलं नाही. तिने त्याला हळुवारपणे थोपटलं. त्याचा रडण्याचा आवेश ओसरला आणि तो उठून बसला. जवळच टीपॉयवर ठेवलेल्या ग्लासात तिने त्याला पाणी दिलं. तो शांत झालेला पाहून तिने विचारलं, मधु, अरे नेमकं काय झालं ते सांगशील का ? तुझं मन मोकळं कर. मधुने स्वतःला सावरलं आणि तो सांगू लागला... माले, अगं काल सकाळी मी नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलो आणि कामाला सुरुवात केली. छान काम चालू होतं. सर्व स्टाफ नेहमीप्रमाणे कामात गर्क होता. मला एक दोन पत्र टाईप करायची होती ती मी टाईपही केली. लॅपटॉप बंद केला आणि साहेबांच्या केबिनकडे गेलो. दरवाजावर टकटक केली नि मे ‘आय कम इन सर' असं बोललो. आतून काहीच प्रतिसाद आला नाही, म्हणून हळूच दरवाजा थोडा किलकिला करुन आत डोकावलं आणि आतलं दृश्य पाहून अक्षरशः ओरडलोच.

 माझा आवाज ऐकून सर्व स्टाफ धावत आला. त्यांना वाटलं मलाच काहीतरी होतंय. क्षणभर मलाही काही सुचलं नाही. मी फक्त साहेबांच्या केबिनकडे बोट दाखवलं. एकानं दरवाजा ढकलून आत पाहिलं नि त्याचीही अवस्था माझ्यासारखीच झाली होती. बाकीचे सारे आत गेले, तर साहेब खुर्चीवर मान टाकून पडले होते. एवढा गोंधळ गोंगाट चालू असूनही त्यांना काहीच कळलं नाही. याचाच अर्थ ते बेशुद्ध पडले असावेत. सर्वानी प्रथम त्यांना खुर्चीतून बाहेर काढले नि जमिनीवर झोपवलं.एकाने डॉक्टरांना फोन लावला, कुणी तोंडावर पाणी मारतोय तर कुणी हाका मारतोय. थोड्या वेळातच डॉक्टर आले. त्यांनी तपासलं आणि ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं असं सांगताच ऑफिसमधील दोन चारजण ॲम्बुलन्स मागवून त्यांना घेऊनही गेले. मी मात्र तिथेच थांबलो. साहेबांच्या घरी फोन लावायचा खूप प्रयत्न केला; पण तो लागलाच नाही.

साधारण अर्ध्या तासानंतर माझाच फोन वाजला  तर माझ्या एका सहकाऱ्याने हॉस्पिटलमधून फोन केला होता. साहेब आता स्टेबल आहेत. माईल्ड ॲटॅक आला होता पण वेळेवर उपचार मिळाल्याने सारं निभावून गेलं. घरीही फोन लागला नि त्यांना सांगताच साहेबांची पत्नी आणि दोन मुलं हॉस्पिटलमध्ये पोहोचलीसुद्धा.

 माले, हा सारा प्रकार पाहिला नि मी हादरलोच गं ! का कोण जाणे ? पण मला डोळ्यासमोर दिसलात तुम्ही दोघी... तू आणि मिनू ! आज साहेबांवर जी वेळ आली ती भविष्यात कधी माझ्यावर आली तर तुझं नि मिनूचं काय होईल या विचारानं मी अस्वस्थ झालो. मला काहीच सुचेना. सतत डोळ्यासमोर तेच दृश्य दिसत होतं. घरी आलो तरी मी स्वस्थ नव्हतो गं ! आणि तुला तरी हे कसं सांगायचं या विचाराने आणखीनच घाबरलो. माझी ही अवस्था तुझ्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हतं; पण मी तरी काय करणार होतो ? काल जे साहेबांचे झालं तसंच आपलं काही झालं तर ? या एकाच विचाराने मनाला चैन पडत नव्हती. माले, आपला छोटासा संसार, आपली भविष्याची स्वप्नं आणि आपलं पिल्लू हेच माझं जग आहे गं ! असं म्हणून मधुला पुन्हा हुंदका आवरेना. मालिनीने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तेव्हा ते पत्नीचं प्रेम नव्हतं; तर ती जणू होती आईची माया ! हे सारं पाहून बावरलेली मिनू चटकन दोघांच्या जवळ धावत आली नि तिने दोघांनाही घट्ट मिठी मारली. तिला त्यातलं काहीच कळलं नव्हतं. अर्थात तिचं ते वयच नव्हतं. मात्र, आई- बाबांना आज पहिल्यांदाच ती रडताना पाहत होती. मधुने तिचा एक गालगुच्चा घेतला आणि कालपासून असलेलं अस्वस्थतेचं मळभ क्षणात दूर झालं.
- विलास समेळ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दिवाळी : उजळलेली घरं, पण अंधारलेलं मन !