दिवाळी : उजळलेली घरं, पण अंधारलेलं मन !

 भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण ही केवळ धार्मिक प्रथा नसून, ती समाजाच्या चेतनेचे प्रतिबिंब असते. दिवाळी हे त्या सर्व सणांमधले सव्रााधिक लोकप्रिय, सव्रााधिक प्रतीकात्मक आणि सव्रााधिक अर्थपूर्ण पर्व आहे. परंतु आजच्या काळात हा सण आर्थिक उपभोगवादाचा आणि सांस्कृतिक आडमुठेपणाचा उत्सव बनू लागला आहे. फटाक्यांचा आवाज वाढतोय, पण संवाद कमी होतोय; घरं उजळतात, पण माणसं मात्र अधिक एकाकी होत आहेत. या विरोधाभासावर विचार करणे आज आवश्यक आहे.

 दिवाळीचा मुळ अर्थ आहे. अंधःकारावर प्रकाशाचा विजय. अंधार म्हणजे अज्ञान, अन्याय, भ्रष्टाचार, असमानता आणि द्वेष; तर प्रकाश म्हणजे ज्ञान, न्याय, करुणा, आणि विवेक. आपल्या समाजात आज हे दोन्ही घटक पुन्हा एकदा आमनेसामने उभे आहेत. आपण डिजिटल युगात पोहोचलो आहोत, पण विचारांच्या अंधारातून अजून बाहेर आलो नाही. भ्रष्टाचाराच्या धुरात सत्य हरवतंय, आणि धर्माच्या नावाखाली द्वेषाचा फटाका फोडला जातोय. अशा वेळी दिवाळी आपल्याला आठवण करून देते. खरा प्रकाश म्हणजे विवेकाचा प्रकाश.

  दिवाळीच्या दिवसांत बाजारपेठा उजळतात, पण त्याच वेळी समाजातील लाखो हात रिकामे राहतात. एका बाजूला जाहिरातींनी, ऑफर्सनी आणि विलासात जगणाऱ्या वर्गाची दिवाळी होते; तर दुसऱ्या बाजूला रोजंदारी गमावलेल्या, शेतकरी संकटात सापडलेल्या, आणि बेरोजगारीच्या अंधारात जगणाऱ्यांची दिवाळी निःशब्द असते. प्रकाशाचा हा असमतोल आपल्याला समाजातील आर्थिक अन्यायाची जाणीव करून देतो. खरं तर, दिवाळीचा सण आपल्याला "सामाजिक समतेचा प्रकाश” पसरवण्याची प्रेरणा द्यायला हवा. पण आज हा प्रकाश काहींच्या घरातच साठला आहे. आजचा भारत आर्थिक, तांत्रिक आणि राजकीयदृष्ट्या पुढे गेला असला तरी लोकशाहीचा दीप मंदावलेला जाणवतो. राजकारणात विचारांचा अंधार आणि मतांच्या विक्रीचा बाजार उजळलेला दिसतो. संविधानाच्या मूल्यांना दुय्यम स्थान देत असताना दिवाळीचा "सत्याच्या विजयाचा” संदेश अधिक अर्थपूर्ण वाटतो. आपण साजरे करतोय स्वातंत्र्याच्या प्रकाशातला सण, पण स्वातंत्र्याच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय. म्हणून दिवाळी आज फक्त उत्सव नाही; ती लोकशाहीतील विवेकाची चाचणी आहे.

 दिवाळी म्हणजे फक्त भौतिक सुखाचा उत्सव नव्हे, तर तो संस्कृतीच्या सातत्याचा आणि नवतेच्या मिलाफाचा क्षण आहे. आज आपण पश्चिमेकडील उपभोग संस्कृतीचं अंधानुकरण करताना पारंपरिक मूल्यांना विसरतोय. दिवाळीचा मूळ हेतू ‘आनंद वाटणं' हा होता, ‘दाखवणं' नव्हे. आपल्या सणांच्या आत्म्याला परत मिळवणं हे आजचं सर्वात मोठं आव्हान आहे. आपल्या संस्कृतीचा आत्मा "सहभाेजनात” आहे, "स्पर्धेत” नाही. दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश काही दिवस टिकतो; पण विचारांचा प्रकाश टिकवला, तर संपूर्ण समाज उजळतो.

 या वर्षी आपण प्रत्येकाने एक संकल्प करू या. अंधानुकरणाऐवजी विचार करणे, खर्चाऐवजी करुणा वाढवणे, धर्माच्या नावावर द्वेष न पसरवणे आणि समाजात समतेचा दीप पेटवणे. दिवाळी हा सण नाही, ती आपल्या अंतरात्म्याची परीक्षा आहे. आपण खरंच प्रकाशाच्या बाजूने आहोत का? प्रत्येक वर्षी दिवे लावून आपण म्हणतो, "अंधार जावो, प्रकाश येवो.” पण आजचा काळ विचारतो तो अंधार नेमका कुठे आहे? जर तो आपल्या अंतःकरणात, आपल्या समाजव्यवस्थेत, आपल्या राजकीय संस्कृतीत शिरला असेल, तर फक्त दिवे पुरेसे नाहीत. त्याकरिता विचारांचाही दीप पेटवावा लागेल. विचार, संवेदना आणि जबाबदारी यांनी उजळलेली दिवाळी, हीच खरी प्रकाशपर्वाची व्याख्या. आपण सर्वांनी ती अंगीकारावी, हीच शुभेच्छा !

"फटाके संपतात, पण विचारांचा प्रकाश कधीही मावळू नये;
कारण समाज वाचतो तो सणांनी नाही, तर विवेकाने.”
-प्रवीण बागडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

फेरफटका