छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
मराठी चित्रपटातील दिवाळी
सण आणि चित्रपट यांचे अतूट नाते आहे. भारतीय संस्कृतीचे दर्शन चित्रपटातून आपणास वेळोवेळी पाहण्यास मिळते. त्यात दिवाळी हा सण म्हणजे सर्व सणांचा राजा. ह्याचं दर्शन तर चित्रपटात बऱ्याच वेळा आलेले दिसते. भारतीय लोकांच्या जीवनात चित्रपट एक अविभाज्य घटक आहे. चित्रपटातील आभासी जीवन आपल्याला आपलं वाटतं. आपल्या जवळचं वाटतं.
दिवाळी हा सर्वांचा आवडता सण आहे. अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील व पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. रांगोळ्यांनी अंगण आणि दार सजले जातात. दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.
दीप आपल्याला प्रकाश देतो. त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने ‘अंधःकार दूर करा व आपलं मन चांगल्या भावनेने उजळून टाका, मनामनात आनंद निर्माण करून आनंदाची देवाणघेवाण करू या.' दिवाळीच्या सणातून आपण ऐक्य भावना शिकतो. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. दिवाळीला नवीन कपडे आणि नटूनथटून सण साजरा केला जातो. घराची सजावट, रोषणाई आणि फराळाचा उत्साह या दिवशी न्याराच असतो.
मराठी चित्रपटातील पहिले दिवाळी गीत प्रभात फिल्म कंपनीच्या ”माणूस” (१९३९) या चित्रपटात होते. दिग्दर्शक आणि संकलक चित्रपती व्ही. शांताराम यांच्या या चित्रपटात ‘दिवाळी दिवाळी आली' हे गाणे आहे. हे गाणे अनंत काणेकर यांनी लिहिले असून संगीत मास्टर कृष्णराव यांचे आहे. चित्रपटाच्या नावातच दिवाळी असलेला चित्रपट म्हणजे भाऊबीज. १९५५ साली वैभव चित्रचा ‘भाऊबीज' हा सामाजिक चित्रपट आला. या चित्रपटाची पटकथा, निर्मिती आणि दिग्दर्शन राजन कुमार यांचे आहे तर कथा, संवाद आणि गीते कवी संजीव यांची आहे. या चित्रपटात सुलोचनादीदी, चंद्रकांत, सूर्यकांत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे, ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळिते भाऊराया'. दिवाळीच्या दिवसांमध्ये बहिणीला सर्वात जास्त ओढ असते ती म्हणजे भाऊबीजेची. सुलोचनादिदींच्या सहजसुंदर अभिनयाने हे गाणं तितकंच ताजेतवाने वाटते. कारण त्या निमित्ताने भाऊराया खास बहिणीच्या घरी ओवाळणीसाठी येतो. या दिवशी भावाकडून छानसं गिपट उकळण्यात एक मजा असते. आशा भोसले यांनी खूपच छान गाणं गायलं. हे या चित्रपटातील गाणे सर्वकालीन लोकप्रिय आहे, आजही रसिकांच्या ओठावर ते गीत येते; एक अजरामर गीत.
मराठीतील सर्वकालीन लोकप्रिय दिवाळी गाणे म्हणजे, शरद पिळगावकर निर्मित आणि राजदत्त दिग्दर्शित ‘अष्टविनायक' (१९७९) या चित्रपटातील ‘आली माझ्या घरी दिवाळी' हे पडद्यावर वंदना पंडितने साकारलेले गाणे होय. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकजण दिवाळीचा सण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या घरी दिवाळी साजरी होणार याचा एक निराळा आनंद असतो. अशा वेळी ‘आली माझ्या घरी दिवाळी' हे गाणं तुमच्या मनाला अधिकच प्रसन्न करू शकते. प्रत्येक कार्यक्रमात अथवा घरोघरी ऐकलं जातं. यातील ‘आली माझ्या घरी ही दिवाळी'... हे गाणं अभिनेता सचिन पिळगांवकर आणि वंदना पंडित यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. शांताराम नांदगावकर यांच्या शब्दांना अनिल-अरुण यांनी संगीत दिले आहे.
कालांतराने २००७ साली सुभाष फडके दिग्दर्शित ‘ओवाळिते भाऊराया' हा रंगीत सामाजिक चित्रपट पडद्यावर आला या चित्रपटाची कथा पटकथा संवाद सौ. नीता देवकर यांचे आहेत. गीते प्रवीण दवणेची तर संगीत नंदू होनप यांचे आहे. या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी, प्रिया बेर्डे, स्मिता तळवळकर, तृप्ती भोईर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गॅगरी अल्मेडा हे या चित्रपटाचे निर्माते होते.
‘आई पाहिजे' या आशा काळे यांच्या चित्रपटातही एक दिवाळीचे गाणे आहे. या चित्रपटात आशा काळे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ज्यामध्ये भूतकाळाची आठवण येताना दिवाळीवर आधारित एक गाणे दाखवण्यात आले होते. ‘आली दिवाळी आली दिवाळी' या गाण्यातून घरोघरी साजरी होणाऱ्या दिवाळीच्या सणाचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. यातील सुंदर बोल ऐकून घरातील दिवाळीचे वातावरण आधिकच प्रसन्न होऊ शकते. हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायले आहे, संगीत अशोक पत्की यांचं आहे.
प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘बायकोचा भाऊ' या चित्रपटातील हे दिवाळीसाठी चित्रित करण्यात आलेलं गाणंही दिवाळीच्या सणाला नक्की ऐकायला हवं असं आहे. दिवाळीच्या दिवसात घरात असलेले मंगलमय वातावरण, भाऊबीजेच्या दिवशी भावाच्या ओवाळणीसाठी असलेली ओढ यात दाखवण्यात आलेली आहे. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ म्हणून सिंधुताई चंद्राला ओवाळतात. कारण त्यांचा भाऊ अनंत परागंदा झालेला असतो. तो एकदा परत येतो. आशा भोसले यांनी हे गाणं गायलं आहे, पी. सावळाराम यांच्या गीताला वसंत प्रभू यांचं संगीत आहे.
‘दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीत'... हे गीत ‘ते माझे घर' या चित्रपटातील आहे. गीतकार रवींद्र भट यांच्या गीताला सुधीर फडके यांचे संगीत असून आशा भोसले यांनी ते गायले आहे. सीमा देव यांच्यावर हे दिवाळीचे गीत चित्रित झाले आहे. ‘दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार, घरोघरी' हे गीत ‘माझा मुलगा' या चित्रपटातील आहे. हा चित्रपट १९७६ सालचा. या गीताच्या गायिका अनुराधा पौडवाल, कवी आणि संगीतकार यशवंत देव हे आहेत.
ही मराठी गाणी आजही लोकं आवडीने ऐकतात. दिवाळी सणाची वातावरण निर्मिती ह्या गीतांनी नक्कीच होत असते. ह्या गीतांनी रसिकांच्या मनावर गारूड केलं आहे. जणू ह्या गाण्यांशिवाय दिवाळी सणाला मजा येणार नाही. - प्रा. जयवंत पाटील