छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
अर्थ : असा आणि तसा
आपण जे शब्द, वाक्ये, वाकप्रचार ऐकतो... त्यांचे सरळसरळ दिसणारे अर्थ सोडुन अनेकदा वेगळे गर्भित अर्थही असतात. बऱ्याचदा ‘लेकी बोले सुने लागे' असाही प्रकार आढळून येतो. आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिलावर्गाने म्हणी, वाकप्रचार, उखाणे यातून अर्थपूर्ण रचना परंपरेने पुढच्या पिढ्यांकडे संक्रमित केल्या होत्या. मात्र अलिकडच्या काळात नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवार यांच्यात आधीसारखा एकोपा, जिव्हाळा न राहिल्याने लोकांचे एकत्रीकरण मंदावले आहे व बोलणे व सुसंवादही थंडावला आहे. त्यामुळे नुकसान असे झाले आहे की नव्या पिढीच्या अनेक शिलेदारांना भाषा, तिचे विविध अर्थ, त्यांचा प्रभाव, परिणाम, झटका यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
दोनच आठवड्यांपूर्वी वाशीमधील साहित्य मंदिरात प्रा. अशोक बागवे यांचा ज्ञानेश्वरीवरील पसायदानाबाबतचा एक सुरेख कार्यक्रम शिवतुतारी प्रतिष्ठान, प्रा. माणिकराव किर्तने वाचनालय व ठाणे जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठेवण्यात आला होता. त्याला निमंत्रणावरुन पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचा योग आला आणि एका अत्यंत सुंदर, संस्मरणीय, आपले शब्दविश्व संपन्न करणाऱ्या प्रसंगाचे साक्षीदार होता आले याचा मनस्वी आनंद झाला. पत्रकारांनी केवळ ‘दोन ठार तीन जखमी', ‘रामभाऊंचा सत्कार आणि सखुबाईवर अत्याचार' किंवा ‘शिंदे यांचा नाईकांना टोला' अथवा ‘उबाठाला आणखी गळती' अशाच बातम्यांमध्ये गुरफटून न घेता याही पलिकडे जग आहे व तेथेही विविध गोष्टी घडत असतात..ज्या आपल्याला सकारात्मकतेकडे नेतात याचाही विचार करावा असे मला नेहमी वाटत असते. प्रा.अशोक बागवे हे मराठी साहित्य सृष्टीतील एक नामांकित सन्माननीय व्यक्तीमत्व आहे. मी असे ऐकून आहे की ते ज्ञानसाधना महाविद्यालयात मराठीवरील व्याख्याने देत असत त्यावेळी मराठी हा विषय न घेतलेले विज्ञान, वाणिज्य शाखेचे काही विद्यार्थीही आपापली नेहमीची लेवचर्स बुडवून प्राध्यापक बागवे यांची लेवचर्स ऐकायला वर्गात येऊन बसत असत.
वाशीमधील पसायदान कार्यक्रमात प्रा. बागवे यांनी सुर्याला अरुण, रवि, मित्र, भानू, आदित्य, सावित्र, हिरण्यगर्भ, दिनकर, मार्तण्ड, भास्कर ही व अशी विविध नावे ही दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांवरुन पडली असल्याचे सांगितले. ‘ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली', ‘रेड्याकडून वेद वदवून घेतले', ‘निवृत्तीनाथांच्या पाठीवर सांडगे भाजले' ह्या व अशा घटनांचा-समजुतींचा-वावप्रचारांचा नेमका अर्थ समजावून सांगितला. अर्थ हा केवळ त्या त्या वाक्याचा, शब्दाचा शब्दशः अर्थ नसतो. गर्भितार्थ, भावार्थ, मतितार्थ, रुढार्थ, व्यावहारिक अर्थ अशा विविध छटा त्याला असतात. त्या छटा ध्यानात न घेताच केवळ बोलायचे म्हणून किंवा हा बोलतो म्हणून तो बोलतो या चालीवर अनेकजण विविध वाक्ये, शब्द फेकत असतात. काही गोष्टी व्यवस्थित न शिकताच इकडून तिकडून कानावर पडले म्हणून बोलत असतात. व्हाट्स अपवर कसे अनेकजण त्यांना आलेल्या पोस्ट्स जशाच्या तशा इतरांना फॅारवर्ड करत असतात..त्यातलाच हा प्रकार. ‘नाक कापले' हा वावप्रचार तुम्ही अनेकदा वाचला, ऐकला असेल. रामायणात लक्ष्मणाने शुर्पनखेचे नाक कापले होते असा पुराणातला दाखला त्याला आहे. आजच्या सिव्हिल लाईफमध्ये याचा शब्दशः अर्थ घेऊन कुणी कुणाचे नाक कापायला गेला तर तो थेट जेलातच जाईल. ‘तोंडात शेण घातले' हाही वारंवार वापरात येणार वावप्रचार आहे. हे तोंडात घालायचे शेण नेमके कोणत्या गोठ्यात मिळते तेच समजत नाही. ते फुकट दिले जाते की त्याचा काही भाव असतो, ते केवळ तोंडात घालण्यासाठीच वापरले जाते की त्याच्या गोवऱ्याही थापल्या जातात, बराच काळ ते कुणाच्या तोंडात घातले गेलेच नाही तर ते खराब होते का, त्याचे ‘शेल्फ लाईफ' किती असते, त्याला ‘एवस्पायरी डेट' वगैरे असते का याचा उलगडा होत नाही. असे कुणी कुणाच्या तोंडात शेण घालत नसते. इथे केवळ भावार्थ लक्षात घ्यायचा की अपमानित, बेईज्जत केले गेले एवढेच सुचवायचे असावे. ‘तोंडाला फेस आणला' असाही एक वावप्रचार आहे. सर्वसाधारणपणे विषारी साप चावला आणि वेळेत उपचार नाही मिळाला तर सर्पदंश झालेल्या व्यवतीच्या तोंडाला फेस येतो एवढे मला गेली अनेक वर्षे सर्पमित्रांसमवेत वावरल्यावर व त्यांच्या अनेक मुलाखती प्रसिध्द केल्यावर पक्के ठाऊक झाले आहे. जीव द्यायचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांनी फिनेल, घासलेट, किटकनाशके, धोत्र्याचे बी असले काही उलटसुलट प्राशन केले की त्यांच्या तोंडाला फेस येतो आणि त्यांना बघणाऱ्यांची तोंडे काळवंडतात. धडधाकट, सुदृढ सर्वसामान्यांच्या तोंडाला एरवी फेस येत नसतो. यामागे त्यांना फार गंभीर प्रसंगाचा सामना करावा लागत आहे, कसोटीचा, कठीण काळ आहे हा गर्भितार्थ लपलेला असतो.
‘तोंड दाखवायला जागा ठेवली नाही' किंवा ‘घराण्याची अब्रू मातीत घालवलीस' असाही एक वावप्रयोग दहा बारा वर्षाआधीच्या चित्रपटांतून किंवा प्रत्यक्ष जीवनात मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडील, आजी-आजोबा या घटकांकडून वेळोवेळी ऐकायला मिळायचा. याला शवयतो पार्श्वभूमी जातीबाहेर किंवा धर्माबाहेर लग्न करणाऱ्या मुलामुलींची असायची. अलिकडे तुम्ही पाहाल तर दर दहा घरांमागे एका घरातल्या चिरंजीवाने किंवा ‘मुलगी शिकली प्रगती झाली'ने जातीबाहेर किंवा धर्माबाहेर विवाह केलेला असतो. त्यामुळे ‘खानदानकी इज्जत मिट्टीमे मिलादी' टाईप डायलॉग हल्ली फारसा ऐकून येत नाही. पत्रकारांना दिवसभर (नि कधीकधी रात्री उशिराही!) शब्दांशीच व्यवहार ठेवायला लागतो. असे सांगतात की सर्वात आद्य पत्रकार म्हणजे नारद मुनी! होय तेच ते ‘नारायण नारायणवाले!' मग त्यांची मुळ भाषा संस्कृत असणार. कारण त्यांचा संबंध देवीदेवतांशी नित्याने येत असे. म्हणजेच बाकीचे सारे येण्याआधीपासून संस्कृतमधली पत्रकारिता अस्तित्वात असावी. पण हल्ली आपण काय पाहतो? ‘ब्रेकींग न्युज', ‘बडी खबर' वगैरे वगैरे. मग यांचे अनुकरण, भाषांतर करत मराठीतही ‘या घटकेची सर्वात मोठी बातमी' असला वाकप्रयोग वारंवार ऐकायला मिळतो. सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याआधीही ती अभिजातच होती आणि राहिल. त्यामुळे या भाषेला असे हिंदीभाषकांचे वारंवार अनुकरण करण्याची गरजच नाही.
‘देवबाप्पा कान कापील' असे एक वाक्य आपल्यातले अनेकजण लहानपणापासून ऐकत आता म्हातारेकोतारे झाले आहेत. काहीजण तर थेट देवाघरीही गेले आहेत. पण देवबाप्पाने असे कुणाचे कान कापून ठेवल्याचे माझ्यातरी पाहण्यात आलेले नाही. लहान मुलांना.. त्यातही लाडोबा टाईपच्या मुलांना कशाची तरी भिती असावी म्हणून देवबाप्पाने कान कापण्याचे हे नॅरेटीव्ह निर्माण केले असावे. ‘घरातल्या मोठ्यांना नाही; पण देवाला तरी भित जा' असा मतितार्थ यात लपलेला आहे. त्यामुळे कुणाचेच कान जरी कापले गेले नसले तरी त्या न कळत्या वयात अनेकजण चूकीच्या, नको त्या मार्गाकडे वळण्यापासून परावृत्त झाले एवढे आपण सांगू शकतो. ‘काय मुजिक मारलंय' असं अनेकजण सहजगत्या बोलून जाताना मी अनेकदा ऐकलंय. म्युझिक ही ऐकण्याची, देण्याची, आनंद घेण्याची, रममाण होण्याची बाब आहे. कोण कशाला कुणाला मुजिक मारील? मारायला ते काय काठी, दगड, भाला, बाण अशापैकी काही शस्त्र-अस्त्र वगैरे आहे का? फार छान संगीत दिलंय, सुंदर गाणे झाले आहे, श्रवणीय गीत बनले आहे, संगीतसाज उत्कृष्ट आहे असे बोलणाऱ्याला यातून सुचवायचे असावे. शब्दांकडे लक्ष न देता येथे भावार्थ पाहावा असे दिसते. ‘चला हवा येऊ द्या' हे एका टीव्ही चॅनेलवरील प्रसिध्द (पण नंतर बंद पडलेल्या!) एका कार्यक्रमाचे शीर्षक आहे. ‘हवा आने दो' या हिंदी वाक्याचे ते मराठी भाषांतर. प्राचीन किंवा अलिकडच्या ग्रांथिक, प्रमाण मराठी भाषेत ‘हवा येऊ द्या' असला वावप्रयोग अजिबातच आढळून येत नाही. या वाक्याला तसा फारसा अर्थही नाही. मुळात असं कुणाला सांगून हवा येत नसते. हवा, वारा ही काही मानवाची गुलाम नव्हे. तो पंचमहाभूतांपैकी एक स्वयंभू घटक आहे. त्या हवेशिवाय सजीव अल्पकाळही जिवंत राहू शकणार नाही. तुम्ही आम्ही सांगून ती तसूभरही हलणार नाही. या हवा शब्दावर कोटी करताना ‘डोक्यात हवा गेली' असा शब्दप्रयोग रुढ आहे. याचा गर्भितार्थ असा की एखाद्याला आपल्या कामाचा, रुपाचा, विद्वत्तेचा, प्रसिध्दीचा, घराण्याचा, श्रीमंतीचा अहंकार झाला. गर्व, माज, मस्ती, चरबी आली आणि ती व्यक्ती इतरांना तुच्छ लेखू लागली आहे.
लग्नाळू मुले, मुली एकमेकांचा हात धरुन ‘पळून गेले' असे म्हणण्याचा प्रघात आहे. खरंच असे कुणी पळून जात असते का? मी तर बाबा एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या व घरच्यांनी विरोध केलेल्या अनेकांना आपापल्या पालकांच्या घरातून पायी चालत बाहेर पडून आपल्या मर्जीने लग्न करताना पाहिले आहे. माझ्या मनात नेहमी अशा मामल्यात एक प्रश्न येतो..हे असे घरातून ‘पळून जाण्यासाठी' साधारण कितीचा स्पीड लागतो? पळून जाणाऱ्यांचा पाठलाग करणारे कुणी असते का? नसल्यास मग त्यांनी चालण्यापेक्षा उगाचच पळायचे कारण काय? हल्ली कुणाला कुणाच्या भानगडीत पडायला वेळ नाही. सख्खे भाऊ, सख्ख्या बहिणी, काका-मामा, आत्या मावश्याही या वेगवान, संघर्षमयी, हेवेदावे-पूर्वग्रह-स्टेटसच्या पोरकट प्रभावाखालील जगत एकमेकांपासून आधीच तुटले आहेत. त्यांच्यात पूर्वीसारखा सुसंवाद, प्रेम, माया, ममता, आपुलकी, ओलावा राहिला नाही. ते आणखी कशाला प्रेमीजीवांमागे पळायला मागतील? अशा साऱ्या सहृदांमध्ये, नातलगांमध्ये, मित्र-मैत्रीणींमध्ये ते सारे पूर्वीसारखेच प्रेम, माया, आदर, आपुलकी, स्नेह, जवळीक निर्माण होवो या मनीषेसह ही दिवाळी व आगामी नूतन वर्ष तु्म्हा साऱ्यांना आनंद, उत्कर्ष, सुख, समृध्दी व भरभराटीचे जावो यासाठी भरभरुन शुभेच्छा. दीपावली अभिष्टचिंतन!
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई