छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
निसर्गसंपन्न भूतान
एकूण भूतानबद्दल बोलताना मला खूप आनंद वाटतो. जगातील सर्वात आनंदी देशामध्ये त्याची गणना केली जाते. संपूर्ण भूतान देश प्लास्टीक पासून मुक्त, व स्वच्छ पर्यावरण असलेला देश आहे. जर तुम्हाला विडी, सिगारेट ओढायची असेल तर, तुम्ही कुठेही मोकळेपणे धूम्रपान करू शकत नाही. त्यांनी त्यासाठी ठराविक जागा तयार केलेल्या आहेत. तिथेच तुम्ही धूम्रपान करू शकता. सर्व लोक प्रामाणिक आहेत. ते प्रचंड कष्ट करतात. इथे महिलांना प्रथम दर्जा आहे व इथल्या सर्व हॉटेलमध्ये फक्त महिला कर्मचारी आढळतात.
अखिल भारतीय आगरी अस्मिता साहित्य परिषद आयोजित आंतरराष्ट्रीय आगरी अस्मिता साहित्य संमेलनासाठी भूतान सहलीचा योग आला. ८ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी सहा वाजता कलकत्त्याला जाणारी गीतांजली एक्सप्रेस पकडली. आमचा २० साहित्यिकांचा ग्रुप होता. पण तिघांना वळेेवर पासपोर्ट किंवा इलेक्शन कार्ड न मिळाल्यामुळे आम्ही फक्त १७ जण राहिलो. ट्रेनचा दीर्घ प्रवासात आम्ही कवी संमेलन घेतले. तसेच साहित्यिक गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी तीन वाजता आम्ही कलकत्त्याला पोहोचलो. तिथून संध्याकाळी साडेसहा वाजता लुमडिंगला जाणारी ट्रेन पकडली. सुमारे एक वाजता आम्ही भारत-भूतान सीमेवर पोहोचलो. तेथे आम्ही आमचा पासपोर्ट दाखवून फ्रुयेशियल येथे गोधन हॉटेलमध्ये चेक इन केले आणि त्याच हॉटेलमध्ये आम्ही संमेलनाचे उद्घाटन केले. फ्रुयेशियल या शहरात आम्ही गोधन हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ एप्रिल रोजी आम्ही आमचे पासपोर्ट दाखवून, भूतान देशांमध्ये प्रविष्ट झालो. आमच्या २० सीटर गाडीचा भुतानी ड्रायव्हर कम मार्गदर्शक खूप मजेशीर होता. आम्ही फ्रुयेशियल या शहरातून थिंम्फूकडे जाताना त्यांनी आम्हाला पूर्ण भूतान राष्ट्राचा इतिहास ऐकवला. आम्ही एकीकडे कानाने त्याचे शब्द ऐकत होतो तर, डोळ्यांनी दोन्ही बाजूला हिरव्या वनराईने नटलेले डोंगरही न्याहाळत होतो. पाहताना डोळे सुखात होते व ऐकताना नवलाई अनुभवत होतो.
भूतानची लोकसंख्या ७७७४५० एवढीच आहे. ७० % जमीन डोंगराळ व जंगलाने व्यापली आहे. इथे उंच उंच वाढलेले पाईन, साल, ओक, सायप्रस वृक्ष आढळतात. फळांची झाडे तशी फारशी नाहीतच.ऑगस्ट महिन्यात सफरचंदाचे पीक इथे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तेव्हा इथली सफरचंदे दुसऱ्या देशांना निर्यात करतात. ३० टक्के जमिनीवर शेती केली जाते. प्रामुख्याने लाल. व सफेद तांदळाचे उत्पन्न, बटाटे व मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मसाल्याची पिकेही इथे घेतली जातात. इथे गव्हाचे पीक होत नाही. भाज्या, फळे इत्यादी बऱ्याचशा गोष्टी, भारतातून आयात केल्या जातात. येथील लोक तिन्ही वेळेला भात खातात. मुलांच्या औपचारिक ड्रेसला घो म्हणतात व मुलींच्या औपचारिक ड्रेसला किरा म्हणतात. भूतानमधील मुलांना, मोफत शिक्षण, तसेच सर्व लोकांना मोफत वैद्यकीय सेवा आहे. जरी उच्च शिक्षणासाठी मुलांना बाहेरच्या देशात जायचे असेल तरी, तिथला खर्च भूतान सरकार करते. हार्ट, किडनी, कॅन्सर अशा प्रकारच्या असाध्य रोगाच्या उपचारासाठी बाहेर देशांमध्ये गेलेल्या रुग्णांचा खर्चही भूतान सरकार करते.
भूतानमध्ये ७५ टक्के लोक बौद्ध व २३ टक्के लोक हिंदू आहेत. बाकीचे राहिलेले इतर धर्माचे आहेत. साहजिकच इथे बुद्धाची अनेक मंदिरे आढळतात. ती इतकी सुंदर, आकर्षक आणि असतात की, बघताना आपले भान हरपून जाते. आम्ही थिंम्फूला पाहिलेले बुद्धाचे मंदिर कधी न विसरण्यासारखे आहे. १७७ फूट उंचीच्या पितळेच्या बुद्धाच्या पुतळ्याच्या आत हे मंदिर आहे. सोन्याच्या मुलामा दिलेले कोरीव काम, त्यामध्ये बुद्धाचा पुतळा आणि त्याच्या आठ बाजूला असलेले आठ अष्टांगमार्गाचे पुतळे अवर्णनीय आहेत. जणू काही तो बुद्ध नसून विष्णूचे स्वरूप आम्हाला वाटले. कडेला सभोवताली काचेच्या कपाटात असलेल्या एक लाखाहून अधिक धातूच्या बुद्धाच्या मूर्ती. याबद्दल असे सांगितले जाते की, भक्त आपली इच्छा पूर्ण झाल्यावर, कृतज्ञता म्हणून एक छोटी पितळेची बुद्धाची मूर्ती तिथे ठेवतात. तिन्ही बाजूने डोंगरांनी वेढलेली बुद्धाची ती विशालकाय आकृती तिथल्या शांततेचे, आनंदाचे, सुखाचे प्रतीक वाटते. ही मूर्ती कुएनसेल्फोडींगनेचर पार्क टेकडीवर असून, तिथून थिंम्फू शहर व खालील दरीत वसलेल्या थिंम्फू शहराच्या निसर्गाचे रमणीय दर्शन होते. हे मंदिर पाहण्यासाठी भूतान सरकारने पाचशे रुपये तिकीट ठेवले आहे. आमच्या ड्रायव्हरने सांगितले की, भूतानमधील जवळजवळ सर्व बौद्ध मंदिरे अशीच आहेत. पण आता सरकारने मंदिर पाहण्यासाठी हजार, दीड हजार अशी तिकिटे लावली आहेत. त्यामुळे भूतानमधील इतर बौद्ध मंदिरांचे आम्ही लांबूनच दर्शन घेतले.
भूतानमध्ये काही हिंदू मंदिरेही आहेत. आम्ही तिथे जवळच असलेल्या कालीमातेच्या देवळात गेलो. त्या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळे, तेथील बरेच हिंदू रहिवासी व पर्यटक तिथे आले होते. मंदिरात कालीमातेची मूर्ती, शंकराची मूर्ती व इतर देवतांच्या ही मूर्ती होत्या. देवळामध्ये देवीचे दर्शन घ्यायला कोणतेही तिकीट नव्हते. तिथल्या ट्रस्टीनी आम्हाला केळी आणि द्राक्षांचा प्रसाद दिला. आम्हालाही देवीच्या दर्शनाने छान वाटले.त्यानंतर आम्ही भूतानचा राष्ट्रीय प्राणी टाकीन कसा दिसतो हे पाहण्यासाठी तेथील राष्ट्रीय उद्यानातप्रत्येकी तीनशे रुपये तिकीट काढून पाहायला गेलो. इथला राष्ट्रीय प्राणीर् टाकीन हा एक अनोखा प्राणी आहे. समोरून शेळीसारखा आणि मागून गाईसारखा दिसणाऱ्या टाकीने या प्राण्यांची संख्या फक्त दहा ते पंधरा होती. उद्यानात दोन याक व दोन हरणे मिळून जेमतेम १५ ते २० प्राणी होते. इथे वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळे प्राणी आढळतात. उत्तरेला याक पूर्वेला मिथून (गाय) दक्षिणेला म्हशी. इथे दूधदुभते विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे जेवणात ब्रेड, बटर, चीजचे प्रमाण जास्त आहे. इथे दारूही स्वस्त आहे. सोने इतर देशांपेक्षा दोन-तीन हजाराने स्वस्त असते. तेही डॉलर देऊन खरेदी करावे लागते. त्यासाठी खूप यातायात करावी लागते थिंम्फू येथून आम्ही पुनाखा येथे प्रयाण केले. हे भूतानमधले सर्वात उंचावरील थंड हवेचे ठिकाण आहे. पुनाखाला जायच्या मार्गावर, हिमालयांच्या रांगांमध्ये डोचुला पास आहे. हा भाग बर्फाने आच्छादित असतो. आम्ही गेलो तेव्हा भूर भूर स्नो फॉल होत होता. सगळा प्रदेश धुक्याने धुंद झाला होता. निसर्गाने पुरेपूर उधळण केलेला हा प्रदेश, तिथे असलेल्या १०८ स्मारक स्तूपानी (भूतानचे जे वीर युद्धात मारले गेले, त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ राजमाता आशी दोरजी वांगनो वांंगचुकने बांधले आहेत.) अधिकच नजरेत भरत होता.
यासमोर एक खुले मैदान आहे. इथे वार्षिक डोचुला ड्रूक वांग्येल महोत्सवाचे आयोजन केले जाते. याची उंची ३१०० मीटर आहे. साहजिकच तापमान अगदी कमी होते. आम्ही थंडीने हुडहुडत होतो. पण इथल नजारा काही औरच होता. वेगवेगळ्या उंचीचे, रंगाचे, वृक्ष विविध रंगाच्या फुलांची झुडपे, जागोजागी भूमीवर खोचलेल्या तुऱ्यांसारखे दिसणारे जांभळ्या फुलांचे गुच्छ मनाला मोहून टाकत होते. निसर्गाची ही किमया स्वर्गालाही लाजवील अशीचु होती. मनात विचार आला एखाद्या परीने तर इथली आरास केली नसेल! ते सौंदर्य डोळ्यात साठवून पुढे निघालो. सगळा भूभाग बर्फ पडत असल्याने धुक्यात नाहला होता. पुनाखाचा अर्थ्र ए प्लेस ऑफ ग्रेट हॅपिनेस; खरंच आम्ही तिथले दृश्य पाहून अगदी मनापासून आनंदी झालो. पुनाखा सस्पेन्शन ब्रिज हा फो आणि मोछू या दोन नद्यांच्या संगमावर आहे. हा पूर्णपणे लोखंडी चेननेव जाळीने बनवलेला आहे. याची लांबी १६० ते १८० मीटर आहे. तळापासून याची उंची ३० मीटर आहे. या पुलावरून नदीचे व डोंगरावर वसलेल्या आसपासच्या गावाचे मनमोहक दृश्य पाहायला मिळते. या पुलावरून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे चालताना एक वेगळाच आनंद मिळत होता. जसं लहान मुलांना झोक्यावर झोके घेताना होतो, अगदी तसाच. पुलावरून खाली वाहणाऱ्या नदीतील निर्मळ पाण्याकडे बघताना मनही निर्मळ होत होते. आम्ही सर्व सहकाऱ्यांनी या पुलावर मन भरेल एवढे अनेक फोटो काढले. पुनाखाच्या हॉटेलमधून आम्ही दुसऱ्या दिवशी, भूतानमधील एक महत्त्वाचे स्थान पारो कडे प्रयाण केले. पारो टॅक्टसंग टायगर मोनिस्ट्री साठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गुरु रीनपोचेनी यांनी ध्यान केले. हे अत्यंत सुंदर निसर्गरम्य प्रभावी स्थान आहे. इथले सौंदर्य पाहून आपला श्वास थांबतो. आपण अवाक होतो. हे स्थळ अतिशय उंचावर जवळजवळ चार हजार फूट उंचीवर असल्याने तिथपर्यंत चढणे आव्हानात्मक आहे. इथे अर्ध्या रस्त्यापर्यंत घोड्यावर जाऊ शकतो. पण पुढचा दोन हजार फूट उंचीचा प्रवास साठ वर्षे वयाच्यावरील व्यक्तींना कठीण आहे. परंतु काही ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा तिथे पोहोचण्याचा पराक्रम केला आहे. आमच्यापैकी दहा जण चालत अर्ध्या रस्त्यापर्यंत गेले. इथे पठारी भाग आहे व बसायची ही व्यवस्था आहे. तिथूनच आम्ही वरच्या बुद्धाच्या मंदिराचे फोटो घेतले.संपूर्ण रस्ता उंच उंच पाईन वृक्षांनी वेढलेला आहे. थंड तापमान असल्यामुळे चढताना थकवा कमी जाणवतो.
एकूण भूतानबद्दल बोलताना मला खूप आनंद वाटतो. जगातील सर्वात आनंदी देशामध्ये त्याची गणना केली जाते. संपूर्ण भूतान देश प्लास्टीक पासून मुक्त, व स्वच्छ पर्यावरण असलेला देश आहे. जर तुम्हाला विडी, सिगारेट ओढायची असेल तर, तुम्ही कुठेही मोकळेपणे धूम्रपान करू शकत नाही. त्यांनी त्यासाठी ठराविक जागा तयार केलेल्या आहेत. तिथेच तुम्ही धूम्रपान करू शकता. सर्व लोक प्रामाणिक आहेत. ते प्रचंड कष्ट करतात. इथे महिलांना प्रथम दर्जा आहे व इथल्या सर्व हॉटेलमध्ये फक्त महिला कर्मचारी आढळतात. त्या काटक आहेत. कोणतेही काम त्या पुरुषांशिवाय करतात. भूतान सरकार पूर्णपणे महिलांना पाठिंबा देते. तसेच नवऱ्याबरोबर पटत नसेल तर ती दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करू शकते. पहिल्या नवऱ्याबरोबर घटस्फोट झाल्यावर, ती घरातून बाहेर पडत नाही, तर तिचा नवरा घर सोडतो. भुतानी स्त्रिया आणि पुरुषांना एकापेक्षा अनेक लग्न करता येतात. लग्न हे साधे मंदिरात एकमेकांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून केले जाते, लग्नाला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. अगदी एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तरच, तो आपल्या गावातील लोकांना जेवण देतो. मृत्यू झाल्यानंतर अंत्ययात्रेच्या विधीला येथे महत्त्व आहे. मृतात्म्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, १०८ पताकांचे झेंडे लावले जातात.एखाद्या व्यक्तीची अंत्यविधी करण्याची परिस्थिती नसेल तर भूतान सरकारला अपील केल्यावर, त्या व्यक्तीच्या अंत्यविधीचा सर्व खर्च भूतान सरकार करते.
भूतानमध्ये राजा हा प्रमुख मानला जातो. वंशपरंपरेने हे पद त्याच्याकडे येते. राजा 58 वर्षाचा झाला की, तो आपल्या मुलाला राजमुकुट देतो. राजाला देवाच्या दर्जा दिलेला आहे. भूतान मधील सर्व दुकानात, हॉटेलमध्ये राजाचा त्याच्या राणीबरोबर व मुलांबरोबर फोटो लावला जातो. भूतानला ड्रूक युल म्हणजे गडगडाट ड्रगनची भूमी म्हटले जाते. २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भूतान दोन पक्षीय संसदीय लोकशाही देश बनला. भूतानमध्ये पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ आहे. तरी राजाला प्रमुख मानले जाते. राजा सतत प्रजेची काळजी घेत असतो. कोरोनाच्या तीन वर्षाच्या काळात भूतानमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन केले होते. पर्यटकांवर बंदी घातली होती. अशा वेळेला भूतान सरकारने प्रत्येक व्यक्तीला खर्चासाठी १२ हजार रुपये व मुलाला आठशे रुपये देऊ केले. त्याला घरात लागणारे सामान घरपोच दिले. यासाठी त्यांनी तरुण पिढीचा वापर केला. जे तरुण गांजा, चरस, दारूच्या व्यसनी गेले होते, त्यांना महिन्याला ठराविक पगार देऊन कामाला लावले. साहजिकच व्यसनमुक्ती पासून तरुणांची मुक्तता झाली. तीन वर्षानंतर सरकारचा आर्थिक कोठा संपल्यावर, स्वतः राजांनी त्याची संपत्ती भूतानच्या लोकांच्या जीवन निर्वाहासाठी वापरली. तीन वर्षानंतर भूतान पुन्हा पर्यटकांसाठी खुले केले. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी भूतानंवासीयांना कोरोनाची लस पाठवून दिल्यामुळे, भूतान कोरोना पासून मुक्त झाला. भूतानमध्ये कोरोनामध्ये फक्त सहा लोक मृत्यूमुखी पडले होते.असा हा देश त्याचा आदर्श आपल्यासारख्यांना घ्यायला पाहिजे आणि आपला देशही असाच आपण हिरवागार, समृद्ध, स्वच्छ करूया. - स्मिता श्रीकांत वाजेकर