कामाख्या देवीचे दर्शनः काही अनुभव, काही सूचना

...शेवटी कसेबसे एकदाचे आम्ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. बघतो तर काय, गाभाऱ्याच्या अलीकडेच बळी दिलेल्या काही रेडे, बकरे यांची मुंडकी पडलेली होती.आमच्यातील कट्टर शाकाहारी असलेल्यांना तर ते दृश्य बघून भोवळ यायचीच बाकी राहिली होती. त्यात मध्ये मध्ये बसलेल्या पंड्यांचा, इधर पैसे डालो, असा तगादा सुरू होता. शेवटी एकदाचे आम्ही अंधाराच्या मार्गे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. हा गाभारा इतका चिंचोळा आहे की, एका वेळी एकच जण खाली उतरू शकतो किंवा वर येऊ शकतो...आसाममधील कामाख्या देवी या नामांकित देवस्थान ठिकाणी आलेला हा अनुभव....!

३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर अशी १२ दिवसांची तीन बहिणींची म्हणजेच आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश राज्ये ; अशी थ्री सिस्टर्सची आमची सहल सुखरूप पार पडली. सुखरूप अशासाठी की, इतके डोंगर, इतक्या दऱ्या,  इतके सारखे वळणावळणाचे अरुंद रस्ते की, टेम्पो ट्रॅव्हलरपेक्षा मोठी गाडी जाऊच शकत नाही. काही ठिकाणी तर कार, जीपनेच प्रवास करावा लागतो. वाहन चालक अतिशय सफाईदारपणे वाहने चालवित असतातच. पण तरीही कित्येकदा आपल्या काळजाचा ठोका चुकतोच आणि आलो आहोत तर खरे, पण सुखरूप घरी पोहोचू की नाही? अशी धास्ती सारखी वाटत असते.

आमच्या सहलीच्या शेवटच्या दिवशी आसाम राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी; म्हणजेच गुवाहाटी येथे असलेल्या कामाख्या देवीचे दर्शन घ्यायचे ऐनवेळी ठरविण्यात आले. ऐनवेळी अशासाठीकी मुंबईहून निघण्यापूर्वीच आमच्या टुर ऑपरेटर नम्रता कारखानीस यांनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. पण बुकिंग फुल असल्याचे दिसून येत होते. त्या यापूर्वीही कामाख्या देवीच्या मंदिरात येऊन गेलेल्या असल्याने, त्यांना तिथे नेमके काय चालते, कसे चालते याची चांगलीच कल्पना होती. त्यामुळे त्यांनी आदल्या दिवशी, ज्यांना देवीचे दर्शन घ्यायचे आहे,त्यांनी प्रत्येकी ११००/- रुपये जमा करावेत, असे सांगितले. तसेच आपल्या संबंधामुळे प्रत्येकी ४००/- रुपये वाचले अन्यथा जास्तीचे हजार रुपये दिल्याशिवाय स्पेशल एन्ट्री कूपन मिळतच नाही, असे ठणकावून सांगितले. नम्रता आणि निखिल कारखानीस हे दोघे आयोजक सोडून आम्ही एकूण ३७ पर्यटक होतो. त्यापैकी चार पाच जण वगळता सर्वांनी दर्शन घ्यायचे ठरविले.

खरं म्हणजे, देवीच्या स्पेशल एन्ट्री कूपनचा अधिकृत दर हा ५०१/- रुपये आहे. पण जास्तीचे ६००/- रुपये हे एका पंड्याला द्यायचे असून तोच पास देतो, अशी तेथील ‘व्यवस्था' असून आम्ही सर्व पर्यटन कंपन्या या व्यवस्थेपुढे हतबल आहोत, यासाठी काही तरी केले पाहिजे, अशा शब्दात नम्रता यांनी आपला उद्वेग, संताप व्यक्त केला. आता इतके जास्तीचे पैसे भरल्याने आपले दर्शन लगेच होईल, अशा भ्रमात आम्ही होतो. अर्थात लगेच म्हणजे, दोन तास तरी लागतील, अशी कल्पना आम्हाला देण्यात आली होती. शिवाय पहिल्यांदा ज्या हॉलमध्ये आम्हाला बसविण्यात आले होते, तो वातानुकूलित असल्याने तिथे वाट पहात बसणे सुसह्य होते. त्यात परत खाजगी चहा, कॉफी विक्रेते, करगोटे, अन्य धार्मिक साहित्य विकणारे येत जात असल्याने दोन तास कसे गेले, हे कळलेच नाही.

खरा वैताग सुरू झाला,तो या वातानुकूलित हॉलमधून अतिशय चिंचोळ्या अशा जिन्यावर जाऊन उभे राहायला लागल्यावर. हळूहळू बाजूच्या रांगेतील काही भाविक महिला मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागल्या. त्यांच्या काही मुलांना घाबरेघुबरे होत होते. काहींना उलट्या, मळमळणे सुरू झाले होते. त्यामुळे त्यांचे म्हणणे होते की, आम्हाला दर्शन नको; पण एकदाचे इथून बाहेर पडू द्या. या रांगेतील भाविकांकडे चौकशी केली असता, कळले की ही बिना स्पेशल एन्ट्री कूपनच्या भाविकांची रांग असून ते बिचारे पहाटे दोन वाजेपासून रांगेत उभे आहेत! शेवटी एकदाचा त्या महिलांचा  आरडाओरडा सुरक्षा रक्षक महिलेच्या कानी पडला आणि तिने तणतणत का होईना, मधले दार उघडून त्या महिला आणि त्यांच्या मुलाबाळांना बाहेर जाऊ दिले.

आधीच्या हॉलमध्ये निदान चहा, कॉफी, नैसर्गिक विधी करण्यासाठीची जागा तरी होती. पण या मधल्या रांगांमध्ये मात्र वाट पहात बसणे आणि होत असलेला त्रास सहन करीत बसणे या शिवाय दुसरा काही मार्ग नव्हता. शेवटी कसेबसे एकदाचे आम्ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो. बघतो तर काय, गाभाऱ्याच्या अलीकडेच बळी दिलेल्या काही रेडे, बकरे यांची मुंडकी पडलेली होती.आमच्यातील कट्टर शाकाहारी असलेल्यांना तर ते दृश्य बघून भोवळ यायचीच बाकी राहिली होती. त्यात मध्ये मध्ये बसलेल्या पंड्यांचा, इधर पैसे डालो, असा तगादा सुरू होता. शेवटी एकदाचे आम्ही अंधाराच्या मार्गे गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. हा गाभारा इतका चिंचोळा आहे की, एका वेळी एकच जण खाली उतरू शकतो किंवा वर येऊ शकतो. त्यामुळे या दरम्यान जर दुर्दैवाने चेंगराचेंगरी  झाली तर सुटकेचा मार्ग काय ? कुठूनही हवा येण्याचा, बाहेर जाण्याचा मार्ग दिसत नव्हता. शेवटी दर्शन घेऊन, अक्षरशः जीव मुठीत घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मोकळा श्वास घेतला.

सकाळी साडे आठ वाजता आलेलो आम्ही, दुपारी दोन वाजता देवीचे दर्शन घेऊ शकलो. त्यात परतीच्या विमानाची वेळ संध्याकाळी पाच वाजताची असल्याने  दुपारी तीनपर्यंत आम्हाला विमानतळावर पोहोचणे आवश्यक होते. त्यामुळे आम्हाला जेवण काय, चहापाणी घ्यायलासुद्धा  वेळ नव्हता. शेवटी कसेबसे आम्ही बरोबर तीन वाजता विमान तळावर पोहोचलो. दरम्यान मंदिरात न आलेले आमचे काही सहपर्यटक, विशेषतः निवृत्त सहसचिव श्री सातपुते साहेब हे त्यांच्याबरोबर सगळ्यांचे ‘फूड पॅक'  घेऊन आलेले होते. एखाद्या निव्राासितासारखे आम्ही विमानतळावरील एक कोपरा पकडून ते कसेबसे खाल्ले. पुढचे सोपस्कार पार पाडून एकदाचा आमचा ‘जीव विमानात पडला' !

उपरोक्त सर्व अनुभवांवरून एक भाविक म्हणून मला संबंधित मंदिराचे ट्रस्टी, आसाम सरकार, भारत सरकार आणि अन्य संबंधित यंत्रणा, व्यक्ती यांना पुढीलप्रमाणे सूचना कराव्याशा वाटतात, जेणेकरून ज्या श्रद्धेने सर्व भाविक इथे देशविदेशातून मोठ्या संख्येने येत असतात, त्यांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही आणि त्यांचे दर्शन सुखावह होईल.

१) सध्या देण्यात येत असलेल्या स्पेशल एन्ट्री कुपनवर कोणत्याही व्यक्तीचे नाव, गाव, वय, पत्ता, दिनांक, वेळ, इतकेच काय तर बुक नंबर, सिरीयल नंबरसुद्धा नाहीय. त्यामुळे तो सहजच हस्तांतरणीय असल्याने, मला वाटते आतील कर्मचाऱ्यांशी मिलीभगत करून पंडा लोक हे पास एकग्ीा मिळवितात आणि त्यांचा काळा बाजार करतात. असे करण्याची संधी त्यांना मिळू नये म्हणून ऑनलाइन पासवर संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, दिनांक, वेळ असावे. तसेच या कूपनवरवर डोलाई म्हणून छापील सही आहे. पण कलेक्टर असे लिहिलेल्या जागेवर मात्र कुणाचीच छापीलसुद्धा सही नाहीय!

२) उपरोक्त काहीच तपशील
या स्पेशल एन्ट्री कूपनवर नसल्यामुळे कदाचित हे कूपनच पूर्णपणे बनावट, बोगस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कूपनवर संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, वय, पत्ता, वार , दिनांक, वेळ असा तपशील असावा. तसेच  भाविकाचे कूपन आणि त्या सोबत त्याचे आधारकार्ड किंवा सरकारमान्य अन्य ओळखपत्र याची खातरजमा करूनच आत सोडण्यात यावे. केवळ भ्रष्टाचार रोखण्यासाठीच नाही तर सुरक्षेच्या दृष्टीनेही ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

३) संपूर्ण मार्गात, जिने, पायऱ्या

इथे हवा खेळती राहील, ज्यांना पिण्याचे पाणी हवे, नैसर्गिक विधी करण्यासाठीची काही जागा असावी, अशी काही व्यवस्था करण्यात यावी.

४) आणखी काय सुयोग्य बदल, सुधारणा करता येतील, याचा अभ्यास करण्यासाठी मंदिराचे ट्रस्टी, प्रशासकीय अधिकारी यांनी तिरुपती देवस्थान, शिर्डीचे श्री साईबाबा मंदिर, शेगावचे श्री गजानन महाराज मंदिर अशा मंदिरांना भेटी देऊन, तेथील व्यवस्थेचा अभ्यास करून कामाख्या देवीच्या मंदिरात, परिसरात बदल घडवून आणावेत, जेणेकरून दूरदुरून आलेल्या भाविकांना तिथे आल्याचे सार्थक झाले, असे वाटेल.

जय कामाख्या माँ
- देवेंद्र भुजबळ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दिन दिन दिवाळी