दिन दिन दिवाळी

"दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी” ही वसुबारस या सणाशी संबंधित एक लोकप्रिय ओवी आहे, जी दिवाळीच्या सुरुवातीला गाई आणि म्हशीची पूजा करण्याबद्दल आहे. या दिवशी शेतात राबणा-या जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. यामुळे घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते. म्हणूनच "दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या ? लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा,  आईबापाचा, दे माय खोब-याची वाटी, वाघाच्या पाठी घालीन काठी” ही ओवीबद्ध रचना आबालवृद्धांपासून सगळेच आवडीने अजूनहीम्हणतात. यातून मुलांच्या निरागस भावना व्यक्त होत निसर्गाने दुग्धजन्य दिवाळीनिमित्त प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.

दिवाळी या शब्दाचा अर्थ "दीप” म्हणजे दिवा आणि "आवली” म्हणजे ओळ, असा दीपावलीचा अर्थ आहे. दिवाळीचे पाच दिवस धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीज असून, प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे विशेष महत्व आहे. दिवाळीचे पाच दिवस अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवतात. यात धन, समृद्धी आणि कौटुंबिक बंधनाचे महत्व अधोरेखित केले जाते.

धनत्रयोदशी :- दिवाळीचा पहिला दिवस असून, या दिवशी धनाची देवता कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते. तसेच या वेळी नवीन वस्तू, विशेषतः सोने किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे.

नरक चतुर्दशी :-  या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नकरासुराचा वध केला होता. यांस अनुसरुन अभ्यंगस्नान करुन नकारात्मक उर्जा आणि वाईट गोष्टींचा नाश केला जातो.

लक्ष्मी पूजन :- हा दिवाळीचा मुख्य दिवस असतो. या दिवशी घरात धन आणि समृद्धीची देवता देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. ब-याच ठिकाणी महिलावर्ग सुवासिनींना बोलावून हळदीकुंकू देखील करतात. त्याचप्रमाणे व्यापारीवर्ग रोजकीर्द  रोजमेळ वह्या नव्याने आणून त्यांची पूजाकरतात. विद्यार्थी नवीन वही घेऊन त्यावर सरस्वती चिन्ह काढून त्याची पूजा करतात. घरातील नवीन औजारे पूजली जातात.

पाडवा (बलिप्रतिपदा) :- या दिवशी बळीराजाचे स्मरणकेले जाते. भगवान विष्णूने वामन रुपात बळीराजाला पाताळात पाठवले होते अशी आख्यायिका आहे. या दिवशी पती-पत्नी एकमेकांचे औक्षण करतात आणि पती आपल्या पत्नीस भेट वस्तू देतात.

भाऊबीज :- हा दिवाळीचा शेवटचा दिवस असून, यादिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करतात आणि भावाच्या निरोगी निरामय आयुष्यासाठी कुलदेवतेकडे प्रार्थना करतात. भाऊ देखील बहिणीला साडीचोळी अथवा भेटवस्तू देतात. यामुळे भावाबहिणीचे नाते अधिक दृढ आणि घट्ट होते.

दिवाळी या सणास अध्यात्मिक महत्व असून, यास अनुसरुन दिवाळी या सणाचा उल्लेख असलेले विविध अभंग, ओव्या उपलब्ध आहेत. "आनंदाची दिवाळी, घरी बोलवा वनमाळी” ही संत जनाबाईंची रचलेल्या एका प्रसिद्ध अभंगातील ओळ आहे. याचा अर्थ असा की, दिवाळीच्या आनंदात घरात "वनमाळी” म्हणजे श्रीकृष्णाला बोलावणे करुन त्याच्या स्वागतासाठी रांगोळी काढत गोविंद गोविंद असे नामस्मरण करत घराला आनंदाने सजवावं. संत तुकाराम, संत सेना महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या रचनांचा यात समावेश आहे. ज्यामुळे दिवाळीचा आनंद आणि भक्ति या दोन्ही भावनांचा मेळ दिसून येतो. "दसरा दिवाळी तोचि आम्हा सण सखे संतजन भेटतील” हा संत सेना महाराजांचा अभंग सर्वश्रृत आहे. "दिवाळी दिवाळी असा नाही दुजा सण, सारवली घरे, वाडी तुळशी अंगण” या ओवीमध्ये दिवाळीच्या घरांची सजावट आणि अंगणातील तुळशीचे महत्व सांगितले आहे. "श्रीगुरु वोवाळीती वोवाळीजती, का भुवनी जे उजळती, तया दीपाचिया दीप्ती ठेवीन तेज” या संत ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये दिव्यांच्या तेजाने गुरुंचे तेज उजळवण्याच्या भाव व्यक्त केला आहे.

वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील "लावीते मी निरांजन, तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊनीया आली, आज धनत्रयोदशी, आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या आंघोळी, घरोघरी जागविते माय मुले झोपलेली” हे हृदयस्पर्शी गीत आठवणार नाही असा माणूस विरळाच. दिवाळी या सणास सांस्कृतिक महत्व देखील आहे. या दिवशी विविध ठिकाणी दिवाळी पहाट सारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच मातीचे किल्ले बनविण्याच्या स्पर्धादेखील घेतल्या जातात. यामुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. हा सण आनंदाचे देवाण-घेवाण करण्याचा सण असून, नातेसंबंधांचा देखील सण आहे. ब-याच ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अनाथ मुले, समाजातील विविध घटक, वृद्धाश्रम या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असून, त्यांच्यात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण करण्यासाठी फराळ वाटप, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हा सण सर्वधर्मिय लोक साजरा करत असल्यामुळे या सणास एकतेचे प्रतिक मानले जाते. - सौ. चित्रा विजय बाविस्कर, बदलापूर 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

महाभारतातील एक शापित दानवीर