छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
काकडा ५ उठा जागे व्हा रे आतां!
उठा जागे व्हारे आतां.....‘आता' म्हणजे खूप झाले....आता तरी जागे व्हा. आणि पांडुरंग परमात्म्याचे स्मरण करायला लागा. तुम्ही पंढरीनाथाच्या चरणांवर माथा ठेवा पण तो भक्तीयुक्त अंतःकरणाने. कारण तुमच्या जन्मात तुम्हांला भेडसावणा-या व्यथा केवळ श्री वि्ी्लच दूर करू शकतात...चुकवू शकतात.
काकड आरती ही जरी देवाला जागे करण्याचे एक माध्यम असली तरी या प्रसंगी गायल्या जाणा-या रचनांमध्ये माणसांनाही जागे करण्याची शक्ती आहे. अर्थात हे झोपेतून नव्हे तर अज्ञानातून जागे करणे आहे. याच प्रयत्नात कानांवर येणारे शब्द म्हणतात...
मनुष्य सामाजिक प्राणी आहे...एकटा जगू शकत नाही आणि सामुहिक जीवन व्यवहारात त्याला अनेक संबंध जोडावेच लागतात. धन मिळवावे लागते. विवाह करावा लागतो,संतती निर्माण करावी लागते, कुटुंबात राहताना बंधू-भगिनी यांचा सहवास लाभतो. अनेक मित्र जोडावे लागतात, सोयरीकी जमवाव्या लागतात..पण दुर्दैवाने ही संसारातील नाती विश्वासार्ह असतीलच असे नाही. पिशुन म्हणजे भेद निर्माण करणारी. एक नाते आपल्यात आणि आपल्याशी असलेल्या इतरांच्या नात्यात गैरसमज पसरवू शकतात. आणि म्हणून एक लक्षात घ्यावे....ही नाती मिथ्या अर्थात आभासी,खोटी आहेत...अशा नात्यांपासून सावध राहावे...त्यांचा शक्यतो लवकरात लवकर त्याग करावा आणि देवाला शरण जावे. माणसाला सर्वकाही आपले वाटत असते, मी आणि माझे घर,संपत्ती यांत तो पुरता गुरफटलेला असतो....पण हे धनाचे,मोठेपणाचे,संपत्तीचे वारे निश्चितपणे निघून जाईल. आपले आयुष्य क्षणाक्षणाने क्षीण होत जाते आहे..आणि याचा हिशेब काळ करीत बसलेला आहे. घटिका भरली की ती मृत्यूच्या डोहाच्या तळाशी जाईलच...यात संशय नाही! म्हणून यापुढे काळजी करायची ती स्वतःच्या हिताची. सातत्याने श्रीहरीचे ध्यान करायचे आहे हे ध्यानात ठेवायला पाहिजे. देवाकडे सहजतेने घेऊन जाऊ शकणारे संत...त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा....क्षण आणि नामस्मरण यांची जोडी जमवा...काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर या मुख्य सहा रिपुंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा....मनामध्ये स्वतःविषयी प्रेमभाव धरून रहा...म्हणजे मगच तुम्ही स्वहिताचा घोर वाहू शकाल...आणि यासाठी हरिभक्ती हा एकच नेम आणि नियम...जो कधीही चुकवू नका!
उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा ।
भावें चरणीं ठेवा माथां । चुकवीं व्यथा जन्माच्या ।१।
धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून ।
सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ।२।
माया विघ्नें भ्रमला खरें । म्हणता मी माझेनि घरे ।
हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ।३।
आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।
स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं राहा श्रीहरीच्या ।४।
संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा ।
मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनों ।५।
|विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा ।
धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ।६।
काकड आरतीमध्ये जसे नामदेवरायांचे अभंग गायले जातात तसेच विष्णुदास ‘नामा' यांचेही अभंग गायले जातात. आणि या दोघांच्या रचना एकमेकांपासून वेगळ्या वाटत नाहीत....रचनांच्या काळात सुमारे अडीचशे वर्षांचे अंतर असले तरी! आपल्यासारख्या सामान्यजनांना अर्थाशी जास्त सोयरीक असावी. बाकी निर्णय करायला अभ्यासक,चिकित्सक सज्ज आहेतच. एखादी गोष्ट पाठ करायची असल्यास,समजून घ्यायची असल्यास पहाटेसारखी दुसरी वेळ नाही....म्हणून भल्या पहाटे सकारात्मक विचार,उत्तम विचार मनात पेरला गेला की...दिवसभर त्याचे कोंब मनाच्या मातीतून उगवत राहतात.....मनाचं शिवार हिरवंगार होत जातं! रामकृष्णहरी. -संभाजी बबन गायके