छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
काकडा ४ प्रभात समयो पातला!
पंढरीच्या आभाळात देवांच्या विमानांची अक्षरशः दाटी झालेली आहे....नामदेवराय आई रुखुमाईस हात जोडून विनवत आहेत...पहाट समय पातला आहे....आपल्या नीलवर्ण, घननील चैतन्यास आता निद्रेतून जागवा! स्वर्गस्थ रंभा आणि इतर कुशल नर्तकी अगदी समरसून त्यांची नृत्यकला सादर करीत आहेत...आणि आजच्या या विशेष समयास प्रत्यक्ष पार्वतीपती, गिरिजाकांत, नीलकंठ, डमरू-त्रिशूलधारी कैलासाधिपती श्री शंकर उपस्थित आहेत...आता देवास म्हणावे....डोळे उघडा!
कार्तिक मासातील ओली पहाट. पावसाचा भार साहून चंद्रभागा आता कुठे थोडी शांत झाली आहे. तिचा प्रवाह आता मूळ रुपात आला आहे....शांत, काहीसा उथळ आणि निर्मळ! तिच्या काठांवरची वाळू आता वाळवंट म्हणता येईल इथवर पसरलेली दिसू लागली आहे. स्नान करून श्री वि्ीलाच्या राऊळाकडे जाणा-या पावलांना ही वाळू जराही बोचत, टोचत नाही. कारण ही पावलं संसारातून परमार्थाकडे चाललेली असतात...त्या पावलांखाली पांडुरंगाचे कारुण्य अंथरलेलं असतं...या मार्गावरील थोडासा चढ तर पावलांना जाणवतसुद्धा नाही.
पण आज या वाटेवर भलती झुंबड उडालेली दिसते....आजची दाटी सामान्यजनांची नाही....सबंध वाटेवर एकमेकांना खेटून देवता उभ्या आहेत...राऊळात एवढी गर्दी उसळली आहे की देवांनाही आत जागा उरलेली नाही. हो, शुक, सनक आणि इतर मुनीश्रेष्ठ, ब्रह्मदेवांचे सुपुत्र नारदजी आणि देवाचे परमप्रिय भक्त आणि मधुर स्वरांचे धारक तुंबरजी मात्र देवाच्या कक्षाच्या अगदी समीप आहेत...कक्षाची कवाडे, द्वारे किलकिली करून हे भक्तश्रेष्ठ त्यांच्या आराध्य देवतेला डोळेभरून पाहण्याचा यत्न करीत आहेत. राऊळाच्या आत असलेला गरुडाचा पार भक्तांच्या गर्दीने फुलून गेला आहे....पिंपळ जसा पानोपानी बहरून येतो तसे!
पंढरीच्या आभाळात देवांच्या विमानांची अक्षरशः दाटी झालेली आहे....नामदेवराय आई रुखुमाईस हात जोडून विनवत आहेत...पहाट समय पातला आहे....आपल्या नीलवर्ण, घननील चैतन्यास आता निद्रेतून जागवा! स्वर्गस्थ रंभा आणि इतर कुशल नर्तकी अगदी समरसून त्यांची नृत्यकला सादर करीत आहेत...आणि आजच्या या विशेष समयास प्रत्यक्ष पार्वतीपती, गिरिजाकांत, नीलकंठ, डमरू-त्रिशूलधारी कैलासाधिपती श्री शंकर उपस्थित आहेत...आता देवास म्हणावे....डोळे उघडा!
देवांच्या स्त्रिया तर आज विशेषत्वाने सज्ज होऊन आलेल्या आहेत...त्यांनी त्यांच्या तबकातल्या निरंजनांमध्ये तेलाच्या नव्हेत, तुपाच्या नव्हेत.. तर पंचप्राणांच्या ज्योती प्रज्वलित करून आणलेल्या आहेत...देवाला, राहीच्या आणि रखुमाईच्या पतीला ओवाळण्यासाठी. या देवाने केवळ भक्तांच्या कल्याणासाठी, प्रेमासाठी अनंत अवतार धारण करून प्रसंगी देहाचे बरे-वाईट भोगही भोगले आहेत....दीनांचा उद्धार करण्याकामी हे त्रैलोक्यनाथ सदैव तत्पर असतात! नामदेवराय तर त्यांच्या अनेक अवतारांचे साक्षीदार...कित्येकदा त्यांचे सहचर सुद्धा...आज नामदेवराय स्वतः मंडपात कीर्तनासाठी उभे आहेत...गळ्यात वीणा, हाती चिपळ्या आणि मुखात हरीनाम...हृदयातील भक्ती डोळ्यांत दाटून आलेली आहे....आणि त्यांच्याच मागे जनाई उभ्या आहेत...त्यांनी देवाची मूर्ती डोळ्यांत कैद करून ठेवली आहे...आणि ते दृश्य नेत्रांवाटे बाहेर सांडून जाऊ नये म्हणून नेत्रांना पापण्यांचा अडसर लावून घेतलेला आहे...आता देवास त्याचे नेत्र उघडावेच लागतील....किंबहुना हे सर्व जुळून येण्याचीच तर त्याला प्रतीक्षा असावी!
उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला । वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला । १ ।
वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत । सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ।२ ।
शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी । कवाडा आडूनि पाहताती जगजेठी । ३ ।
सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ । रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ । ४ ।
रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात । त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत । ५ ।
पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती । भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती । ६।
अनंत अवतार घेसी भक्तांकारणें । कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें । ७ ।
चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं । पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी
-संभाजी बबन गायके