पुरुष

  जोंधळेच्या घरी गडबड होती.. त्याच्या दोन नंबरच्या मुलीला.. माधवीला पहायला मुलगा येणार होता.. किरण जगदाळे.. माधवीला किरण हे नाव आवडले नव्हते.. नाव कसे हवे.. प्रकाश.. सुधाकर.. अभय.. पण तिची आई आणि ताई म्हणाली..अगंं नावात काय एव्हडे? मुलगा चांगल्या नोकरीला हवा आणि निर्व्यसनी हवा.. माधवी गप्प बसली.. कारण ज्यांनी स्थळ आणले होते ते वसंतकाका म्हणाले होते..मुलगा पोस्टात क्लार्क आहे.. एकटा आहे.. म्हणजे आईवडील नाहीत की भावंडे नाहीत.. डोंबिवलीत स्वतःची जागा आहे..

एकटा मुलगा आणि पोस्टात नोकरी याची सर्वांनाच भुरळ पडली होती.. नाहीतरी माधवी होती नॉनमॅट्रिक.. फक्त तिला शिवणकाम.. भरतकाम चांगलेच येई. नाना जोंधळंेना दोन मुली.. मोठी रेखा आणि धाकटी माधवी.. मोठया रेखाचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले.. तिला एक मुलगी आहे. रेखा साधी.. नानांना तिला फारसे कपडे घयायला लागले नाहीत.. कारण आहे त्यात समाधान मानणारी.. पण माधवीला नटण्यामुरडण्याचे खुप वेड.. ती आपल्या ताईचे कपडे पळवी तसेच मैत्रिणीकडून चार दिवसासाठी कपडे घाली आणि मिरवे.. नुसत्या पावडर कुंकुवर तिचे समाधान होत नसे.. तिने लिपस्टिक आणि सेंटपण कुठूनतरी मिळविले होते.. अर्थात ती होती पण देखणी.. चारचौघात उठून दिसें.. बाजारात फिरताना तरुण पोरे तिच्याकडे वळून वळून बघत. तिला सिनेमा बघण्याचे वेड होते.. अमीरखान, गोविंदा यांचे सिनेमे ती गुपचूप पाही.. सर्व सिनेमाची गाणी तिला पाठ असत..तिला वाटतं असे.. आपल्याला अमीर.. अभिषेक यांच्यासारखा नवरा हवा.. तिची हौसमौज करणारा.एका रविवारी किरण तिला पहायला आला.. नाना त्याचे स्वागत करत होते.

"या या. किरणराव.. घर सापडायला त्रास झाला काय?”
"नाही तसा.. मी स्टेशनवरून रिक्षा केली.. रिक्षावाल्याला पत्ता दिला..”

आतमधून तयार होऊन माधवी बसली होती.. तिने किरणचा बायकी आवाज ऐकला आणि ती मोठयाने म्हणाली.. शी! तिच्या आईने आणि ताईने डोळे मोठे केले म्हणून ती गप्प बसली. नानांनी तिला बाहेर बोलावले, तेंव्हा ती चहा घेऊन बाहेर आली.. एका दृष्टीखेपात तिने किरणला वरपासून खालपर्यत पाहिले आणि तिचे तोंड कडू झाले.. तिच्या मनात आले..काय नमुना आहे.. पाच फूट किरकोळ माणूस. तोंडातून एक दात बाहेर.. जाड चष्मा..हिरवी पॅन्ट.. काळा अर्धा शर्ट..

"काय विचारायचे असेल तर विचारा.. ” नाना किरणना म्हणाले..
"वाचन करता का? कथा.. कविता..” माधवीने आयुष्यात शाळेचे पुस्तक सोडून काही वाचले नव्हते.. तिने रागाने किरणकडे पाहिले..
"नाही... असुदे. असुदे.. निदान रोजचा लोकसत्ता.. नवाकाळ.”  माधवीने काहीच उत्तर दिले नाही.. मग नानाच म्हणाले.
"लाजते ती तुम्हाला.. हा काय नवाकाळ तिनेचे मागवला आहे.. गाणे म्हणते बर का!”
"एक गाणे म्हणा मग?” किरण म्हणाला..

ती ढीम्म बसुन राहिली.. नाना तिला खुणा करत होते.. गाणे म्हण म्हणून.. पण तिने तोंड उघडले नाही.. ”असुदे असुदे.. नाही म्हंटले तरी चालेल..”  किरण तिच्या रूपावर बेहद्द खूष झाला होता.. असली अप्सरा आपल्या दोन खोल्यात आली तर आपल्या दोन खोल्यांची जागा रंगमहाल होईल, याची त्याला कल्पना आली. किरणने तिथल्या तिथे माधवीला होकार सांगितलं. पण माधवी... तिला असला बावळट, पाच फूट उंचीचा.. किनऱ्या आवाजाचा नवरा नको होता.. तिने आईला सांगून टाकले..

"आई.. असल्या बायल्याबरोबर मला लग्न करायचे नाही..” पण तिची आई चिडली.

"नवऱ्याला पर्मनंट नोकरी आहे हे लक्षात घे.. कुणी भावंड नाही की सासुसासरे नाहीत.. जागा पण आहे नावावर.. पुरुषाचे रूप पाहू नये असं म्हणतात....”

तिची लग्न झालेली बहीण तिला समजावत म्हणाली.. "हो मधू.. पैसा आणि नोकरी महत्वाची असतात.. माझ्या नवऱ्याकडे बघ.. दिसायला बरा आहे; पण नोकरी लायब्ररीत.. कसला डोंबलाचा पगार येणार.. आठ दिवसात पैसे संपतात आणि मग नानाकडे पैसे मागावे लागतात..” तिला आपल्या वडिलांना काही सांगायची भीतीच वाटायची.. शिघ्रकोपी ते.. काठीने बडवायलाच लागायचे. तरीपण माधवी किरणशी लग्नाला तयार होईना. तिने जेवण सोडले.. पण तिच्या धमकीला कोण भीक घालेना. वाट बघून बघून ती जेवायला लागली.. एक दिवस तिने घर सोडले.. चिट्ठी लिहून ठेवली.. कुणी तिच्याकडे लक्ष दिले नाही.. रात्री शेवटी ती घरी आली.
किरण जगदाळेसोबतचे लग्न कसे मोडावे असा विचार करत असताना एका सुट्टीच्या दिवशी किरण त्यांच्या घरी आला.
नाना जोंधळे बाहेरच्या खोलीत बसले होते, एवढ्यात किरण म्हणजे त्यांचा होणारा जावई दारात आला.. त्याला पाहताच नाना झटकन उठलेच....”या, या किरणराव.. अचानक कसे आलात?” आतून माधवी सर्व ऐकत होती आणि बोटे मोडत होती..
"त्यांना जरा बाहेर न्यायला आलेलो.. पाठवता का?”
"कुणाला? मधुला.. न्या की.. कुठे जायचंय? पार्कमध्ये काय?”
"नाही हो.. थोडी खरेदी..”
"हो हो.. जा ना घेऊन.. मधे.. मधे.. बाहेर कोण आलंय पाहिलास काय? किरणराव आलेत.. तुला खरेदीला नेतात म्हणतात.. ये बाहेर..चरफडत माधवी बाहेर आली, तिला पहाताच किरण म्हणाला..माझ्याबरोबर बाहेर याल का.. थोडी खरेदी करू..”

मान हलवत माधवी बाहेर पडली.. तिच्या पाठोपाठ किरण बाहेर पडला.. पाठमोरी माधवीला पहात तो मनातल्या मनात म्हणू लागला...किती देखणी आहे ही.. लग्न झाले की हिला सुखात ठेवायचे.. आपल्या आईला जे भोग भोगायला लागले.. बाबांचा मार खायला लागला.. तसा मार.. तसा त्रास हिला नाही द्यायचा.रस्त्यात किरण पुढे चालला होता.. त्याच्या मागून पाय ओढत माधवी चालली होती.. मध्येच थांबून किरण तिला म्हणाला..”ऊन फार आहे.. उसाचा रस घेऊया काय?”
"नको..” ती तुटकपणे म्हणाली..

"बरे.. जशी तुझी इच्छा..” माधवी मनातल्या मनात धुसमुसत होती.. तिला किरणच्या कपड्याकडे पहावत नव्हते.. लाल पॅन्ट आणि हिरवा शर्ट.. किती अजागळ हा माणूस.. बाकी पुरुष कसे चटपटीत राहतात.. काळी पॅन्ट. पांढरा किंवा निळा शर्ट. व्यवस्थित पॅन्टीत खोवलेला.. काळा बेल्ट. काळे बूट.. आणि हे ध्यान.. लाल पॅन्ट आणि हिरवा शर्ट, पायात स्लीपर.. आणि हे ध्यान आपल्या नशिबी येणार? एका दुकानासमोर किरण थांबला.. आणि तिला म्हणाला.."येथे जाऊया का?” तिने मान डोलावताच तो पुढे झाला.. मागोमाग ती होती.. ते एक बायकांच्या कपड्याचे अतिसामान्य दुकान होते.. असल्या दुकानात तिला आणण्याने तिचा संताप झाला.. पण आई नानाची आठवण येऊन ती गप्प बसली.. दुकानदाराने त्यांच्या समोर साडया ठेवल्या.. नाईलाजाने तिने त्यातल्या दोन साडया निवडल्या आणि ती बाहेर पडली..
"पार्कमध्येे बसायचं का?”

दुपारचे बारा वाजलेले.. कडकडीत ऊन.. घामाच्या धारा.. आणि हा बावळट विचारतो.. पार्कमध्ये बसायचं का?
तिने "नको” म्हंटलं आणि ती घराच्या दिशेने चालू लागली. किरण धावत धावत तिच्या मागून चालत होता..
"रिक्षा करायची का?” मागून त्याचा सवाल.

हे करायचे का.. ते करायचे का.. कसला बावळट माणूस.. स्वतः चल, पार्कमधे बसू.. रिक्षाने जाऊ.. असे म्हणायचंय ऐवजी.. मलाच प्रश्न विचारतो.. पुरुष कसे आग्रही असतात.. आपले ते खरे म्हणणारे असतात.. आणि हा.. बुळबुळीीत.. भेंडीची भाजी नुसती..

कितीही मनात नसले तरी शेवटी माधवीचे किरणसोबत लग्न झाले. शालू नेसलेली.. दागिने घातलेली माधवी देखणी दिसत होती.. पण तिचा चेहेरा उतरलेला होता.. तिच्यात कसलाही उत्साह नव्हता.. किरण मात्र तिच्या चेहेऱ्याकडे एकसारखा पहात होता आणि खूष होत होता.. शेवटी त्याला त्याच्या आईपेक्षाही सुंदर बायको मिळाली. त्याला त्याच्या आईची आठवण येत होती.. सात वर्षाचा असताना आई गेली.. म्हणजे बाबांचा मार खाऊन कंटाळलेल्या आईने जीव दिला... आज आई नाहीत आणि बाबा नाहीत.. कोण भावंडे नाहीत.. नातेवाईक नाहीत. पण आता आपल्याला हक्काची बायको आहे बायको..

लग्न लागले.. किरणचा चुलत भाऊ आणि वहिनी आली होती सांगलीहून.. त्यांनीच पुण्यवचन केले. लग्नात किरणचे पोस्टातील सहकारी आले होते.. त्यांनी दोघांनाही नाव घ्यायचा आग्रह केला..माधवीने नकार  दिला.. किरणने नाव घेतले..

”भाजीत भाजी भेंडीची... माधवी माझ्या प्रीतीची..” सर्व हसले.. पण माधवीचा तीळपापड झाला.. कसले नाव घेणे हे? भाजी.. भेंडीची? आपण भेंडीच्या भाजीसारखा बुळबुळीत.. आणि नावातसुद्धा भेंडी?

लग्नानंतर ती किरणच्या घरी आली.. दोन खोल्यांचे घर.. एक बाहेरची खोली.. त्याच्यात दोन खुर्च्या आणि लहान लोखण्डी कॉट.. टीव्ही आणि रेडिओ. आतल्या खोलीत लहानसा ओटा.. मोरी, संडास आतच. येताना सोबत किरणचे चुलतभाऊ वहिनीपण होते.. ती मंडळी सायंकाळी सातच्या ट्रेनने सांगलीला जायचे होते. किरण आणि त्याची भाऊ-वहिनी बोलत असताना माधवीने कॉटवर झोपून दिले.. भाऊंवहिनी  भाऊंवहिनी जायची तयारी करू लागले तसे किरणने माधवीला उठवले..भाऊ निघालाय.. "स्टेशनवर जाऊया काय?”

"माझे डोके दुखतंय.. तुम्ही जा.. मला झोपूदे..”

"बरं..” म्हणत किरण त्याना पोचवायला गेला. तो स्टेशनवरून आला तरी माधवी उठली नव्हती.. किरणने दूध घेतले आणि तो चटई घेऊन झोपी गेला. आणि मग हे रोजचेच झाले.. किरण यायच्या आधी माधवी जेवण करी.. स्वतः जेऊन घेई आणि झोपी जाई. तो सकाळी तो पोस्टात गेल्यावर उठे. शनिवारी रात्री माहेरी जाई आणि सोमवारी घरी येई. किरणला सर्व कळत होते.. पण तो गप्प होता.. आपण चिडून काही बोलणार..ती चिडणार..आपण चिडणार.. राग अनावर होऊन आपण हात उचलणार.. नकोच ते.. त्याला आपले लहानपण आठवायचे.. आपले बाबा आईला गुरासारखे मारायचे...आई मोठमोठ्याने ओरडायची.. आपण कोपऱ्यात उभे राहून हे पहायचो.. बाबा का मारतात हे कधी लक्षात आले नाही..ते वय नव्हते समजायचे.

किरण सकाळी नोकरीला जात होता. बाहेरच काहीबाही खात होता.. रात्री त्याचे जेवण तयार असायचे. त्याचा पगार झाला की तो घरखर्चाला पैसे टेबलावर ठेवत होता. त्या सोमवारी सकाळी किरण आंघोळ करून कामावर जायची तयारी करत होता.. एवढ्यात त्यांच्या दरवाजावर टकटक झाली.. किरणने दरवाजा उघडला.. बाहेर एक राजबिंडा तरुण उभा होता..

"कोण पाहिजे?”
"मी बाजूच्या रूममधे रहायला आलोय.. मनिष माझे नाव.. मनिष तवटे.. मी हिंदुस्थान लिव्हरचा सेल्स रिप्रेसेन्टेटिव्ह आहे.. तुमच्या बाजूची जागा रिकामी होती ना..”
"हो हो.. या आत या.. ” मनिषचा मर्दानी आवाज ऐकून माधवी खडकन उठली आणि खुर्चीवर बसलेल्या देखण्या मनिषकडे पहातच राहिली.
"माझी पुण्याहून इकडे बदली झाली.. एजन्टमार्फत मला ही खोली मिळाली.”
"मग तुमची फॅमिली वगैरे..”
"नाही मी एकटाच रहाणार.. पत्नी नोकरी करते पुण्यात.. त्यामुळे ती येऊ शकणार नाही.”
"मग जेवण..?”
"मला ऑफिस ड्युटी नाही.. मार्केटमधे दिवसभर.. फक्त दर सोमवारी ऑफिस.. त्यामुळे एक वेळ जेवण बाहेरच होते..रात्री बघू.. कुणी डबा देणारे आहे काय?”
"मी देते ना डबा...” झोपेतून उठलेली माधवी पटकन म्हणाली.
"तुम्हाला कशाला त्रास?”
"यात त्रास कसला? आम्हा दोघांचे जेवण शिजते.. तेथे तिसऱ्याचे..मी ठेवते तुमचे जेवण.. तुम्ही जेवायलाच या. मी वाट पहाते.”

माधवीचा नवरा किरण पहातच राहिला.. आपल्यासाठी कधीही जागी न राहणारी आपली बायको या परक्या मनिषला तुमची वाट पहाते.. असे म्हणते.. आश्चर्य आहे!  दुसऱ्या दिवसापासून किरण घरी येत होता.. त्याआधी मनिष जेऊन माधवीबरोबर गप्पा मारत असायचा.. त्यांच्या गप्पा सिनेमाच्या असायच्या.. शूटिंगच्या असायच्या.. नवीन नवीन कपड्याच्या असायच्या.. बाजारात नवीन आलेल्या गाड्यांच्या असायच्या.. दुर्दैवाने किरणला अशा गोष्टीत इंटरेस्ट नसायचा..तो जांभया देत झोपी जायचा.

पण यानंतर मात्र किरणला सकाळचा नाश्ता मिळू लागला.. कधी पोहे.. कधी उप्पीट. अर्थात त्यातील एक डिश शेजारी जात होती. रात्रीच्या जेवणात वेगवेगळे पदार्थ मिळू लागले. एक दिवस माधवी नवऱ्याला म्हणाली..”मी एक शिलाई मशीन घेते.. घरात रिकामे राहून कंटाळा येतो.. मला चांगले शिवणकाम येते.. मनीष म्हणालेत.. त्यांच्या ओळखीचे  गारमेंट्‌स दुकानदार आहेत.. त्याना भरपूर झबलीटोपरी लागतात... मी त्याना ते शिवून देईन.. पैसेही मिळतील आणि वेळपण जाईल. हळूहळू आणखी कस्टमर वाढतील.”

किरणने होकार दिला. घरात नवीन शिवण मशीन आली..पण कापडं आणणे.. माल पोचवणे यासाठी मनिष आणि माधवी सतत बाहेर जाऊ लागली. मनीष आणि माधवी नेहेमी नेहेमी बाहेर जातात, येताना खाऊन येतात.. मग कधीकधी जेवण तयार नसते.. या सर्व  बाबींनी किरण मनातल्या मनात चिडत होता.. पण तो राग गिळत होता.. चेहेऱ्यावर खोटेखोटे हसू आणत होता.

एक दिवस माधवी किरणला म्हणाली.."नवीन पिक्चर आलाय आमीरचा.. तुम्ही येणार नाहीच.. मनीष म्हणाला मी येईन म्हणून.. रात्री येताना आम्ही जेऊन येऊ.. तुम्हीपण बाहेरच जेवा..” किरणचे हात शिवशिवत होते... पण त्याला आई आठवली.. अंगभर मार खाणारी आणि तिला काठीने मारणारे बाबा आठवले.. छे.. छे.. बाबासारखे वागायचे नाही.. आईने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली शेवटी हे विसरायचे नाही.  माधवी मनीषबरोबर सतत बाहेर जात असते.. हे चाळीतली लोक पहात होती.. आपापसात कुजबुजत होती.

किरणने चाळीतल्या लोकांचे कुजबुजणे एकदा माधवीच्या कानी घातले..."त्यात काय झाले? मी गारमेंट्‌सचा व्यवसाय करते.. मला कापडं खरेदी करायची असते.. त्यासाठी मुंबईतील मोठया मार्केटमधे जायला लागते.. शिवाय तयार झालेला माल देण्यासाठी पण जायला लागते.. तुमची नोकरी.. मग मला एकटे जायला जमत नाही.. मनिषची निश्चित अशी कामाची वेळ नाही.. कधीकधी तो दुपारीच येतो.. मग रिकामा असतो म्हणून माझ्याबरोबर येतो..”

किरण कॉटवर येऊन पडला.. आजपर्यत आपण कधीच कुणावरही चिडलो नाही.. कुणाला अपशब्द बोललो नाही. कधी कुणाला मारणे..छे.. छे.. आज आपण स्वतःच्या बायकोला मारले.. स्त्रीवर हात उचलणे चूकच.. मग बाबा आणि आपल्यात फरक काय राहिला.. किरण डोळे मिटून राहिला. माधवीला आपण मारले.. पुढे काय? माधवी माहेरला निघून जाईल की मनिषबरोबर....?

विचार करत असताना आतल्या खोलीतला लाईट पेटला.. किलकिल्या डोळ्याने किरण पहात होता.. माधवी आत येत होती.. तिचे डोळे स्निग्ध होते.. डोळ्यात प्रेम दिसत होते. ती किरणच्या जवळ आली.. त्याच्या केसातून बोटे फिरवत म्हणाली.."शेवटी मला तुझ्यातला पुरुष दिसला..तो दिसावा म्हणून मी प्रयत्न करत होते..पुरुषाने कसे खमके असावे..भेंडीच्या भाजीसारखे बुळबुळीत नसावे.. तूझ्या स्वभावातला हा बुळबुळोीतपणा मला त्रास देत होता..स्वतः निर्णय घेणारा पुरुष मला आवडतो..आपली बायको परपुरुषाबरोबर फिरते आहे..हे दिसत असतानाही राग गिळणारा पुरुष तो कसला? मनीषला काठीचे दणके देऊन हाकलून लावणारा तो पुरुष..आपली बायको व्याभिचारी होते आहे म्हणून कमरेत लाथ घालणारा तो खरा पुरुष.. मला माझा खरा पुरुष आज भेटला..मी मुद्दामच मनीषबरोबर बाहेर जात होते.. म्हंटले तुला चीड येते का पाहू..ती येत नव्हती..खऱ्या पुरुषाला ती येणारच..मी मनीषबरोबर बाहेर जात होते म्हणून मर्यादा ओलांडली नाही..नाना जांधळेंची मुलगी मर्यादा ओलांडणारच नाही..मी तुझ्यातला पुरुष कधी बाहेर पडतो ते पहात होते..आज तो बाहेर पडला..समाजात कसे वागावे..कसे टापटीप कपडे घालावे..हे तुला समजत नसेल..पण मी ते सांगेन. माणूस लख्ख हवा.. आपल्या साथीदाराशी प्रामाणिक हवा..तू खुप साधा आहेस.. सरळ आहेस.. शेजारच्या मनिषसारखा नाहीस..घरी बायको असताना दुसऱ्यांच्या बायकोवर इंप्रेशन मारणारा..माझे काही चुकले तर क्षमा कर..शेवटी आपल्या दोघांना आयुष्यभर साथ द्यायची आहे.. माझा पुरुष तूच आहेस.”


किरण आश्चर्य वाटून माधवीच्या डोळ्यात पहात राहिला..लाईट बंद करून माधवी त्याच्या कुशीत आली..त्याला कळलेच नाही. - प्रदीप केळुस्कर 

 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दीपावलीच्या तेजाला फटाक्यांची काजळी !