छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
व्याघ्र प्रतिनिर्यातन! ५२७ मातांचे आणि कुंकवांचे देणं!
वनांच्या राजांच्या, वाघांच्या विचारात मृत्यूची भीती ही कल्पनाच नसते... इतरांनी त्यांना भ्यावं! इतरांनी त्यांचा धसका घ्यावा! पण एखादेवेळी वाघाचीही फसगत होते!
जमिनीपासून तब्बल सोळा-सतरा हजार फूट उंचीवर स्थित असलेल्या त्या पर्वतावर हा व्याघ्रराज विराजमान होता...पण दैवगतीचा फेरा म्हणायचा...हा राजा त्याचे सिंहासन सोडून खाली उतरला आणि त्या पर्वताच्या पायथ्याशी आला...किंचितसा बिनघोर होऊन. वाघ मागे वळून पहात नाही...तो कुणाचंही भक्ष्य नसतो म्हणून! पण यावेळी मात्र याची पाठ वळाली आणि तिकडे कोल्ह्या-कुत्र्यांनी त्याच्या गुहेचा ताबा घेतला... तख्तावर नापाक पावलं उमटली!
वाघ पुन्हा पर्वतावर जाण्याआधी त्याचे काही शावक पुढे निघाले आणि परतलेच नाहीत! त्यांचे देह मात्र पुढ्यात आले... लचके तोडलेले... छिन्न-विच्छिन्न केले गेलेले. त्यांची शिकार नव्हती केली केवळ...त्यांच्या देहांवर प्रतिशोधाच्या असंख्य डागण्या दिल्या गेल्या होत्या, इतरांच्या काळजात भीतीची कट्यार खुपसणारे त्यांचे डोळे फोडून टाकलेले, पंजांवर असलेली ‘वाघनखे उपसून काढलेली.. त्वचा ओरबाडून घेतलेली... ही शिकार नव्हती...वाघाच्या वाघपणावर ओढलेला आसूड होता! त्या डोंगरांच्या अंतरंगात या बछड्यांचा जीव वाचवताना केला जातो तसा आकांत नव्हता उमटला.. पण प्रतिकाराचा वडवानल धगधगला असेल.. पण तो पर्वताखाली कुणाच्या कानी नाही आला!
वाऱ्याहातीही निरोप येईना म्हणून वाघांचे आणखी काही बच्चे शोधार्थ निघाले आणि त्यांचीही खबर मिळाली नाही...आता मात्र काहीतरी अघटीत घडले असावे, अशी खात्रीच पटली आणि सुरु झाले वाघांचे प्रतिनिर्यातन..प्रतिशोध, प्रतिकार आणि प्रतिघात! आता किती बळी जाताहेत, रुधिरगंगा किती उफाणेल याची कुणाला क्षिती नव्हती...प्रश्न केवळ या जगातील अस्तित्वाचा नव्हता... आत्मसन्मानाचा होता...त्याशिवाय जगण्यात काय हशील? नाही तरी काय थोडी...श्वान-शुकरे बापुडी?
आजपासून सव्वीस वर्षांपूर्वी म्हणजे १९९९ मधील मे महिन्यात, ८ तारखेला इंग्लंड मधील मॅन्चेस्टर भारत-पाक क्रिकेट विश्वचषक साखळी लढत खेळली जात होती. बहुतांश देशवासीय या क्रिकेट नावाच्या नशेच्या अंमलाखाली होते. हा सामना भारताने ४७ धावांनी जिंकला...पण भारताची पाकिस्तानशी खरी लढत सुरु झाली होती पाच दिवस आधीच...३ मे या दिवशी. आणि ही लढतही जिंकणे अनिवार्य झाले होते! बावीस पावलांच्या अंतरावर लावलेल्या सहा यष्टींच्या ‘रन' भूमीवर शे-दीडशे मीटर्सच्या परिसरात होणारा हा सामना नव्हता....एकशे साठ किलोमीटर्सच्या ओबडधोबड ‘रणभूमीवर लढला जाणारा हा कसोटी संग्राम होता! हिंदुस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील सियाचीन अर्थात जंगली गुलाब फुलवणाऱ्या एका विस्तीर्ण बर्फाळ, डोंगराळ पटांगणावर श्वास घेणे दुरापास्त म्हणून कुणीही राहत नव्हते....राहणे शक्य नव्हते! पण इथे राहता आले तर मात्र प्रतिस्पर्ध्याला वाकुल्या दाखवता येतील असा कयास पाकिस्तानने बांधला! खरं तर मैदानी मुकाबल्यात त्यांना तीन तीनदा माती खावी लागली होती.. पण त्यांची स्मरणशक्ती बेताचीच, आणि त्यात दुसऱ्याच्या अन्नात माती कालवायची मूळची वृत्ती जबर.
कित्येक दिवसांपासून त्यांच्या मनात खदखदत असलेल्या मनसुब्याला त्यांनी १९८०-८१ पासून एका व्यापक कटाचे कुरूप स्वरूप द्यायला आरंभ केला होता. सियाचीनवर, जिथे कुणीही नाही तिथे बस्तान बसवायचे! पण सुदैवाने ही चाल हिंदुस्तानाच्या लक्षात आली... आणि शत्रूला आपल्या अंगणात येण्यापासून रोखण्याच्या योजनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. एकेदिवशी शत्रू संपूर्ण तयारीनिशी या अंगणाकडे कूच करता झाला...पण त्यांचं पंचांग भलत्याच ग्रहांनी भरलेलं होतं...ते स्वतःला अबाबील, अर्थात दैवी शक्ती लाभलेल्या पक्ष्यांचा थवा समजत होते...मन मानेल तेंव्हा हवं तिथं उतरू शकणार होते! त्यांना घाई नव्हती, त्यांना अगदी एखाद्या ढांगेत अंतर पार करता येणार होतं.
१७ एप्रिल,१९८४ रोजी पाकडे सियाचीनकडे रुख करणार होते..त्यांच्या आधी आपण पोहोचणे गरजेचे होते. आपल्या सेनाधिकाऱ्यांनी १३ एप्रिल तारीख निवडली.. इतरांसाठी तशी अशुभ म्हणावी अशी तारीख. पण याच दिवशी बैसाखी सण होता... आणि हिंदुस्तान किमान यादिवशी तरी काहीच सैन्य कारवाई करणार नाही, अशी पाकची खात्री होती! पाकिस्तान १७ एप्रिल रोजी तिथे पोहोचणार होता...त्याआधीच हिंदुस्तान तिथे पोहोचणार होताच..काहीही करून. पण तिथे पोहोचायला अग्निदिव्य करावे लागले...बर्फातले अग्निदिव्य! शून्याखाली कितीतरी अंश गेलेलं तापमान, बर्फाने झाकलेले मार्ग, बर्फाखाली लपलेल्या खोल दऱ्या, सरळसोट कडे, कपाऱ्या आणि प्रत्यक्ष काळाशी लागलेली स्पर्धा! जीवाच्या आकांताने पुढे सरकत राहणे हाच एक मार्ग होता.
कुमाऊ रेजिमेंट, लडाख स्काऊटचे हिमवीर तसल्या त्या बर्फात सियाचीनच्या दिशेने पण प्रचंड वळसा घालून चालत निघाले होते... गुडघ्यापर्यंत बर्फ होता! हवाईदलाचे साहाय्य घ्यावे लागणार होतेच..आणि तसे नियोजनही होते. जगातील सर्वांत उंच युद्धभूमीवर हजारो सैनिक आणि रणगाडे, शस्त्रे पोहोचवायची होती...मेघांनी हिंदुस्तानचे दूत बनून पाकिस्तानला ही खबर पोहोचवली. परक्यांनी सिंहासन बळकावण्यापूर्वी औरस वारसांनी राज्याभिषेक करवून घेतला होता! यानंतर पाकिस्तान पंधरा वर्षे संधीच्या शोधात होता. सियाचीनवरचे हिंदुस्तानचे नियंत्रण डळमळीत करायचे असेल तर तिथे पोहोचणारी रसद तोडली पाहिजे. हे कुणाच्याही लक्षात येण्यासारखेच आणि त्यांना ती संधी अगदी आयतीच लाभली. कारगिल परिसरातून सियाचीनकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा आठ-दहा किलोमीटर्सचा भाग दृष्टीस पडतो. इथे असलेल्या टायगर हिलवरून आणि इतर पर्वतशिखरांवरून या मार्गावर आरामात गोळीबार करता येईल! (या डोंगराकडे एका विशिष्ट कोनातून पाहिल्यास एखादा वाघ शिकारीच्या तयारीत, वाकून उभा आहे असा आभास होतो...म्हणून ही टायगर हिल!)
सियाचीन एकाकी पडले की हिंदुस्तान जेरीस येईल...वाटाघाटी, तह करण्याशिवाय पर्याय उरणार नाही...मग यानिमित्ताने त्यांच्या कलुषित दृष्टीकोनातून त्यांना दिसत असलेला काश्मीरचा प्रश्न (?) जागतिक पटलावर मांडता येईल...बलाढ्य जगातील बोके तराजू परजून येतील...आणि मग पुन्हा एक फाळणी होईल...अशी भिकार स्वप्ने पाकिस्तान दिवसा-उजेडी पाहू लागला. कारगिल परिसरात इतक्या उंचीवर सैनिक आणि तेही बाराही महिने ठेवणे खरे तर कुणालाच परवडणारे नाही. जिथे जगणे कर्मकठीण...तिथे कोण लढाई खेळणार? त्यामुळे केवळ औपचारिक असलेले हे पहारे बर्फाच्या दिवसांत दोन्ही पक्षांनी काढून घ्यावेत, बर्फ वितळले की परिस्थिती पूर्वपदावर आणायची...असा अलिखित करार झाला.. लिखित करारही न पाळणाऱ्या पाकवर विश्वास ठेवण्याचा अपराध नकळत घडला. हिंदुस्तानी व्याघ्रराज पायउतार झाला आणि पर्वतावरून खाली आला.याच प्रतीक्षेत असलेले लबाड लांडगे, निर्दयी आणि संधीसाधू कोल्हे आणि जंगली श्वान पर्वतावरील आयत्या गुहांमध्ये येऊन बसले. वाघ माघारी येण्याच्या वाटेकडे डोळे लावून!
तेवीस वर्षांचे शावक कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांचे सहकारी अर्जुनराम, भंवरलाल, भिकाराम, मुलाराम आणि नरेशसिंग... आपल्या इतर वाघांची गुहा तपासायला म्हणून वर आले आणि पाकिस्तानी कुत्र्यांचे भक्ष्य बनले... अनन्वित छळ याचे पुन्हा एकदा नवे उदाहरण बनून..मारून युद्धापराधाच्या इतिहासाच्या काळ्या पानावर लिहिले गेले!
सौरभ कालिया यांना धाकटा बंधू मानणारे कॅप्टन अमित भारद्वाज आणि त्यांचे ३५ सहकारी सौरभ यांच्या शोधात पहाडावर आले. पाकडे तयारीत होतेच. खालून किती सैनिक वर येताहेत हे ते बसल्या जागेवरून मोजू शकत होते. त्यांना विशेष काहीच करायचे नव्हते. केवळ सहज नेम धरून बंदुकांचे चाप ओढायचे होते.त्यांनी तसेच केले... भारद्वाज साहेबांनी इतरांना माघारी जाण्याचा आदेश दिला... ‘तळावर परत जा आणि खबर द्या... इथे शत्रू आधीच येऊन बसलाय!'
२९ लोक माघारी परतले... पण हवालदार राजवीर सिंग साहेबांच्या सोबत सावलीसारखा राहिला... शेवटपर्यंत.. दोघेही शत्रूसमोर पहाड बनून उभे राहिले... देहातून प्राण निघून गेल्यावरच हे दोन पहाड कोसळून पडले! वाघांची गुहा परत मिळवायला आणखी वाघ मग पुढे सरसावले... टायगर हिल पुन्हा टायगर्सची करायची होती...कितीही किंमत मोजावी लागली तरी! जगाच्या इतिहासात आजवर इतकी असमतोल लढाई झाली नसावी.... शत्रूशी प्रतिकार करण्याची एकही संधी हाती नव्हती. डोंगर, हवा, आभाळ सर्वच उभा दावा मांडून उभे ठाकलेले होते.शरणागती पत्करावीच लागेल असा रंग होता. म्हणजे जगाला असेच वाटत होते! पण डोंगराला दुसरीही बाजू असते. हे पाकिस्तान विसरून गेला होता. शिवाय या दुसऱ्या बाजूने घोरपडीसुद्धा वर येण्याची छाती करीत नाहीत.. तिथून माणसे कशी येतील? विचार तर अगदी परिस्थितीसापेक्ष होता त्यांचा. पण.. याच खडतर, अशक्य बाजूंनी आपले वाघ निश्चयाने चढले..एक एक वीत, एक एक पाऊल म्हणजे मरणाशी जवळीक. शत्रूच्या नाकासमोरूनही सैनिक वर चढाई करीत होते... अंगावर मरण झेलत होते... गोळीला गोळीने उत्तर देत होते... पुढचा कोसळला की त्याची जागा दुसरा देह घेत होता आणि पर्वताच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होत होती.
रणभूमी दिग्मूढ होऊन पहात बसली होती...शेकडो वाघ डरपोक, कावेबाज जनावरांवर तुटून पडत होते...मरणाची भीती होती कुणाला? घायाळ देहांची मोजदाद नव्हती...आणि कामी आलेल्या देहांवर पुष्प अर्पण करण्याची सवड मिळत नव्हती.. तरुण रक्ताच्या सड्यांनी भारतमातेच्या अंगणातली माती भिजून गेली होती...५२७ देहांतून वाहत आलेले रक्त...सागर भरला असता... लाल रंगाचा! कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन मनोजकुमार पांडेय, कॅप्टन अनुज नय्यर, मेजर राजेश अधिकारी, कॅप्टन केंगृसे, कॅप्टन हनीफुद्दिन, मेजर विवेक गुप्ता, लेपट. क्लिफर्ड नोंगृम... कुणा-कुणाचे नाव सांगावे? पाचशे सत्तावीस बांगडी फुटली असे म्हणता येत नाही... कारण या वाघांपैकी अनेकांनी वयाची पंचविशी पाहिली नव्हती... संसार पाहिला नव्हता, केला नव्हता.. तुम्ही आम्ही जे हे जग पाहतो आहोत.. ज्याचा आनंद लुटत आहोत ते जग यांनी पुरते पाहिलेही नव्हते! पण पाचशे सत्तावीस पदर मात्र कायमचे रिकामे झाले. या मातांच्या कुशी उजाडल्या गेल्या.
कित्येक वाघ तर एकुलते एक होते त्यांच्या आईबापाला! तेराशेपेक्षा अधिक सुकुमार, बलदंड देह घायाळ झाले ते तर वेगळेच. पण ज्यांनी बलिदान दिले त्यांनी मात्र अनेकांना पोरके केले... हेही खरेच. त्यांच्या आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी यांच्या आयुष्यात कारगिल हा चार अक्षरी शब्द विरहाची डागणी देणारी तप्त शिग ठरली आहे... जिचा दाह कधीच कमी होणार नाही! २६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवसाच्या स्मृती २६ वर्षांच्या होताहेत... ही बलिदाने आपल्या स्मृतींच्या पडद्यामागे कधीच विस्मरणात जाता कामा नयेत... कारण विस्मरण शब्दात मरण दडलेले आहे! कारगिलच्या परिसरात जो रणसंग्राम झाला त्याला युद्ध न म्हणता सशस्त्र संघर्ष म्हटले जाते... कारण जगाच्या दृष्टीने, तांत्रिकदृष्ट्या युद्धाची व्याप्ती खूप मोठी असते! पण आपल्यासाठी शत्रूकडून आलेली एक गोळीसुद्धा युद्धाचीच घोषणा करीत येत असते... गमावलेला आपला प्रत्येक सैनिक आपल्यासाठी आपला वाघच असतो.. आणि असावा!
सैनिक कुठे धारातीर्थी पडला यापेक्षा तो कशासाठी आणि कसा कामी आला हे महत्त्वाचे! दुर्दैवाने कारगिल लढाईमध्ये कामी आलेल्या ५२७ वीरांची एकत्रित यादी कुठे एकाच ठिकाणी उपलब्ध झाली नाही... खरं तर ही ५२७ नावे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या.. जो यांच्यामुळेच आज स्वतंत्र श्वास घेतो आहे...त्याच्या नजरेखालून एकदा तरी गेलीच पाहिजे! महाराष्ट्रापुरते सांगायचे झाल्यास...हवालदार सुरेश गणपती चव्हाण, सांगली..लान्सनायक एकनाथ चैत्राम खैरनार, नाशिक... लान्सनायक शंकर राजाराम शिंदे, पुणे...पॅराट्रूपर महादेव नामदेव पाटील, सांगली...रायफलमन सुभाष अश्रुबा सानप, बीड...शिपाई मच्छिंद्र रामचंद्र देसाई, कोल्हापूर... ही नावे तरी आपल्या डोळ्यांनी पाहिली गेली पाहिजेत! अशी नररत्ने जन्मास घालणाऱ्या माता-पित्यांना दंडवत... ज्यांनी आपली सौभाग्ये गमावली अशा वीर पत्नींना वंदन! कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय सैन्याचे अभिनंदन आणि आभार! जय हिंद! - संभाजी बबन गायके