श्रावण : माझा आवडता महिना

या श्रावणातल्या श्रावण सरी, वसुंधरेला मनसोक्त भिजवून तिला एक मनोहारी हिरवेगार देखणे रूप देणाऱ्या या श्रावण महिन्याचं साऱ्यांनाच नेहमीच अप्रुप वाटत आलंय. हा श्रावण महिना खरं तर सर्व वर्षातील सणांचा आणि व्रतवैकल्यांचा राजा समजायला काहीच हरकत नसावी. जागोजागीच्या सौभाग्यवती श्रावण महिन्यातील अक्षरशः प्रत्येक वाराला निरनिराळ्या पुजा अर्चा, व्रतवैकल्ये, नेम करत असतात. हा श्रावण महिना जसा भक्तिचा महिना आहे तसा जीवनाचाही महिना आहे.

 आज पाहुण्यांसोबत पुण्याच्या दगडुशेठ गणपती दर्शन घ्यायचा योग आला. आजारपणामुळे या दोन-चार महिन्यात मला तसे घराबाहेर जायला फारसे मिळालेही नव्हते. बाहेरील वातावरण माझ्या मनासारखे होते. अधुनमधुन रिमझिम पाऊस पडायचा व वातावरण ऊल्हसित करत होता.  श्रावणातील वातावरण असेच मस्त असते असे सोबत असलेले वयस्कर नातेवाईकही मला सांगत होते.

शांतपणे गणेशाचे दर्शन झाले, मन प्रसन्न झाले. बाहेर रस्त्यावर आलो तर रंगीबेरंगी फुलांनी सजवलेली नागाची मुर्ति समोरच दिसली.फार छान वाटले, फुलांचा नागोबा मी प्रथमच पहात होतो. आश्चर्यमिश्रीत आनंद तर होताच; पण आजुबाजुचे भक्तगण (विशेषतः स्त्री भगिनी) श्रावण महिना व त्याचे महत्व यावर बऱ्याच गोष्टी एकमेकांत चर्चा करत होत्या व त्यातील काही माझ्या कानावर येत होत्या.

माझ्या बाबतीत विचाराल तर मला पावसाळा सुरू झाला की विशेष आनंद व्हायला लागतो. कसंय.. क्षणांत येणारी पावसाची जोरदार सर आणि त्यानंतर पडणारे ऊन हा पाठशिवणीचा खेळ या श्रावण महिन्यात सतत चालू असतो, ग्रीष्म ऋतुतल्या त्या भीषण ऊष्णतेने आपल्यासह धरतीसुध्दा पावसाची आतुरतेने वाट पहात असते आणि श्रावणात तर जोरदार पावसाच्या सरींनी वर्षा ऋतुचे आपण सगळेच स्वागत करत असतो. या पावसाची वाट पहाणाऱ्या धर्तीवर श्रावण सरी पडू लागल्या की मानवासह, निसर्ग, झाडे झुडपे, दऱ्या खोऱ्या, पशु पक्षी सगळेच आनंदाने बेहोष होत असतात. मग काय बोरकर, बालकवी, मर्ढेकरांसारखे निसर्गप्रेमी कवी आपली प्रतिभा मनमोकळेपणे व्यक्त करीत असत. मला बालकवींची श्रावण मास ही सुंदर कविता फारच आवडते व ती मी अजुनही आवडीने गुणगुणत असतो.

एक सांगु, या श्रावणातल्या श्रावण सरी, वसुंधरेला मनसोक्त भिजवून तिला एक मनोहारी हिरवेगार देखणे रूप देणाऱ्या या श्रावण महिन्याच मला नेहमीच अप्रुप वाटत आलंय.
मला असं वाटतं हा श्रावण महिना खरं तर सर्व वर्षातील सणांचा आणि व्रतवैकल्यांचा राजा समजायला काहीच हरकत नसावी. आमच्या मातोश्री आणि सौभाग्यवती श्रावण महिन्यातील अक्षरशः प्रत्येक वाराला निरनिराळ्या पुजा अर्चा, व्रतवैकल्ये, नेम करत असे. श्रावणी सोमवारपासुन शनिवारपर्यंत आम्ही पुजेनंतरच्या नैवेद्य आणि प्रसादाची आतुरतेने वाट पहात असू.

हा श्रावण महिना जसा भक्तिचा महिना आहे तसा जीवनाचाही महिना आहे असे मला वाटते. याच महिन्यात शेतकरी नवनवीन पिके घेत असतो आणि निसर्गसुध्दा नवनवीन झाडांना जन्म देत असतो.

तर आज श्रावण पंचमी असल्याने दगडूशेठ गणपतीपाशी फुलांची सुंदर नागदेवता केली होती, भक्तिभावनेने भक्त दर्शन घेत होते आणि सोबत आपल्या गावाकडच्या नागपंचमीच्या गोष्टी वारंवार एकमेकांत सांगत होते. त्यात नवपरिणीत माहेरवाशिणी आपल्या गुजगोष्टींसोबत, झाडावर बांधलेल्या झोक्याच्या गमतीजमतीपण सांगत होत्या.
जो तो आपल्यापरीने गावाकडे नागदेवतेची पुजा करत असतो; पण शहरी वातावरणात त्यामानाने ही नागपुजा लुप्त होत चालली आहे. पण आज मला या फुलांच्या नागदर्शनामुळे भुतकाळातील प्रसंग आठवायला लागले व माझा श्रावण महिमा अधिकच गोड व ऊत्साहवर्धक वाटायला लागला.

बऱ्याचदा या श्रावणातल्या पावसामुळे काहींना गैरसोयी, अडचणी, रोगराईला तोंड द्यावे लागते त्यामुळे "आल्या श्रावण सरी तब्येत सांभाळी” असे म्हणायची वेळसुध्दा येऊ शकते.श्रावण महिन्याचे धार्मिक, पौराणीक आणि आरोग्यदृष्टाही असलेले महत्व आपण जाणतोच. तर असा हा निसर्गाचा, सणांचा व ऊत्साहाचा महिना श्रावण !
तेव्हा "श्रावण मासी हर्ष मानसी” या बालकवींचे बोल मला विसरून कसे बरे चालेल? - अनिल देशपांडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

ज्याची त्याची फ्रेंडशिप (३ ऑगस्ट : फ्रेंडशिप डे)