छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
मला भेटलेले शिवशाहीर..
आला श्रावण.. नागपंचमीही पार पडली. श्रावणातली पंचमी. इथूनच होतो सणांचा श्री गणेशा. प्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे ह्यांचा आणि त्यांच्या चाहत्यांचाही आवडता दिवस. कारण हा नागपंचमीचा शुभ दिवस म्हणजे श्री.बाबासाहेबांचा तिथीने जन्मदिवस. बाळपणापासूनचं मुलाचे पाय पाळण्यात दिसावे तसे बाबासाहेब लहानपणापासूनच अत्यंत हुशार तडफदार होते. विद्यार्थी दशेत असतांना इतिहास हा त्यांचा आवडता विषय होता. पहिल्याच भेटीत ते मला म्हणाले, "भावे स्कूलमध्ये असतांना या विषयाची गोडी मला श्री.माजगावकर सरांनी लावली. शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला तर सरांनी माझ्या मनांत इतिहास जागवला. इतकी सरांची अवघड विषय सोप्पा करून शिकवण्याची हातोटी अप्रतिम होती. त्यांच्यासारखे आणि श्री फाटकसरांसारखे गुरु मला लाभले आणि मी इतिहासकार झालो.” आपल्या यशाचं श्रेय दुसऱ्याला देण्यात आणि वयाने लहान असलेल्या व्यक्तींनाही ‘अहो' म्हणून मान देण्याइतकी बाबासाहेबांच्या वाणीत नम्रता होती. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रखरताही त्यांच्या भाषणात असायची. त्यांची वक्तृत्व कला ऐकताना प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध व्हायचा.
इथे आवर्जून अभिमानाने नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे, सातासमुद्रा पलीकडेही कीर्तीचं शिखर गाठणाऱ्या ह्या शिवशाहीरांचे गुरु म्हणजे माझे परमपूज्य वडील ति.दत्तोपंत सखाराम माजगावकर हे होते. आपल्या प्रत्येक भाषणात, मुलाखतीत प्रथम माझ्या वडिलांचा आणि श्री फाटक सरांचा उल्लेख ह्या शिवशाहीरांनी आवर्जून केला. ह्या पट्टशिष्याची नम्रता. लोकप्रियता बघायला दुर्दैवाने आज त्यांचे हे आदरणीय शिक्षक ह्या जगात नाहीत ह्याची खंत श्री.बाबासाहेबांच्या भाषणात मनांत होती.
एका एकसष्टीच्या सोहळ्यात ते आले होते. माझी बहीण म्हणजे श्री.माजगावकर सरांची, आपल्या गुरूंची मुलगी ह्या कार्यक्रमाला आली आहे, हे कळताक्षणी त्यांनी काय करावं? ते जागेवरून उठले आणि माझ्या बहिणीच्या समोर उभं राहून मानाचा मुजरा त्यांनी माझ्या बहिणीला, म्हणजे गुरुकन्येला केला. या प्रकाराने भांबावून गेलेल्या माझ्या बहिणीकडे बघून ते म्हणाले, "सर आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत.म्हणून हा मुजरा गुरुकन्या म्हणून मी तुम्हाला करतोय. हा मुजरा माननीय सरांसाठी आहे. आणि तो त्यांना पोहोचलाही असेल.” ही गुरुनिष्ठा, हा भावपूर्ण प्रसंग पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेक्षक भारावले. अनेकांचे डोळे पाणावले. अनेक जणांनी असे गुरु शिष्य पुन्हा होणे नाही असे उद्गार काढले. तो प्रसंग मला आठवला. वडिलांच्या आणि बाबासाहेबांच्या आठवणीने माझे डोळे भरून आले. या शुभदिनाचे औचित्य साधून मी ही आठवणींची शिदोरी तुमच्या पुढे उलगडली. मी नतमस्तक झाले आणि बाबासाहेबांच्या फोटोला मानाचा मुजरा केला. आपल्या आठवणींचा वारसा सगळ्यांसाठी मागे ठेऊन. कीर्तीमान झालेल्या या पद्मभूषणांना शिवशाहीरांना माझा पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा. मानवंदना देताना माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले...धन्य ते गुरु शिष्याचे नाते..
जय भवानी जय शिवाजी! - राधिका (माजगावकर) पंडित, पुणे