छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रसुती विभागात खाटांमध्ये वाढ
पुस्तक परिक्षण
या संग्रहातील सर्व कथा ह्या विदर्भाच्या ग्रामीण भागातील आहेत. त्या अनुषंगाने या कथांतून ग्रामीण बोली, शेतकरी लोकजीवन, चालीरीती, निसर्ग यांचे वर्णन आले आहे. साहित्य क्षेत्रात कथासंग्रहांना एक विशेष महत्त्व आहे. या कथा वाचताना आपण लेखकाच्या अनुभव विश्वातून जातो. वाचकांच्या ज्ञानात भरही पडते. लेखकाची भाषाशैली साधी, सोपी, सरळ आहे आणि कथांमधे वैविध्य आहे.
कथासंग्रह- लेखक - प्रा.डॉ.ज्ञानेश्वर वारंगे
अक्षर शिल्प प्रकाशन, अमरावती यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठावरून आणि नावावरून हे पुस्तक कुणा सेवाभावी आश्रम चालवणा-या मानवतावादी माणसाचे चरित्र असावे असे वाटते. पण प्रत्यक्षात तसे नाही .हे पुस्तक एक कथा संग्रह आहे. पण तसे मुखपृष्ठावर नमुद केलेले नाही. या कथा संग्रहाचे लेखक हे अमरावतीच्या चांदूर भागातील महाविद्यालयातील प्राध्यापक असून ते इतिहास विभाग प्रमुख आहेत. हे त्यांचे चौथे पुस्तक आहे. या कथासंग्रहात एकुण दहा कथा आहेत.
पहिल्या -४९८ या कथेत सासू सुनेच्या पारंपरिक भांडणांची कथा विनोदी ढंगाने सांगितली आहे. या कथेत बोलीभाषेचा बाज, गावात पाण्याचे दुर्र्भिक्ष्य त्यामुळे तरूणांची लग्न होत नाहीत. चुकून लग्न झालंच तर सुनेशी भांडण झालेच पाहिजे ही सर्व सासवांची भूमिका. त्यावरून पोलीस ४९८ कलम लावतात. यातून विनोद निर्मिती झाली आहे. दुस-या - तस्वीर ब्लॅक एण्ड व्हाईट - आपल्या जन्मगावी खुप वर्षानंतर येणा-या स्त्रीच्या खडतर प्रवासाची गोष्ट आहे. एस.टी. बसचा प्रवास, मनात धाकधूक पण गावात पोहचल्यावर तिचा काका तिला जून्या फोटोवरून ओळखतो. असा या कथेतील आनंद आहे. तिसऱ्या - माहेरची आठवण - कथेतही विवाहित स्त्रीला ‘माझे माहेर पंढरी' हा अभंग ऐकून माहेरची तीव्र आठवण उचंबळून येते. सावत्र आईमुळे माहेर दुरावलेलं असतं. चाळीस वर्षानंतर अनेक बस बदलून, एका अनोळखी घरी वस्ती करून ती माहेरी पोहचते. यात स्त्री मनाची घालमेल उत्तम प्रकारे व्यक्त झाली आहे.
चौथ्या - नुक्तीची पंगत - या कथेत गावजेवणाची भावनाप्रधान व्यथा आली आहे. नुक्ती म्हणजे बुंदी हे मी पहिल्यांदाच वाचले. ग्रामीण बोलीचे शब्द असे मजेशीर असतात. आवतान म्हणजे आमंत्रण देण्याची गाव प्रथा, त्यातून समज/गैरसमज. गरिबांच्या मुलांना बुंदीसारखा गोड पदार्थ पहायलाही मिळत नाही, हे वाचून मन व्यथित होते. पाचवी - रहस्यमय मोहानी जंगल. ही कथा आपणास घनदाट जंगलात घेऊन जाते. एक शेळीपालन करणारा मादु नावाचा गुराखी त्या रहस्यमय जंगलात हरवतो. त्याची चंपी नावाची कुत्री शेळ्यांना घेऊन घरात येते. हरवलेल्या मादुस शोधण्यासाठी गावकरी मशालींच्या उजेडात जंगलात जातात. भितीने त्यांचा थरकाप होतो. तेव्हाही चंपी कुत्री अंधारात मादुस शोधून काढते. यातून पाळीव प्राणी किती जीव लावतात हे प्रतीत होते. सहावी - आगटं- ही कथा एका श्रीमंत अमृत पाटील या माणसाची आहे. त्यांच्या घरात नात जन्मास येते यातून कमालीचा आनंदोत्सव साजरा होतो. कालप्रवाहात कोविड रोगराईत पाटील मृत पावतो आणि ती नात अंत्ययात्रेत ‘आगटं' हे मातीचे भांडे हातात घेते. अशी ही -हदयदावक कथा आहे. सातव्या - मातृ ग्राम- कथेत. आबू नावाचा गावकरी पोटापाण्यासाठी गाव सोडून जातो. तो दुर गुजरात मधे सुरत शहरात स्थाईक होतो. तब्बल साठ वर्षानंतर त्यास आपल्या गावाची आणि बालमित्रांची आठवण येते.तो झुरू लागतो, तंद्रीत तो बॅग भरून गाव शोधत येतो. जुन्या फोटोत चार बालमित्र असतात. त्यातील दोन वय झाल्याने वारलेले असतात. त्यातील एक आवाजावरून आबूस ओळखतो. गळाभेट होते. आबू गावाच्या मंदिरास,ग्रंथालयास, शाळेस देणग्या देतो. आनंदी आनंद होतो. सुरतहून आबूचे मुलगे त्यास शोधत गावात येतात. आणि घेऊन जातात.
आठव्या - शाळेचा रस्ता - या कथेत ग्रामीण भागातील परगावच्या शाळेत जाताना होणारी विद्यार्थी दशा आली आहे. दोन पैकी एकच विद्यार्थी शाळेत नियमित जातो. जाताना वाटा, रस्ते, शेती, माळराने, जंगल, भुते, झाडे,पक्षी, साप यांची वर्णने येतात. अनेकांना शिक्षणासाठी केलेली पायपीट आठवेल आणि डोळ्यात पाणी येईल अशी ही कथा आहे. नवव्या उध्वस्त पांदन या कथेत विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, पायवाटांची मोडतोड, उध्वस्त शेतांचे बांध ही व्यथा आहे. गावरानावर पोसलेली माणसे हा रस्ता, विकास पाहून मनात मोडून पडतात. वयोवृद्ध जनाबाई म्हणते ‘पापं खुप झाली'. आतल्या आत कुढत राहते. दहावी कथा - फिरस्ता अखंड सेवाव्रती - ही आहे. याच कथेवरून या कथासंग्रहाचे नाव ठेवण्यात आले आहे. किसना नावाचा एक फिरता अनाथ भोला कष्टकरी पुरूष असतो.तो एखाद्या गावात जाऊन शेतीची, कष्टाची कामे करून फक्त जेवणाचा मोबदला घेऊन आठ/दहा दिवस राहतो. अचानक निघून जातो. एका ठिकाणी तो टिकत नाही. हे पात्र गाडगे महाराजांसारखे वाटते. हा किसना हिरवे झाड तोडत नाही. लोकांनी दिलेले जुने कपडे घालतो. मंदिराच्या ओसरीवर झोपतो.शेतीची सगळी कामे करतो ती करताना प्राणीमात्रांवर दया करतो. असे हे विलक्षण वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. तो रानात वानरांना मदत करून रानातच मरतो. मुक्त होतो. वाचक मनास चटका लावणारी ही कथा आहे.
फिरस्ता अखंड सेवाव्रती हे शंभर पानांचे पुस्तक असून त्याची किंमत १६० रूपये आहे. या कथांतून ग्रामीण लोकजीवन, शेतकरी व्यथा, मानवी स्वभाव, सामाजिक घडामोडी, बोली भाषा, जुन्या आठवणी यांचे दर्शन घडते. ग्रामीण कथाकारांत व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द.मा. मिरासदार, शंकरराव खरात यांनी मोलाची कामगिरी केली आहे. आजचा कथाकार हा उद्याचा कादंबरीकार असतो असे साहित्य क्षेत्रात म्हटले जाते. आज बहुसंख्य लोक पोटासाठी शहरात राहत असले तरी त्यांची पाळेमुळे ही ग्रामीण भागातच असतात. या कथासंग्रहातून कथा वाचतांना आपणासही गावी भेटलेली माणसं आठवतात. हे या पुस्तकाचे यश आहे.
फिरस्ता अखंड सेवाव्रती लेखक डॉ.प्रा.ज्ञानेश्वर वारंगे
प्रकाशक : अक्षर शिल्प प्रकाशन, अमरावती
पृष्ठे १०० मूल्य १६०/- रु.
-गज आनन म्हात्रे