महादोषांचे गिरिवर रामनामे नासती

नाम तेथे नामी या न्यायाने नामोच्चाराबरोबरच श्रीरामही तिथे उपस्थित होणार हे ओघानेच आले. त्यामुळे ज्या अंतःकरणात नामाचे स्मरण मनात किंवा मोठ्याने केले जाते तिथले सर्व दोष तिथून दूर निघून जातात. अगदी डोंगरदऱ्यात पळून जाऊन पार हरवून जातात.

अती आदरे सर्व ही नामघोषे।
गिरिकंदरे जाईजे दूरि दोषे।
हरी तिष्ठतु तोषला नामतोषे।
विशेषे हरा मानसी रामपीसे । श्रीराम ९२।

परमार्थ जाणून घ्यायचा असेल, त्यात काही प्रगती करायची असेल आणि आपल्या जीवनाचे संपूर्ण कल्याण साधून घ्यायचे असेल तर आपले अंतःकरण अत्यंत निर्मल, अत्यंत शुद्ध करून घेणे ही प्राथमिक साधना आहे. त्याशिवाय पुढे जाता येत नाही. अंतःकरण शुद्ध होण्यासाठी आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे निरपेक्ष कर्तव्य करीत राहणे हा उपाय आहे. पण कर्मात निष्कामता, निर्लेपता येण्यासाठी अंतःकरणातील षड्रिपू किंवा सहा मुख्य दोषांवर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे दोष मनाला मलीन करतात. गढूळ करतात. मनाचे स्थैर्य डळमळीत करतात. शांती-समाधानात बाधा उत्पन्न करतात. आपल्या अंतर्यामी स्वयंप्रकाशी ज्ञानस्वरूप आत्माराम पूर्ण तेजाने प्रकाशमान असतो. पण आपल्या गढूळ, अस्थिर मनात तो ज्ञानप्रकाश स्वच्छपणे पडत नाही. एखाद्या अडगळीने भरलेल्या खोलीतजसा दिवा असूनही पुरेसा स्वच्छ उजेड दिसत नाही; तसेच दोषयुक्त मनात एकसारखा संपूर्ण स्वच्छ उजेड पडत नाही. त्यामुळे काही थोडे स्पष्ट दिसते, तर थोडा भ्रम होतो. काही पूर्व संस्कारांमुळे भगवंत आहे यावर श्रध्दा असते पण जग खरे आहे असेही ठामपणे वाटते.

संत-सद्गुरू सांगतात, "ब्रह्म सत्य, जगत्‌मिथ्या.” परंतु ज्ञान प्रकट नसल्याने तसा अनुभव येत नाही. जीव आणि ब्रह्माचे ऐक्य आहे, ब्रह्माशिवाय दुसरा पदार्थ जगात नाही हे संतांनीकितीही परोपरीने सांगितले तरी आपल्याला मात्र सर्वत्र भेदच दिसतो. आपले "मी-तूपण” संपत नाही. हे द्वैत संपावे, मनातील दोषांची पूर्ण निवृत्ती व्हावी आणि अखंड, निर्भेळ आनंदाचा अनुभव यावा यासाठी अत्यंत खात्रीचा, सोपा, बिनकष्टाचा, बिनखर्चाचा उपाय सर्व संत मंडळी पुन्हा पुन्हा सांगतात तो म्हणजे, "भगवंताचे नाम घ्या.” समर्थ म्हणतात, भगवंत सर्वश्रेष्ठ आहे. सर्वसत्ताधीश आहे आणि अत्यंत कृपावंत आहे. म्हणून मोठ्या आदराने त्याच्या नामाचा घोष करा. जेव्हा महत्त्वाच्या, श्रेष्ठ पदावरची एखादी सत्ताधीश व्यक्ती येणार असतेतेव्हा त्यांच्या आगमनाची घोषणा होताच सर्व लोक त्यांच्या मार्गातून दूर होतात, आपले आवाज बंदकरतात, आपली हालचाल थांबवतात. तसेच जेव्हा रामनामाचा मोठ्याने गजर केला जातो तेव्हा "नाम तिथे नामी” या न्यायाने नामोच्चाराबरोबरच श्रीरामही तिथे उपस्थित होणार हे ओघानेच येते. त्यामुळे ज्या अंतःकरणात नामाचे स्मरण केले जाते तिथले सर्व दोष तिथून दूर निघून जातात. अगदी दूर म्हणजे डोंगरदऱ्यात जाऊन पार हरवून जातात. जिथे हरिनामाचा घोष होतो तिथे हरि मोठ्या संतोषाने तिष्ठत उभाराहतो. भक्ताने काही मागावे आणि आपण त्याला भरभरून द्यावे, भक्ताने काही सांगावे आणि आपण तेतात्काळ करावे ह्या भक्त कल्याणाच्या उद्देशाने तो भक्ताभिमानी भगवंत भक्ताच्या आज्ञेची वाट पाहातउभा राहतो. याची ग्वाही देण्यासाठीच पंढरीचा राजा भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर युगानुयुगे उभाच आहे.

 नामस्मरणामुळे भगवंत भक्ताचा ऋणी होतो. एवढे सामर्थ्य, एवढे मूल्य नामात आहे. परंतु नाम सहजपणे मुखात येत नाही. नामाचे सतत स्मरण होण्यासाठी भगवंताची अतिशय आवड निर्माण व्हावीलागते. नामाचा छंद म्हणजे वेडच लागावे लागते. भगवान शंकरांना असे रामनामाचे वेड लागले आहे असे श्रीसमर्थ पुन्हा एकदा सांगत आहेत.

साक्षात योगेश्वर भगवान शंकर स्वतः नित्यनेमाने रामनामाचा जप करतात आणि मोठ्या आदराने रामनामाचे गुणगान जगदंबा माता पार्वतीलाही ऐकवतात. म्हणूनच समर्थांचे सांगणे आहे की आपल्यालाही नामाचा असा छंद जडावा. असे वेड लागावे. म्हणजे नामाशिवाय इतर विषय मनात प्रवेशच करणार नाहीत. आणि मनातील इतर विषययांच्या कामना, वासना, क्रोध, द्वेष, अहंकार, हव्यास भ्रम इ.दोष दूर निघून जातील. त्यांचा आवाज बंद होईल. त्यांची हालचाल थांबून जाईल. अर्थात ते निष्प्रभ होतील. अंतर्यामी फक्त भगवंताचे नाम शिल्लक राहील. त्यातूनच अनुभव येईल तो निर्भयतेचा, निश्चिंतपणाचा आणि निर्भेळ आनंदाचा. निखळ आनंद हेच तर आपले स्वरूप आहे. या प्रत्यय ज्ञानालाच परमार्थ म्हणतात. मोक्ष म्हणतात. दासबोधात समर्थ म्हणतात,

"नाम स्मरे निरंतर। ते जाणावे पुण्य शरीर। महादोषांचे गिरिवर। रामनामे नासती श्रीराम (४-३-२२)”
संत तुकाराम महाराज म्हणतात, "तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी। प्रेमे घाली उडी नामासाठी”
ज्ञानेश्वर माऊलींच्या मुखातून स्वयं भगवंत म्हणतात,
"परी तयांपासी पांडवा। मी हारपला गिंवसावा।
जेथे नामघोषु बरवा। करिती माझा (९-२०८)”
तात्पर्य : अविरत नामस्मरणाची सवय लावून घ्यावी.
जय जय रघुवीर समर्थ  
-सौ. आसावरी भोईर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

न्यूरोलॉजिकल समस्यांची लक्षणे